श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा (Swami Charitra Saramrut Adhyay 3) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा Swami Charitra Saramrut Adhyay 3
। श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥
धन्य धन्य ते या जगती ।
स्वामीचरणी ज्यांची भक्ती ।
त्यांसी नाही पुनरावृत्ती ।
पद पावती कैवल्य ॥१॥
गताध्यायी कथा सुंदर ।
स्वामींनी निवेदिले स्वचरित्र ।
आणि बाबा दिगंबर ।
त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥
निर्विकार स्वामीमूर्ति ।
लोका चमत्कार दाविती ।
काही वर्षे करोनी वस्ती ।
मंगळवेढे सोडिले ॥३॥
मोहोळमाजी वास्तव्य करीता ।
आप्पा टोळ झाले भक्त ।
तेथीचे साकल्य वृत्त ।
अल्पमती केवी वर्णू ॥४॥
स्वामी चरित्राचे हे सार ।
म्हणून केला नाही विस्तार ।
वर्णिता कथा समग्र ।
ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥
सवे घेउनी स्वामींसी ।
टोळ जाती अक्कलकोटासी ।
अर्धमार्गावरुनी टोळांसी ।
मागे परतणे भाग पडे ॥६॥
टोळ आज्ञापिले सेवका ।
जोवरी आम्ही येउ का ।
तोवरी स्वामींसी सोडू नका ।
येथेच मुक्काम करावा ॥७॥
टोळ गेलिया परतोनी ।
स्वामी चालले उठोनी ।
बहुत वर्जिले सेवकांनी ।
परी नच मानिले त्या ॥८॥
तेथोनिया निघाले ।
अक्कलकोटाप्रती आले ।
ग्रामद्वारी बैसले ।
यतिराज स्वेच्छेने ॥९॥
तेथे एक अविंध होता ।
तो करी तयांची थट्टा ।
परी काही चमत्कार पाहता ।
महासिद्ध समजला ॥१०॥
पूर्वपुण्यास्तव निश्चिती ।
आले चोळप्पाचे गृहाप्रती ।
स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती ।
चोळप्पा करी आदर॥११॥
चोळप्पाचे भाग्य उदेले ।
यतिराज गृहासी आले ।
जैसी कामधेनू आपण बळे ।
दरिद्रियाच्या घरी जाय ॥१२॥
पूर्वपुण्य होते गाठी ।
म्हणूनी घडल्या या गोष्टी ।
झाली स्वामीराज भेटी ।
परम भाग्य तयाचे ॥१३॥
धन्य धन्य तयाचे सदन ।
जे स्वामींचे वास्तव्यस्थान ।
सुरवरां जे दुर्लभ चरण ।
तयाच्या घरी लागले ॥१४॥
योगाभ्यासी योग साधिती ।
तडी तापडी मार्गी श्रमती ।
निराहार कितीक राहती ।
मौन धरिती किती एक ॥१५॥
एक चरणी उभे राहोन ।
सदा विलोकिती गगन ।
एक गिरीगव्हरी बैसोन ।
तपश्चर्या करिताती ॥१६॥
एक पंचाग्निसाधन करिती ।
एक पवनाते भक्षिती ।
कित्येक संन्यासी होती ।
संसार अवघा सांडोनी ॥१७॥
एक करिती किर्तन ।
एक मांडिती पूजन ।
एक करिती होमहवन ।
एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥
एक लोका उपदेशिती ।
एक भजनामाजी नाचती ।
एक ब्राम्हण भोजन करिती ।
एक बांधिती देवालये ॥१९॥
परी जयाचे चरण ।
दुर्लभ सद्भक्तिवाचोन ।
केलियासी नाना साधन ।
भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥
योगयागादिक काही ।
चोळप्पाने केले नाही ।
परी भक्तिस्तव पाही ।
स्वामी आले सदनाते ॥२१॥
तयाची देखोनिया भक्ती ।
स्वामी तेथे भोजन करिती ।
तेव्हा चोळप्पाचे चित्ती ।
आनंद झाला बहुसाळ ॥२२॥
तैपासून तयाचे घरी ।
राहिले स्वामी अवतारी ।
दिवसेंदिवस चाकरी ।
चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥
तेव्ही राज्यपदाधिकारी ।
मालोजीराजे गादीवरी ।
दक्ष असोनी कारभारी ।
परम ज्ञानी असती जे ॥२४॥
अक्कलकोटची प्रख्याती ।
तेव्हा काही विशेष नव्हती ।
परी तयांचे भाग्य निश्चिती ।
स्वामीचरणी उदेले ॥२५॥
तैपासून जगांत ।
त्या नगराचे नाव गाजत ।
अप्रसिद्ध ते प्रख्यात ।
कितीएक जाहले ॥२६॥
चोळप्पाचे गृहाप्रती ।
आले कोणी एक यती ।
लोका चमत्कार दाविती ।
गावात बात पसरली ॥२७॥
आपुली व्हावी प्रख्याती ।
ऐसे नाही जयांचे चित्ती ।
म्हणुनिया स्वामीराज यती ।
बहुधा न जाती फिरावया ॥२८॥
लोकांमाजी पसरली मात ।
नृपासी कळला वृत्तांत ।
की आपुलिया नगरात ।
यती विख्यात पातले ॥२९॥
राहती चोळप्पाचे घरी ।
दर्शना जाती नरनारी ।
असती केवळ अवतारी ।
लीला ज्यांची विचित्र ॥३०॥
वार्ता ऐसी ऐकोनी ।
राव बोलले काय वाणी ।
गावात यती येवोनी ।
फार दिवस जाहले ॥३१॥
परी आम्ही श्रुत पाही ।
आजवरी जाहले नाही ।
आता जावोनी लवलाही ।
भेटू तया यतिवर्या ॥३२॥
परी ते केवळ अंतर्ज्ञानी ।
ऐसी वार्ता ऐकली कानी ।
हे सत्य तरी येवोनी ।
आताच देती दर्शना ॥३३॥
रावमुखातून वाणी निघाली ।
तोचि यतिमूर्ती पुढे ठेली ।
सकल सभा चकित झाली ।
मति गुंगली रायाची ॥३४॥
सिंहासनाखाली उतरोन ।
राव घाली लोटांगण ।
प्रेमाश्रूंनी भरले नयन ।
कंठ झाला सद्गदित ॥३५॥
दृढ घातली मिठी चरणी ।
चरण धुतले नेत्राश्रूंनी ।
मग तया हस्तकी धरोनी ।
आसनावरी बैसविले ॥३६॥
खूण पटली अंतरी ।
स्वामी केवळ अवतारी ।
अभक्ती पळोनी गेली दूरी ।
चरणी भक्ती जडली तै ॥३७॥
सकळ सभा आनंदली ।
समस्ती पाऊले वंदिली ।
षोडशोपचारे पूजिली ।
स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥
निराकार आणि निर्गुण ।
भक्तांसाठी झाले सगुण ।
तयांच्या पादुका शिरी धरोन ।
विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥
इति श्रीस्वामी चरित्र सारामृत ।
नाना प्राकृत कथा संमत ।
प्रेमळ भक्त परिसोत ।
तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा
Similar Post |
---|
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका -Swami Charitra Saramrut Index |
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा Swami Charitra Saramrut Adhyay 2 |
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा Swami Charitra Saramrut Adhyay 4 |