Menu Close

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा Swami Charitra Saramrut Adhyay 12

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा (Swami Charitra Saramrut Adhyay 12) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.

Swami Charitra Saramrut Adhyay 12

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा Swami Charitra Saramrut Adhyay 12

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥

भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥

गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी । पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद पोटी नच मावे ॥३॥

त्या दिवशी श्री समर्थ । होते खासबागेत । यात्रा आली बहुत । गर्दी झाली श्रींजवळी ॥४॥

बाळाप्पाचे मानसी । तेव्ही चिंता पडली ऐशी । ऐशा गर्दीत आपणासी । दर्शन कैसे होईल ॥५॥

परी दर्शन घेतल्याविण । आज करु नये भोजन । बाळाप्पाचे तनमन । स्वामीचरणी लागले ॥६॥

दर्शनेच्छा उत्कट चित्ती । खडीसाखर घेवोनी हाती । गर्दीमाजी प्रवेश करिती । स्वामी सान्निध पातले ॥७॥

आजानुबाहू सुहास्यवदन । श्रीस्वामीमूर्ती पाहोन । बाळाप्पाने धावोन । दृढ चरण धरियेले ॥८॥

कंठ सद़्गदित जाहला । चरणी भाळ ठेविला । क्षणैक मीपण विसरला । परम तोषला मानसी ॥९॥

गंगा मिनली सागरी । जैसे तरंग जलाभीतरी । तैसे बाळाप्पा ते अवसरी । स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥

मधुस्तव भ्रमर जैसा । कमलपुष्प न सोडी सहसा । स्वामीचरणी बाळाप्पा तैसा । दृढ जडला स्वभावे ॥११॥

येवोनिया भानावरती । श्रीचरणांची सोडिली मिठी । ब्रह्मानंद न मावे पोटी । स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥

श्री स्वामी समर्थ त्या वेळी । पडले होते भूतळी । उठोनिया काय केली । लीला एक विचित्र ॥१३॥

सर्व वृक्षांसी आलिंगन । दिले त्यांनी प्रेमेकरोन । बाळाप्पावरचे प्रेम । ऐशी कृतीने दाविले ॥१४॥

धन्यता मानोनी मनी । बाळाप्पा निघाले तेथोनी । परी तयांचे श्रीचरणी । चित्त गुंतले अखंड ॥१५॥

त्यासवे एक जहागिरदार । ते होते बिऱ्हाडावर । स्वयंपाक करोनी तयार । म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥

बाळाप्पा दर्शन करोन । आले बिऱ्हाडी परतोन । जहागिरदारे नैवेद्य काढोन । बाळाप्पा हाती दिधला ॥१७॥

म्हणती जाउनी स्वामींसी । अर्पण करा नैवेद्यासी । अवश्य म्हणोनी तयांसी । बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥

म्हणती नैवेद्य दाखवून । मग करु प्रसाद भक्षण । मार्गी तयांसी वर्तमान । विदीत एक जाहले ॥१९॥

या समयी श्री समर्थ । असती नृप मंदिरात । राजाज्ञेवाचूनी तेथ । प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥

ऐसे ऐकूनी वर्तमान । बाळाप्पा मनी झाले खिन्न । म्हणती आज नैवेद्यार्पण । आपल्या हस्ते नोहेची ॥२१॥

मार्गावरुनी परतले । सत्वर बिऱ्हाडावरती आले । तेथे नैवेद्यार्पण केले । मग सारिले भोजन ॥२२॥

नित्य प्रातःकाळी उठोन । षट्कर्मांते आचरोन । घेवोनी स्वामी दर्शन । जपालागी बैसावे ॥२३॥

श्री शंकर उपास्य दैवत । त्याचे करावे पूजन नित्य । माध्यान्ही येता आदित्य । जपानुष्ठान आटपावे ॥२४॥

करी झोळी घेवोनी । श्री स्वामींजवळी येवोन । मस्तक ठेवोनी चरणी । जावे भिक्षेकारणे ॥२५॥

मागोनिया मधुकरी । मग यावे बिऱ्हाडावरी । जी मिळेल भाजीभाकरी । त्याने पोट भरावे ॥२६॥

घ्यावे स्वामी दर्शन । मग करावे अनुष्ठान । ऐशा प्रकारे करोन । अक्कलकोटी राहिले ॥२७॥

चोळाप्पा आदीकरोन । सेवेकरी बहुतजण । त्यांत सुंदराबाई म्हणून । मुख्य होती त्या वेळी ॥२८॥

आपण व्हावे सेवेकरी । इच्छा बाळाप्पाचे अंतरी । सुंदराबाईचिये करी । आधिपत्य सर्व असे ॥२९॥

एके दिवशी तयासी । बाई आज्ञा करी ऐशी । आपणही श्रीसेवेसी । करीत जावे आनंदे ॥३०॥

बाळाप्पा मनी आनंदला । म्हणे सुदिन आज उगवला । सद़्गुरुसेवेचा लाभ झाला । जाहले सार्थक जन्माचे ॥३१॥

बहुत जण सेवेकरी । बाई मुख्य त्यांमाझारी । सर्व अधिकार तिच्या करी । व्यवस्थेचा होता पै ॥३२॥

मी प्रिय बहु स्वामींसी । ऐसा अभिमान तियेसी । गर्वभरे इतरांसी । तुच्छ मानू लागली ॥३३॥

या कारणे आपसात । भांडणे होती सदोदित । स्वामीसेवेची तेथ । अव्यवस्था होतसे ॥३४॥

हे बाळाप्पांनी पाहोन । नाना युक्ती योजून । मोडुनि टाकिले भांडण । एकचित्त सर्व केले ॥३५॥

कोठेही असता समर्थ । पूजादिक व्हावया यथार्थ । तत्संबंधी सर्व साहित्य । बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥

समर्थांच्या येता चित्ती । अरण्यांतही वस्ती करिती । परी तेथेही पूजा आरती । नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥

बाळाप्पांची प्रेमळ भक्ती । पाहुनी संतोष स्वामीप्रती । दृढ भाव धरुनी चित्ती । सेवा करिती आनंदे ॥३८॥

ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास । व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥

बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र । तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥

भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून । पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥

पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण । विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥

स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी । सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥

आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी । तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥

प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी । मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥

हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी । आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥

तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती । परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥

बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण । हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥

पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य । यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥

एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून । न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥

तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली । ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥

समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात । तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥

स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन । ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥

त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती । बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥

तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार । बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥

श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी । दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥

आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान । ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥

बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन । करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥

स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी । परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥

श्रीपादभट्टे एके दिवशी । विचारले समर्थांसी । कुलदेवतेच्या दर्शनासी । जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥

ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत । कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥

तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला । मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥

तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण । श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥

म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी । तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥

तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी । दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥

चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी । येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥

भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला । महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥

स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती । कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥

जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम । विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥

इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा


Similar Post
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Swami Charitra Saramrut Index
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा Swami Charitra Saramrut Adhyay 11
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा Swami Charitra Saramrut Adhyay 13