Menu Close

विचित्र वीणा – बा. भ. बोरकर – Vichitra Veena

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी कुठे जर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगणमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून जालें ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फुल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटीम्बे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांनी प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

बा. भ. बोरकर

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF

1 Comment

Comments are closed.