बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरुंगि जल पिणें
तेथ अडे काय जलाशयनदांविणें ?
पौरुषासी अटक गमे जेथ दुःसहा॥१॥
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावाची भव्य दिव्य आगरे
रत्ना वा मौक्तिकांही मूल्य मुळीं नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचें शीलहि उजवळी गृहा गृहा॥२॥
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमुचेंही शौर्य मावळे
दौडत चहूंकडूनि जवें स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा॥३॥
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तीयुक्ती एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा॥४॥
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ती धृतिहि देत अंतरी ठसो
वंचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणिं ही स्पृहा॥५॥
– महाराष्ट्र गीत
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF
Jay jay maharashtra maza nahi ka??
Lavkarach taknar aahot.