Menu Close

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी – Re Hind Bandhava Thamb Ya Sthali

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाँशीवाली ll धुll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंदा स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रूंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

भा. रा. तांबे

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF