श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा (Swami Charitra Saramrut Adhyay 5) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा Swami Charitra Saramrut Adhyay 5
। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥
भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥
गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥
विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य । तुमच्या स्मरणे निवारती ॥३॥
स्वामीचरित्र कराया श्रवण । श्रोते बैसले सावधान । प्रसंगाहूनि प्रसंग पूर्ण । रसभरित पुढे पुढे ॥४॥
ज्यांचे सबळ पूर्वपुण्य । तया झाले स्वामीदर्शन । ऐसे चोळप्पा आदीकरून । भाग्यवंत सेवेकरी ॥५॥
अक्कलकोट नगरात । एक तपापर्यंत । स्वामीराज वास करीत । भक्त बहुत जाहले ॥६॥
वार्ता पसरली चहूकडे । कोणासी पडता साकडे । धाव घेती स्वामींकडे । राजेरजवाडे थोर थोर ॥७॥
म्हणती भोसल्यांचे भाग्य परम । स्वामीरत्न लाभले उत्तम । नृपतीही भक्त निःस्सीम । स्वामीचरणी चित्त त्यांचे ॥८॥
तेव्ही किती एक नृपती । स्वामीदर्शन घेऊ इच्छिती । आणि आपुल्या नगराप्रती । आणू म्हणती तयांसी ॥९॥
बडोद्यामाजी त्या अवसरी । मल्हारराव राज्याधिकारी । एकदा तयांचे अंतरी । विचार ऐसा पातला ॥१०॥
अक्कलकोटाहुनी स्वामींसी । आणावे आपुल्या नगरासी । मग कोणे एके दिवशी । विचार ऐसा पातला ॥११॥
दिवाण आणि सरदार । मानकरी तैसे थोर थोर । बैसले असता समग्र । बोले नृपवर तयांप्रती ॥१२॥
कोणी जाऊनी अक्कलकोटासी । येथे आणील स्वामींसी । तरी आम्ही तयासी । इनाम देऊ बहुत ॥१३॥
त्याचा राखू सन्मान । लागेल तितुके देऊ धन । ही वटपुरी वैकुंठभवन । वसता स्वामी होईल ॥१४॥
कार्य जाणुनी कठीण । कोणी न बोलती वचन । कोणा एका लागून । गोष्ट मान्य करवेना ॥१५॥
तेव्हा तात्यासाहेब सरदार । होता योग्य आणि चतुर । तो बोलता झाला उत्तर । नृपालागी परियेसा ॥१६॥
आपुली जरी इच्छा ऐसी । स्वामींते आणावे वटपुरीसी । तरी मी आणीन तयांसी । निश्चय मानसी असो द्या ॥१७॥
ऐसे ऐकोनी उत्तर । संतोषला तो नृपवर । तैसी सभाही समग्र । आनंदित जाहली ॥१८॥
संजिवनी विद्या साधण्याकरिता । शुक्राजवळी कच जाता । दैवी सन्मानिला होता । बहुत आनंदे करोनी ॥१९॥
नृपतीसह सकळ जने । त्यापरी तात्यांसी सन्माने । गौरवोनि मधुर वचने । यशस्वी म्हणती तया ॥२०॥
बहुत धन देत नृपती । सेवक दिधले सांगाती । जावया अक्कलकोटाप्रती । आज्ञा दिधली तात्याते ॥२१॥
तात्यासाहेब निघाले । सत्वर अक्कलकोटी आले । नगर पाहुनी संतोषले । जे केवळ वैकुंठ ॥२२॥
पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती । आनंदीत झाले चित्ती । तेथील जनांची पाहुनी भक्ती । धन्य म्हणती तयाते ॥२३॥
अक्कलकोटीचे नृपती । स्वामीचरणी त्यांची भक्ती । राजघराण्यातील युवती । त्याही करिती स्वामीसेवा ॥२४॥
आणि सर्व नागरिक । तेही झाले स्वामीसेवक । त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक । सेवेकरी निःस्सीम ॥२५॥
ऐसे पाहुनी तात्यांसी । विचार पडला मानसी । या नगरातुनी स्वामीसी । कैसे नेऊ आपण ॥२६॥
अक्कलकोटीचे सकल जन । स्वामीभक्त झाले पूर्ण । स्वामींचेही मन रमोन । गेले ऐसे ह्या ठाया ॥२७॥
प्रयत्नांती परमेश्वर । प्रयत्ने कार्य होय सत्वर । लढवोनी युक्ति थोर । कार्य आपण साधावे ॥२८॥
ऐसा मनी विचार करोनी । कार्य आरंभिले तात्यांनी । संतुष्ट रहावे सेवकजनी । ऐसे सदा करिताती ॥२९॥
करोनी नाना पक्वान्ने । करिती ब्राह्मणभोजने । दिधली बहुसाल दाने । याचक धने तृप्त केले ॥३०॥
स्वामीचिया पूजेप्रती । नाना द्रव्ये समर्पिती । जेणे सेवेकरी संतुष्ट होती । ऐसे करिती सर्वदा ॥३१॥
प्रसन्न व्हावे भक्तवत्सले । कार्य साधावे आपुले । म्हणोनी नाना उपाय केले । द्रव्य वेचिले तात्यांनी ॥३२॥
ऐशीयाने काही न झाले । केले तितुके व्यर्थे गेले । तात्या मनी खिन्न झाले । विचार पडला तयांसी ॥३३॥
मग लढविली एक युक्ती । एकांती गाठूनी चोळप्पाप्रती । त्याजलागी विनंती करिती । बुद्धीवाद सांगती त्या ॥३४॥
जरी तुम्ही समर्थांसी । घेऊनी याल बडोद्यासी । मग मल्हारराव आदरेसी । इनाम देतील तुम्हाते ॥३५॥
मान राहील दरबारी । आणि देतील जहागिरी । ऐसे नानाप्रकारी । चोळप्पाते सांगितले ॥३६॥
द्रव्येण सर्वे वशः । चोळप्पासी लागली आशा । तयाच्या अंतरी भरवसा । जहागिरीचा बहुसाल ॥३७॥
मग कोणे एके दिवशी । करीत असता स्वामीसेवेसी । यतिराज तया समयासी । आनंदवृत्ती बैसले ॥३८॥
चोळप्पाने कर जोडोनी । विनंती केली मधुर वचनी । कृपाळू होऊनी समर्थांनी । बडोद्याप्रती चलावे ॥३९॥
तेणे माझे कल्याण । मिळेल मला बहुत धन । आपुलाही योग्य सन्मान । तेथे जाता होईल ॥४०॥
ऐसे ऐकोनिया वचन । समर्थांनी हास्य करोन । उत्तर चोळप्पालागोन । काय दिले सत्वर ॥४१॥
रावमल्हार नृपती । त्याच्या अंतरी नाही भक्ती । मग आम्ही बडोद्याप्रती । काय म्हणोनी चलावे ॥४२॥
पुढले अध्यायी सुंदर कथा । पावन होय श्रोता वक्ता । श्रीस्वामीराज वदविता । निमित्त विष्णूदास असे ॥४३॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । पंचमोध्याय गोड हा ॥४४॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा
Similar Post |
---|
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Swami Charitra Saramrut Index |
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा Swami Charitra Saramrut Adhyay 4 |
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा Swami Charitra Saramrut Adhyay 6 |