गुरुचरित्राच्या ३४ व्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 34 in Marathi) गुरूंच्या कृपेने जीवघेण्या प्रसंगांचे निराकरण कसे होते आणि आयुर्मान वाढते हे स्पष्ट केले आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपण गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रकरणात, आपण एका राजपुत्राचा जीवघेण्या धोक्यापासून कसा बचाव होतो ते पाहतो. राजकुमाराला एक गंभीर आजार झाला होता आणि तो मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. राजाने सर्व डॉक्टरांना बोलावले, परंतु कोणीही राजकुमाराला बरे करू शकले नाही.
गुरूचरित्र अध्याय चौतिसावा – Gurucharitra Adhyay 34
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐसा पराशर ऋषि । तया काश्मीर राजासी । रुद्राक्षमहिमा निरोपी ॥१॥
तया राजकुमाराचे । विस्तारोनि सुधावाचे । सांगितले पूर्वजन्माचे । चरित्र सर्व ॥२॥
संतोषोनि तो राजा । लागला त्याचे पादांबुजा । कर जोडोनिया वोजा । विनवीतसे परियेसा ॥३॥
राजा म्हणे ऋषीश्वरासी । स्वामी निरोपिले आम्हांसी । पुण्य घडले आत्मजासी । रुद्राक्षधारणे करोनिया ॥४॥
पूर्वजन्मी अज्ञानेसी । रुद्राक्ष बांधिले तिणे वेश्यी । त्या पुण्ये दशा ऐशी । प्राप्त झाली स्वामिया ॥५॥
ज्ञानवंत आता जाण । करिती रुद्राक्षधारण । पुढे यांचे लक्षण । कवणेपरी वर्ततील ॥६॥
भूतभविष्य-वर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि । सांगा स्वामी विस्तारोनि । माझेनि मंत्रिकुमराचे ॥७॥
ऐकोनि रायाचे वचन । सांगे ऋषि विस्तारोन । दोघा कुमारकांचे लक्षण । अपूर्व असे परियेसा ॥८॥
ऋषि म्हणे रायासी । पुत्रभविष्य पुससी । ऐकोनि दुःख पावसी । कवणेपरी सांगावे ॥९॥
राव विनवी तये वेळी । निरोपावे सकळी । उपाय करिसी तात्काळी । दुःखावेगळा तूचि करिसी ॥१०॥
ऐकोनिया ऋषीश्वर । सांगता झाला विस्तार । ऐक राजा तुझा कुमार । बारा वर्षे आयुष्य असे ॥११॥
तया बारा वर्षात । राहिले असती दिवस सात । आठवे दिवसी येईल मृत्यु । तुझ्या पुत्रासी परियेसा ॥१२॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा मूर्च्छित जाहला तत्क्षण । करिता झाला रुदन । अनेकपरी दुःख करित ॥१३॥
ऐकोनि राजा तये वेळी । लागला ऋषीच्या चरणकमळी । राखे राखे तपोबळी । शरणागत मी तुझा ॥१४॥
नानापरी गहिवरत । मुनिवराचे चरण धरित । विनवीतसे स्त्रियांसहित । काय करावे म्हणोनिया ॥१५॥
दयानिधि ऋषीश्वरु । सांगता झाला विचारु । शरण रिघावे जगद्गुरु । उमाकांत शिवासी ॥१६॥
मनीचे भय त्यजुनी । असावे आता शिवध्यानी । तो राखील शूलपाणी । आराधावे तयाते ॥१७॥
जिंकावया काळासी । उपाय असे परियेसी । सांगेन तुम्हा विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥१८॥
स्वर्ग मृत्य पाताळासी । देव एक व्योमकेशी । निष्कलंक परियेसी । चिदानंदस्वरूप देखा ॥१९॥
ऐसा देव मूर्तिमंत । रजोरूपे ब्रह्मा सृजत । सृष्टि करणार समर्थ । वेद चारी निर्मिले ॥२०॥
तया चतुर्वेदांसी । दिधले तया विरंचीसी । आत्मतत्त्वसंग्रहासी । ठेविली होती उपनिषदे ॥२१॥
भक्तवत्सल सर्वेश्वर । तेणे दिधले वेदसार । रुद्राध्याय सुंदर । दिधला तया विरंचीसी ॥२२॥
रुद्राध्यायाची महिमा । सांगता असे अनुपमा । याते नाश नाही जाणा । अव्यय असे परियेसा ॥२३॥
पंचतत्त्व शिवात्मक । रुद्राध्याय असे विशेष । ब्रह्मयाने चतुर्मुख । विश्व सृजिले वेदमते ॥२४॥
तया चतुर्मुखी देखा । वेद चारी सांगे निका । वदन दक्षिण कर्ण एका । यजुर्वेद निरूपिला ॥२५॥
तया यजुर्वेदांत । उपनिषदसार ख्यात । रुद्राध्याय विस्तारत । सांगे ब्रह्मा मुनिवरांसी ॥२६॥
समस्त देवऋषींसी । मरीचि अत्रि परियेसी । आणिक सकळ देवांसी । सांगे ब्रह्मा तये वेळी ॥२७॥
तेचि ऋषि पुढे देखा । शिकविती आपुले शिष्यादिका । त्यांचे शिष्य पुढे ऐका । आपुल्या शिष्या शिकविले ॥२८॥
पुढे त्यांचे पुत्रपौत्री । विस्तार झाला जगत्री । शिकविले ऐका पवित्री । रुद्राध्याय भूमीवरी ॥२९॥
त्याहूनि नाही आणिक मंत्र । त्वरित तप साध्य होत । चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा ॥३०॥
नानापरीची पातके । केली असती अनेके । रुद्रजाप्ये सम्यके । भस्म होती परियेसा ॥३१॥
आणिक एक नवल केले । ब्रह्मदेव सृष्टि रचिले । वेदतीर्थ असे भले । स्नानपान करावे ॥३२॥
त्याणे कर्मे परिहरती । संसार होय निष्कृति । जे जन श्रीगुरु भजती । ते तरती भवसागर ॥३३॥
सुकृत अथवा दुष्कृत । जे जे कीजे आपुले हीत । जैसे पेरिले असे शेत । तेचि उगवे परियेसा ॥३४॥
सृष्टिधर्मप्रवृत्तीसी । ब्रह्मे रचिले परियेसी । आपुले वक्षपृष्ठेसी । धर्माधर्म उपजवी ॥३५॥
जे जन धर्म करिती । इह पर सौख्य पावती । जे अधर्मे रहाटती । पापरूपी तेचि जाणा ॥३६॥
काम क्रोध लोभ जाण । मत्सर दंभ परिपूर्ण । अधर्माचे सुत जाण । इतुके नरकनायक ॥३७॥
गुरुतल्पगसुरापानी । कामुक जे परिपुर्णी । पुल्कस्वरूप अंतःकरणी । तेचि प्रधान नरकाचे ॥३८॥
क्रोधे पितृवधी देखा । मातृवधी असती जे का । ब्रह्महत्यादि पातका । कन्याविक्रयी जे जन ॥३९॥
इतुके क्रोधापासूनि । उद्भव झाले म्हणोनि । पुत्र जहाले या कारणी । क्रोधसुत तया म्हणती ॥४०॥
देवद्विजस्वहरण देखा । ब्रह्मस्व घेवोनि नेदी जो का । सुवर्णतस्कर ऐका । लोभपुत्र तया नाव ॥४१॥
ऐशा पातकांसी । यमे निरोपिले परियेसी । तुम्ही जावोनि मृत्युलोकासी । रहाटी करणे आपुले गुणे ॥४२॥
तुम्हासवे भृत्य देखा । देईन सर्व उपपातका । सकळ पाठवावे नरका । जे जन असती भूमीवरी ॥४३॥
यमाची आज्ञा घेवोनि । आली पातके मेदिनी । रुद्रजपत्याते देखोनि । पळोनि गेली परियेसा ॥४४॥
जावोनिया यमाप्रती । महापातके विनविती । गेलो होतो आम्ही क्षिती । भयचकित होउनी आलो ॥४५॥
जय जयाजी यमराया । आम्ही पावलो महाभया । किंकर तुमचे म्हणोनिया । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥४६॥
आम्ही तुमचे आज्ञाधारी । निरोपे गेलो धरित्री । पोळलो होतो वह्निपुरी । रुद्रजप ऐकोनि ॥४७॥
क्षितीवरी रहावयासी । शक्ति नाही आम्हांसी । पाहता रुद्रजपासी । पोळलो आम्ही स्वामिया ॥४८॥
ग्रामी खेटी नदीतीरी । वसती द्विज महानगरी । देवालयी पुण्यक्षेत्री । रुद्रजप करिताती ॥४९॥
कवणेपरी आम्हा गति । जाऊ न शको आम्ही क्षिती । रुद्रजप जन करिताती । तया ग्रामा जाऊ न शको ॥५०॥
आम्ही जातो नरापासी । वर्तवितो पातकासी । होती नर महादोषी । मिति नाही परियेसा ॥५१॥
प्रायश्चित्तसहस्त्रेसी जो का नव्हे पुण्यपुरुषी । तैसा द्विज परियेसी । पुण्यवंत होतसे ॥५२॥
एखादे समयी भक्तीसी । म्हणती रुद्राध्यायासी । तो होतो पुण्यराशि । पाहता त्यासी भय वाटे ॥५३॥
तैसा पापी महाघोर । पुण्यवंत होतो नर । भूमीवरी कैसे आचार । आम्हा कष्ट होतसे ॥५४॥
काळकूट महाविष । रुद्रजाप्य आम्हा दिसे । शक्ति नाही आम्हांसी । भूमीवरी जावया ॥५५॥
रुद्रजाप्यविषासी । शमन करावया शक्त होसी । रक्ष गा रक्ष गा आम्हांसी । विनविताती पातके ॥५६॥
इतुके बोलती पातके । ऐकोनि यममाथा तुके । कोपे निघाला तवके । ब्रह्मलोका तये वेळी ॥५७॥
जाऊनिया ब्रह्मयापासी । विनवी यम तयासी । जय जयाजी कमळवासी । सृष्टिकारी चतुर्मुखा ॥५८॥
आम्ही तुझे शरणागत । तुझे आज्ञे कार्य करित । पापी नराते आणित । नरकालयाकारणे ॥५९॥
महापातकी नरांसी । आणू पाठवितो भृत्यांसी । पातकी होय पुण्यराशि । रुद्रजप करूनिया ॥६०॥
समस्त जाती स्वर्गासी । महापातकी अतिदोषी । नाश केला पातकांसी । शून्य जहाले नरकालय ॥६१॥
नरक शून्य झाले सकळ । माझे राज्य निष्फळ । समस्त जहाले कैवल्य । उत्पत्ति राहिली स्वामिया ॥६२॥
याते उपाय करावयासी । देवा तू समर्थ होसी । राखे राखे आम्हांसी । राज्य गेले स्वामिया ॥६३॥
तुम्ही होउनी मनुष्यासी । स्वामित्व दिधले भरवसी । रुद्राध्यायानिधानेसी । कासया साधन दिधलेत ॥६४॥
याकारणे मनुष्य लोकी । नाही पापलेश । रुद्रजपे विशेष । पातके जळती अनेक ॥६५॥
येणेपरी यम देखा । विनविता झाला चतुर्मुखा । प्रत्युत्तर देतसे ऐका । ब्रह्मदेव यमासी ॥६६॥
अभक्तीने दुर्मदेसी । रुद्रजप करिती यासी । अज्ञानी लोक तामसी । उभ्यानी निजूनी पढती नर ॥६७॥
त्याते अधिक पापे घडती । ते दंडावे तुवा त्वरिती । जे का भावार्थे पढती । ते त्वा सर्वदा वर्जावे ॥६८॥
बाधू नका तुम्ही ऐका । सांगावे ऐसे पातका । रुद्रजपे पुण्य विशेखा । जे जन पढती भक्तीसी ॥६९॥
पूर्वजन्मी पापे करिती । अल्पायुषी होऊनि उपजती । तया पापा होय निष्कृति । रुद्रजपेकरूनिया ॥७०॥
तैसे अल्पायुषी नरे । रुद्रजप करिता बरे । पापे जाती निर्धारे । दीर्घायु होय तो देखा ॥७१॥
तेजो वर्चस् बल धृति । आयुरारोग्य ज्ञान संपत्ति । रुद्रजपे वर्धती । ऐक यमा एकचित्ते ॥७२॥
रुद्रजपमंत्रेसी । स्नान करविती ईश्वरासी । तेचि उदक भक्तीसी । जे जन करिती स्नानपान ॥७३॥
त्याते मृत्युभय नाही । आणिक एक नवल पाही । रुद्रजपे पुण्य देही । स्थिर जीव पुण्य असे ॥७४॥
अतिरुद्र जपोनि उदकासी । स्नान केल्या वरांसी । भीतसे मृत्यु त्यासी । तेही तरती भवार्णवी ॥७५॥
शतरुद्र अभिषेकासी । पूजा करिती महेशासी । ते जन होती शतायुषी । पापनिर्मुक्त परियेसा ॥७६॥
ऐसे जाणोनि मानसी । सांगे आपुले दूतासी । रुद्र जपता विप्रांसी । बाधू नको म्हणे ब्रह्मा ॥७७॥
ऐकोनि ब्रह्मयाचे वचना । यम आला आपुले स्थाना । म्हणोनि पराशरे जाणा । निरोपिले रायासी ॥७८॥
आता तुझ्या कुमारासी । उपाय सांगेन परियेसी । दशसहस्त्र रुद्रेसी । स्नपन करी शिवाते ॥७९॥
दहा सहस्त्र वर्षांवरी । तव पुत्र राज्य करी । इंद्रासमान धुरंधरी । कीर्तिवंत अपार ॥८०॥
त्याचे राज्याश्रियेसी । अपाय नसे निश्चयेसी । अकंटक संतोषी । राज्य करी तुझा सुत ॥८१॥
बोलवावे शत विप्रांसी । जे का विद्वज्जन परियेसी । लावावे ज्ञानी अनुष्ठानासी । तात्काळ तुवा रुद्राच्या ॥८२॥
ऐशा विप्राकरवी देखा । शिवासीकरी अभिषेका । आयुष्य वर्धेल कुमारका । सद्यःश्रेय होईल ॥८३॥
येणेपरी रायासी । सांगे पराशर ऋषि । राये महा आनंदेसी । आयुष्य वर्धना आरंभ केला ॥८४॥
ऐसा ऋषि पराशर । उपदेशितांची द्विजवर । बोलावोनिया सर्व संभार । पुरवीतसे ब्राह्मणांसी ॥८५॥
शतसंख्याक कलशांसी । विधिपूर्वक शिवासी । पुण्यवृक्षतळेसी । अभिषेक करवितसे ॥८६॥
त्याचिया जळे पुत्रासी । स्नान करवी प्रतिदिवसी । सप्त दिन येणे विधींसी । आराधिला ईश्वर ॥८७॥
अवधी जहाली दिवस सात । बाळ पडिला निचेष्टित । पराशरे येवोनि त्वरित । उदकेसी सिंचिले ॥८८॥
तये वेळी अवचित । वाक्य जहाले अदृश्यत । सवेचि दिसे अद्भुत । दंडहस्त महापुरुष ॥८९॥
महादंष्ट्र भयचकित । आले होते यमदूत । समस्त द्विजवर रुद्र पढत । मंत्राक्षता देताती ॥९०॥
मंत्राक्षता ते अवसरी । घातलिया कुमारावरी । दूत पाहती राहूनि दूरी । जवळ येऊ न शकती ॥९१॥
होते महापाश हाती । कुमारावरी टाकू येती । शिवदूत दंडहस्ती । मारू आले यमदूता ॥९२॥
भये चकित यमदूत । पळोनि गेले धावत । पाठी लागले शिवदूत । वेदपुरुषरूप देखा ॥९३॥
येणेपरी द्विजवर । तेणे रक्षिला राजकुमार । आशीर्वाद देती थोर । वेदश्रुति करूनिया ॥९४॥
इतुकियावरी राजकुमार । सावध झाला मन स्थिर । राजयासी आनंद थोर । समारंभ करीतसे ॥९५॥
पूजा करोनि द्विजांसी । देता झाला भोजनासी । तांबूलादि दक्षिणेसी । संतोषविले द्विजवर ॥९६॥
संतोषोनि महाराजा । सभा रचित महावोजा । बैसवोनि समस्ता द्विजा । महाऋषीते सिंहासनी ॥९७॥
राजा आपुले स्त्रियेसहित । घालिता झाला दंडवत । येवोनिया बैसला सभेत । आनंदित मानसी ॥९८॥
त्या समयी ब्रह्मसुत । नारद आला अकस्मात । राजा धावोनि चरण धरीत । सिंहासनी बैसवी ॥९९॥
पूजा करोनि उपचारी । राजयाते नमस्कारी । म्हणे स्वामी या अवसरी । कोठोनि येणे झाले पै ॥१००॥
राजा म्हणे देवऋषी । हिंडता तुम्ही त्रिभुवनासी । काय वर्तले विशेषी । आम्हालागी निरोपिजे ॥१॥
नारद म्हणे रायासी । गेलो होतो कैलासासी । येता देखिले मार्गासी । अपूर्व झाले परियेसा ॥२॥
महामृत्यु दूतांसहित । न्यावया आला तुझे सुत । सवेचि येऊनि शिवदूत । तयालागी पराभविले ॥३॥
यमदूत पळोनि जाती । यमापुढे सर्व सांगती । आम्हा मारिले शिवदूती । कैसे करावे क्षितीत ॥४॥
यम कोपोनि निघाला । वीरभद्रापासी गेला । म्हणे दूता का मार दिला । निरपराधे स्वामिया ॥५॥
निजकर्मानुबंधेसी । राजपुत्र गतायुषी । त्याते आणिता दूतांसी । कासया शिवदूती मारिले ॥६॥
वीरभद्र अतिक्रोधी । म्हणे झाला रुद्रविधि । दहा सहस्त्र वर्षे अवधि । आयुष्य असे राजपुत्रा ॥७॥
न विचारिता चित्रगुप्ता । वाया पाठविले दूता । वोखटे केले शिवदूता । जिवे सोडिले म्हणोनि ॥८॥
बोलावोनि चित्रगुप्ता । आयुष्य विचारीन त्वरिता । म्हणोनि पाठवी दूता । चित्रगुप्त पाचारिला ॥९॥
पुसताति चित्रगुप्तासी । काढोनि पाहे पुत्रासी । बारा वर्षे आयुष्य परियेसी । राजकुमारा लिहिले असे ॥११०॥
तेथेचि लिहिले होते आणिक । दशसहस्त्र वर्षे लेख । पाहोनि यम साशंकित । म्हणे अपराध आमुचा ॥११॥
वीरभद्राते वंदून । यमधर्म गेला परतोन । आम्ही आलो तेथोन । म्हणोनि सांगे नारद ॥१२॥
रुद्रजपे पुण्य करिता । आयुष्य वर्धले तुझे सता । मृत्यु जिंकिला तत्त्वता । पराशरगुरुकृपे ॥१३॥
ऐसे नारद सांगोनि । निघोनि गेला तेथोनि । पराशर महामुनि । निरोप घेतला रायाचा ॥१४॥
समस्त गेले द्विजवर । राजा हर्षे निर्भर । राज्य भोगिले धुरंधर । पुत्रपौत्री महीवरी ॥१५॥
ऐसा रुद्राध्यायमहिमा । पूजा करावी गुरुब्रह्मा । भिणे नलगे काळमहिमा । श्रीगुरु म्हणती दंपतीसी ॥१६॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कथा विस्तारेसी । श्रीगुरु सांगे दंपतीसी । प्रेमभावेकरोनिया ॥१७॥
या कारणे श्रीगुरूसी । प्रीति थोर रुद्राध्यायासी । पूजा करावी भक्तीसी । रुद्राध्यायेकरोनिया ॥१८॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता तरे भवसागर । लाधे चारी पुरुषार्थ ॥१९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राभिषेकमाहात्म्य तेथ । वर्णिले असे अद्भुत । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥१२०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥
ओवीसंख्या ॥१२०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
Watch it on YouTube: गुरुचरित्र अध्याय चौतिसावा
Similar Post |
---|
गुरूचरित्र अनुक्रमणिका – Shri Gurucharitra Index |
गुरूचरित्र अध्याय तेहेतिसावा – Gurucharitra Adhyay 33 in Marathi |
गुरूचरित्र अध्याय पस्तीसावा – Gurucharitra Adhyay 35 in Marathi |