आज सकाळीच बऱ्याच कामानिमित्त घराबाहेर पडलो. आज शनिवार आहे असे माहीत होते. पण रस्त्याने जाताना असे वाटून गेलं की आज जरूर शनी अमावस्या असावी. जिकडे बघावे तिकडे रस्त्यावर लिंबू आणि मिरची पडलेली. लिंबू तसा रस निघून गेलेला कळकट, मिरची जीव गेल्यागत मळकट, आणि त्यासोबत कुठे कुठे काळी बाहुली सुद्धा.
आमच्या लहानपणी बरेच अंधश्रद्धाळू कयास आम्हाला सांगितले जायचे त्यापैकी हा पण एक कयास होता. “लिंबू मिरची किंवा काळ्या बाहुलीला ओलांडू नये, त्यावर पाय देऊ नये, परपीडा घरात येते”. तीच एक भीती मनाशी घेऊन आम्ही लहान मुले कित्येक दिवस काळी बाहुली पहिली की लांबूनच पळत सुटायचो.
शिक्षणामुळे नंतर कळलं की असे काही नसते. पण तरीही आज आपले शिकलेले अभियंते मित्र आपल्या चारचाकीला काळी बाहुली आणि लिंबू मिरची टांगतात. ट्रॅफिक सिग्नल, गल्लीच्या तोंडावर एक छोटा टेबल असे या लिंबू मिरची वाल्यांचे प्रशस्त मॉल असते. मॉलच ते, दिसले की घ्यायला पाहिजे असे वाटते. दिसत नाही तो पर्यंत त्याची गरज भासत नाही.
लहान असताना भावाला पायाला काहीतरी जखम झाली, पुरळ असल्यासारखी. नंतर त्यातले पस लागून दुसऱ्या पायलाही तशीच जखम झाली. भाऊ तसा खेळाडू असल्याने, दिवसभर इकडे तिकडे भटकत असल्याने त्याची ती जखम औषध घेऊनही काही बरी होत नव्हती. तस्सा आमच्या आजीने सूर लावला, “हा नक्की काहीतरी ओलांडून आला असेल”. आजीबरोबर माझे सौम्य भांडण झाले पण आजी काही बधली नाही, तिने त्याच्या गळ्याला मंतरलेला ताईत बांधलाच.
असो. आज माझ्यासकट बरीच लोक कमीत कमी दहा लिंबू मिरच्या आणि दोन-तीन बाहुल्या तरी चिरडून आले असतील. देव त्यांचं रक्षण करो.