स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी (Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari) ही कविता सगळ्यांच्या काळजाला हात घालते. अगदी शालेय जीवनापासून आपल्याला आई आणि तिच्यासाठी लिहिलेली ही कविता आवडते.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari
“आई!” म्हणोनी कोणी। आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना। या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे। मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा। व्याकूळ मात्र होई!
वात्सल्य माउलीचे। आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का?। आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला। येता धरील पोटी
काढून ठेवलेला। घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या। धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे। का ह्या करील गोष्टी?
तुझ्याविना न कोणी। लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया। आम्हा “शुभं करोति”
ताईस या कशाची। जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला। समजे न यात काही
पाणी तरारताना। “आम्हास नाहि आई”
ते बोल येति कानी। “आम्हास नाहि आई”
आई! तुझ्याच ठायी। सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे। अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे। औदार्य या धरेचे
नैत्रात तेज नाचे। त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी। त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे। आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या। मी गाईले गुणाला
सार्या सभाजनांनी। या वानिले कृतीला
आई ! करावया तू। नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही। मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची। ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा। तव कौतुका भुकेला
येशील तू घराला। परतून केधवा गे !
दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे
कर्तवय् माउलीचे। करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे
ये रागवावयाही। परि येइ येइ वेगे
– यशवंत
Watch it on YouTube: Swami Tinhi Jagacha Aai Vina Bhikari
Source – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF
Similar Post |
---|
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या – कवी बी |
थोर तुझे उपकार आई – भास्कर दामोदर पाळंदे – Thor Tuze Upkar Aai |
Nice!!!
ही कविता शाळेपासून आवडत होती, काळजाला भिडते एकदम.