गुरुचरित्र चौथ्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 4 in Marathi) भगवान श्रीदत्तात्रेयांच्या अवताराचे वर्णन आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की देव त्याच्या भक्तांच्या कल्याणासाठी वेळोवेळी कसा अवतार घेतो. आपण गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुच्या दर्शनाने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजण्यास मदत होते आणि आपल्याला जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते.
गुरूचरित्र अध्याय चौथा – Gurucharitra Adhyay 4
श्रीगणेशाय नमः ॥
ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥
ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥
प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥
पूर्वी सृष्टि नव्हती काही । जलमय होते सर्वही । आपोनारायण म्हणोनि पाही । वेद बोलती याची कारणे ॥४॥
उदक आपोनारायण । सर्वां ठायी वास पूर्ण । बुद्धिसंभवप्रपंचगुण । हिरण्यगर्भ अंड निर्मिले ॥५॥
तेचि ब्रह्मांड नाम जाहले । रजोगुने ब्रह्मासि निर्मिले । हिरण्यगर्भ नाम पावले । देवतावर्ष एक होते ॥६॥
तेचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकले झाली ऐका । एक शकल भूमिका । होऊनि ठेली शकले दोनी ॥७॥
ब्रह्मा तेथे उपजोन । रचिले चवदाहि भुवन । दाही दिशा मानसवचन । काळ कामक्रोधादि सकळ ॥८॥
सृष्टि रचावयासी । सप्त पुत्र उपजवी मानसी । नामे सांगेन परियेसी । सात जण ब्रह्मपुत्र ॥९॥
मरीचि अत्रि आंगिरस । पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ । सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ । सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण ॥१०॥
सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि । तेथूनि पीठ गुरुसंतति । सांगेन ऐका एकचित्ती । सभाग्य नामधारका ॥११॥
ऋषि अत्रीची भार्या । नाम तिचे अनसूया । पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥१२॥
तिचे सौंदर्यलक्षण । वर्णू शके ऐसा कोण । जिचा पुत्र चंद्र आपण । तिचे रूप काय सांगो ॥१३॥
पतिसेवा करी बहुत । समस्त सुरवर भयाभीत । स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित । म्हणोनि चिंतिती मानसी ॥१४॥
इंद्रादि सुरवर मिळुनि । त्रयमूर्तिपासी जाउनी । विनविताती प्रकाशोनी । आचार अत्रि ऋषीचा ॥१५॥
इंद्र म्हणे स्वामिया । पतिव्रता स्त्री अनसूया । आचार तिचा सांगो काया । तुम्हाप्रती विस्तारोनि ॥१६॥
पतिसेवा करी भक्तीसी । मनोवाक्कायमानसी । अतिथिपूजा महाहर्षी । विमुख नव्हे कवणे काळी ॥१७॥
तिचा आचार देखोनि । सूर्य भीतसे गगनी । उष्ण तिजला होईल म्हणोनि । मंद मंद तपतसे ॥१८॥
अग्नि झाला भयाभीत । शीतळ असे वर्तत । वायु झाला भयचकित । मंद मंद वर्ततसे ॥१९॥
भूमि आपण भिऊनि देखा । नम्र जाहली पादुका । शाप देईल म्हणोनि ऐका । समस्त आम्ही भीतसो ॥२०॥
नेणो घेईल कवण स्थान । कोण्या देवाचे हिरोन । एखाद्याते वर देता जाण । तोही आमुते मारू शके ॥२१॥
यासि करावा उपाय । तू जगदात्मा देवराय । जाईल आमुचा स्वर्गठाय । म्हणोनि आलो तुम्हा सांगो ॥२२॥
न कराल जरी उपाय यासी । सेवा करू आम्ही तिसी । तिचे द्वारी अहर्निशी । राहू चित्त धरोनिया ॥२३॥
ऐसे ऐकोनि त्रयमूर्ति । महाक्रोधे कापती । चला जाऊ पाहू कैसी सती । म्हणती आहे पतिव्रता ॥२४॥
वतभंग करूनी तिसी । ठेवूनि येऊ भूमीसी । अथवा वैवस्वतालयासी । पाठवू म्हणोनि निघाले ॥२५॥
सत्त्व पहावया सतीचे । त्रयमूर्ती वेष भिक्षुकाचे । आश्रमा आले अत्रीचे । अभ्यागत होऊनिया ॥२६॥
ऋषि करू गेला अनुष्ठान । मागे आले त्रयमूर्ति आपण । अनसूयेसी आश्वासून । अतिथि आपण आलो म्हणती ॥२७॥
क्षुधे बहु पीडोन । आम्ही आलो ब्राह्मण । त्वरित द्यावे सती अन्न । अथवा जाऊ आणिका ठाया ॥२८॥
सदा तुमचे आश्रमांत । संतर्पण अभ्यागत । ऐको आली कीर्ति विख्यात । म्हणोनि आलो अनसूये ॥२९॥
इच्छाभोजनदान तुम्ही । देता म्हणोनि ऐकिले आम्ही । ठाकोनि आलो याचि कामी । इच्छाभोजन मागावाया ॥३०॥
इतुके ऐकोनि अनसूया । नमन केले तत्क्षणिया । बैसकार करूनिया । क्षालन केले चरण त्यांचे ॥३१॥
अर्ध्य पाद्य देऊनि त्यांसी । गंधाक्षतापुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी । आरोगण सारिजे ॥३२॥
अतिथी म्हणे तये वेळी । करोनि आलो आंघोळी । ऋषि येती बहुता वेळी । त्वरित आम्हा भोजन द्यावे ॥३३॥
वासना पाहोनि अतिथीते । काय केले पतिव्रते । ठाय घातले त्वरिते । बैसकार केला देखा ॥३४॥
बैसवोनिया पाटावरी । घृतेसी पात्र अभिधारी । घेवोनी आली आपण क्षीरी । शाक पाक तये वेळी ॥३५॥
तिसी म्हणती अहो नारी । आम्ही अतिथी आलो दुरी । देखोनि तुझे स्वरूप सुंदरी । अभीष्ट मानसी आणिक वसे ॥३६॥
नग्न होवोनि आम्हांसी । अन्न वाढावे परियेसी । अथवा काय निरोप देशी । आम्ही जाऊ नाही तरी ॥३७॥
ऐकोनि द्विजांचे वचन । अनसूया करी चिंतन । आले विप्र पहावया मन । कारणिक पुरुष होतील ॥३८॥
पतिव्रता शिरोमणी । विचार करी अंतःकरणी । अतिथी विमुख तरी हानि । निरोप केवी उल्लंघू ॥३९॥
माझे मन असे निर्मळ । काय करील मन्मथ खळ । पतीचे असे तपफळ । तारील मज म्हणतसे ॥४०॥
ऐसे विचारोनि मानसी । तथास्तु म्हणे तयांसी । भोजन करावे स्वस्थ चित्तेसी । नग्न वाढीन म्हणतसे ॥४१॥
पाकस्थाना जाऊनि आपण । चिंतन करी पतीचे चरण । वस्त्र फेडोनि नग्न । म्हणे अतिथी बाळे माझी ॥४२॥
नग्न होवोनी सती देखा । घेऊनि आली अन्नोदका । तव तेचि झाले बाळका । ठायांपुढे लोळती ॥४३॥
बाळे देखोनि अनसूया । भयचकित होवोनिया । पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली तया बाळकांजवळी ॥४४॥
रुदन करिती तिन्ही बाळे । अनसूया रहावी वेळोवेळ । क्षुधार्त झाली केवळ । म्हणोनि कडिये घेतसे ॥४५॥
कडिये घेवोनि बाळकांसी । स्तनपान करवी अतिहर्षी । एका सांडोनि एकाशी । क्षुधा निवारण करितसे ॥४६॥
पाहे पा नवल काय घडले । त्रयमूर्तीची झाली बाळे । स्तनपान मात्रे तोषले । तपफळ ऐसे पतिव्रतेचे ॥४७॥
ज्याचे उदरी चौदा भुवन । सप्त समुद्र वडवाग्नि जाण । त्याची क्षुधा निवारण । पतिव्रतास्तनपानी ॥४८॥
चतुर्मुख ब्रह्मयासी । सृष्टि करणे अहर्निशी । त्याची क्षुधा स्तनपानेसी । केवी झाली निवारण ॥४९॥
भाळाक्ष कर्पूर गौर । पंचवक्त्र काळाग्निरुद्र । स्तनपान करवी अनसूया सुंदर । तपस्वी अत्री ऐसा ॥५०॥
अनसूया अत्रिरमणी । नव्हती ऐशी कोणी । त्रयमूर्तीची झाली जननी । ख्याति झाली त्रिभुवनांत ॥५१॥
कडिये घेवोनि बाळकांसी । खेळवीतसे तिघांसी । घालोनिया पाळण्यासी । पर्यंदे गाई तये वेळी ॥५२॥
पर्यंदे गाय नानापरी । उपनिषदार्थ अतिकुसरी । अतिउल्हासे सप्त स्वरी । संबोखितसे त्रिमूर्तीसी ॥५३॥
इतुके होता तये वेळी । माध्यान्हवेळ अतिथिकाळी । अत्रि ऋषि अतिनिर्मळी । आला आपुले आश्रमा ॥५४॥
घरामाजी अवलोकिता । तव देखिली अनसूया गाता । कैची बाळे ऐसे म्हणता । पुसतसे स्त्रियेसी ॥५५॥
तिणे सांगितला वृत्तान्त । ऋषि ज्ञानी असे पाहात । त्रयमूर्ति हेचि म्हणत । नमस्कार करितसे ॥५६॥
नमस्कारिता अत्रि देखा । संतोष विष्णुवृषनायका । आनंद झाला चतुर्मुखा । प्रसन्न झाले तये वेळी ॥५७॥
बाळ राहिले पाळणेसी । निजमूर्ति ठाकले सन्मुखेसी । साधु साधु अत्रि ऋषि । अनसूया सत्य पतिव्रता ॥५८॥
तुष्टलो तुझे भक्तीसी । माग मनी वर इच्छिसी । अत्रि म्हणे सतीसी । जे वांछिसी माग आता ॥५९॥
अनसूया म्हणे ऋषीसी । प्राणेश्वरा तूचि होसी । देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता ॥६०॥
तिघे बाळक माझे घरी । रहावे माझे पुत्रापरी । हेचि मागतो निर्धारी । त्रयमूर्ति आपणां एकरूपा ॥६१॥
ऐसे वचन ऐकोनि । वर दिधला मूर्ती तिन्ही । राहती बाळके म्हणोनि । आपण गेले निजालयासी ॥६२॥
त्रिमूर्ति राहिले त्यांचे घरी । अनसूया पोशी बाळकापरी । नामे ठेविली प्रीतिकरी । त्रिवर्गांची परियेसा ॥६३॥
ब्रह्मामूर्ति चंद्र झाला । विष्णुमूर्ति दत्त केवळा । ईश्वर तो दुर्वास नाम पावला । तिघे पुत्र अनसूयेचे ॥६४॥
दुर्वास आणि चंद्र देखा । उभे राहूनि मातेसन्मुखा । निरोप मागती कौतुका । जाऊ तपा निजस्थाना ॥६५॥
दुर्वास म्हणे जननी । आम्ही ऋषि अनुष्ठानी । जाऊ तीर्थे आचरोनि । म्हणोनि निरोप घेतला ॥६६॥ Guru Charitra Adhyay 4
चंद्र म्हणे अहो माते । निरोप द्यावा आम्हा त्वरिते । चंद्रमंडळी वास माते । नित्य दर्शन तुमचे चरणी ॥६७॥
तिसरा दत्त विष्णुमूर्ति । असेल तुमचे धरोनि चित्ती । त्रयमूर्ति तोचि निश्चिती । म्हणोनि सांगती तियेसी ॥६८॥
त्रयमूर्ति जाण तोचि दत्त । सर्व विष्णुमय जगत । राहील तुमचे धरोनि चित्त । विष्णुमूर्ति दत्तात्रेय ॥६९॥
त्रयमूर्ति ऐक्य होऊन । दत्तात्रेय राहिला आपण । दुर्वास चंद्र निरोप घेऊन । गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ॥७०॥
अनसूयेचे घरी देखा । त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका । नाम दत्तात्रेय एका । मूळपीठ श्रीगुरूचे ॥७१॥
ऐशापरी सिद्ध देखा । कथा सांगे नामधारका । संतोषे प्रश्न करी अनेका । पुसतसे सिद्धासी ॥७२॥
जय सिद्ध योगीश्वरा । भक्तजनमनोहरा । तारक संसारसागरा । ज्ञानमूर्ति कृपासिंधो ॥७३॥ Guru Charitra Adhyay 4
तुझेनि प्रसादे मज । ज्ञान उपजले सहज । तारक आमुचा योगिराज । विनंती माझी परियेसा ॥७४॥
दत्तात्रेयाचा अवतारू । सांगितला पूर्वापारू । पुढे अवतार जाहले गुरु । कवणेपरी निरोपिजे ॥७५॥
म्हणे सरस्वतीगंगाधरू । पुढील कथेचा विस्तारू । ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥७६॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
ओवीसंख्या ॥७७॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय चौथा
Similar Post |
---|
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Guru Charitra Index |
गुरूचरित्र अध्याय तिसरा – Guru Charitra Adhyay 3 in Marathi |
गुरूचरित्र अध्याय पाचवा – Guru Charitra Adhyay 5 in Marathi |