Menu Close

उगवले नारायण – Ugavale Narayan

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हे आली अंगणात ll १ ll

उन्हे आली अंगणात, उन्हे आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनीची तुळस ll ३ ll

वृंदावनीची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशी
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ ll

बहिणाबाई चौधरी

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF