सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला?
आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला!
आई आवडे अधिक मला!
गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला!
आवडती रे वडील मला!
घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन् चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला!
आवडती रे वडील मला!
कुशीत घेता रात्री आई, थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला!
आई आवडे अधिक मला!
निजता सांगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिश्या चिमुकलया करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला!
आवडती रे वडील मला!
आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला!
आई आवडे अधिक मला!
तया रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला!
आवडती रे वडील मला!
बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला!
आई आवडे अधिक मला!
बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई!
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला!
आवडती रे वडील मला!
धडा शीक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला!
आवडती रे वडील मला!
– ग. दि. माडगूळकर
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF