गुरुचरित्र सव्विसाव्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 26 in Marathi) गुरूंना पाहिल्यानंतर शत्रू कसे मित्र होतात हे स्पष्ट करते. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरूकडे सर्व शक्ती आहेत. तो आपल्या शत्रूंना मित्र बनवू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करू शकतो. गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गुरूचरित्र अध्याय सव्विसावा – Gurucharitra Adhyay 26
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमू युक्तीसी । वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती ॥१॥
वेदव्यासासारिखे मुनि । नारायण अवतरोनि । वेद व्यक्त करोनि । व्यास नाम पावला ॥२॥
तेणेही नाही पूर्ण केले । साधारण सांगितले । शिष्य होते चौघे भले । प्रख्यात नामे अवधारा ॥३॥
शिष्यांची नामे देखा । सांगेन विस्तारे ऐका । प्रथम पैल दुजा वैशंपायन निका । तिसरा नामे जैमिनी ॥४॥
चौथा सुमंतु शिष्य । करीन म्हणे विद्याभ्यास । त्यांसी म्हणे वेदव्यास । अशक्य तुम्हा शिकता ॥५॥
एक वेद व्यक्त शिकता । पाहिजे दिनकल्पांता । चारी वेद केवी वाचिता । अनंत वेद असे महिमा ॥६॥
ब्रह्मकल्प तिन्ही फिरले । वर्षोवर्षी वाचले । ब्रह्मचर्य आचरले । वेद पूर्ण शिको म्हणोनि ॥७॥
या वेदांचे आद्यंत । सांगेन ऐका एकचित्त । पूर्वी भारद्वाज विख्यात । ऋषि अभ्यास करीत होता ॥८॥
लवलेश आले त्यासी । पुनरपि करी तपासी । ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी । काय मागशील म्हणोनि ॥९॥
भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी । स्वामी मज प्रसन्न होसी । वेद शिकेन आद्यंतेसी । ब्रह्मचर्य आश्रमी ॥१०॥
वेदान्त मज दावावे । सर्व माते शिकवावे । ऐसे वरदान द्यावे । म्हणोनि चरणी लागला ॥११॥
ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी । मिती नाही वेदांसी । सर्व कैसा शिको म्हणसी । आम्हांसी वेद अगोचर ॥१२॥
तुज दावितो पहा सकळ । करोनि मन निर्मळ । शक्ति झालिया सर्व काळ । अभ्यास करी भारद्वाजा ॥१३॥
ऐसे म्हणोनि ऋषीसी । ब्रह्मा दावी वेदांसी । दिसताती तीन राशी । गिरिरूप होवोनि ॥१४॥
ज्योतिर्मय कोटिसूर्य । पाहता ऋषीस वाटे भय । वेदराशी गिरिमय । केवी शिकू म्हणतसे ॥१५॥
तिन्ही ब्रह्मकल्पांवरी । आचरले आश्रम चारी । वेद शिकले तावन्मात्री । एवढे गिरी केवी शिको ॥१६॥
म्हणोनि भयभीत झाला । ब्रह्मयाचे चरणी लागला । म्हणे स्वामी अशक्य केवळा । क्षमा करणे म्हणतसे ॥१७॥
या वेदाचा आद्यंत । आपण पहावया अशक्त । तूचि जाणसी जगन्नाथ । जे देशी ते घीन ॥१८॥
तू शरणागता आधार । माझे मनी वासना थोर । वेद शिकावे अपार । म्हणोनि आलो तुजपासी ॥१९॥
वेद देखोनि अमित । भय पावले चित्त । जे द्याल उचित । तेचि घेऊ परियेसा ॥२०॥
ऐसे वचन ऐकोन । ब्रह्मदेव संतोषोन । देता झाला मुष्टी तीन । अभ्यासावया ॥२१॥
तीन वेदांचे मंत्रजाळ । वेगळे केले तत्काळ । ऐसे चारी वेद प्रबळ । अभ्यासी भारद्वाजी ॥२२॥
अजून पुरते नाही त्यासी । केवी शिको पाहती वेदासी । सांगा तुम्ही परियेसी । चौघे वाचा चारी वेद ॥२३॥
पूर्ण एक एक वेदासी । शिकता प्रयत्न मोठा त्यासी । सांगेन थोडे तुम्हासी । व्यक्त करावया अभ्यास ॥२४॥
शिष्य म्हणती व्यासासी । एक एक वेद आम्हांसी । विस्तारावे आद्यंतेसी । शक्त्यनुसार अभ्यास करू ॥२५॥
ऐसे विनविती चौघेजण । नमुनी व्यासचरण । कृपा करावी जाण । आम्हांलागी व्यासमुनि ॥२६॥
करुणावचन ऐकोनि । व्यास सांगे संतोषोनि । पैल शिष्य बोलावोनि । ऋग्वेद निरोपित ॥२७॥
ऐक पैल शिष्योत्तमा । सांगेन ऋग्वेदमहिमा । पठण करी गा धर्मकर्मी । ध्यानपूर्वक करोनि ॥२८॥
पैल शिष्य म्हणे व्यासासी । बरवे विस्तारावे आम्हांसी । ध्यानपूर्वक लक्षणेसी । भेदाभेद निरोपावे ॥२९॥
त्यात जे अवश्य आम्हांसी । तेचि शिको भक्तीसी । तू कामधेनु आम्हांसी कृपा करी गा गुरुमूर्ती ॥३०॥
व्यास सांगे पैल शिष्यासी । ऋग्वेदध्यान परियेसी । वर्णरूप व्यक्ति कैसी । भेदाभेद सांगेन ॥३१॥
ऋग्वेदाचा उपवेद । असे प्रख्यात आयुर्वेद । अत्रि गोत्र असे शुद्ध । ब्रह्मा देवता जाणावी ॥३२॥
गायत्री छंदासी । रक्तवर्ण परियेसी । नेत्र पद्मपत्रसदृशी । विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ ॥३३॥
कुंचकेशी श्मश्रु प्रमाण । द्वयरत्नी दीर्घ जाण । ऋग्वेद असे रूपधारण । मूर्ति ध्यावी येणेपरी ॥३४॥
आता भेद सांगेन ऐका । प्रथम चर्चा श्रावका । द्वितीय चर्चा श्रवणिया ऐका । जटा शफट दोनी शाखा ॥३५॥
पाठक्रमशाखा दोनी । सातवा दण्ड म्हणोनि । भेद सप्त निर्गुणी । पाच भेद आणिक असती ॥३६॥
अश्वलायनी शांखायनी । शाकला बाष्कला दोनी । पांचवी माण्डूका म्हणोनि । असे भेद द्वादश ॥३७॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । व्यासे सांगितले शिष्यासी । ऐशिया ऋग्वेदासी । द्वादश भेद विस्तारे ॥३८॥
या कलियुगाभीतरी । म्हणविसी वेद चारी । कीर्ति मिरवा लोकांतरी । अध्यापक म्हणोनि ॥३९॥
तया द्वादश भेदांत । एक शाखा असे विख्यात । सुलक्षण रूप व्यक्त । कोण जाणे सांग मज ॥४०॥
नारायण व्यासमुनि । शाखा द्वादश विस्तारोनि । सांगितल्या संतोषोनि । पैल शिष्यासी ॥४१॥
ऋग्वेदाचे भेद असे । सांगितले वेदव्यासे । श्रीगुरु म्हणती हर्षे । मदोन्मत्त द्विजांसी ॥४२॥
यजुर्वेदविस्तार । सांगेन ऐका अपार । वैशंपायन शिष्य थोर । अभ्यास करी परियेसा ॥४३॥
व्यास म्हणे शिष्यासी । ऐक एकचित्तेसी । सांगतो यजुर्वेदासी । उपवेद धनुर्वेद ॥४४॥
भारद्वाज गोत्र जाणा । अधिदैवत विष्णु जाणा । त्रिष्टुप् छंदासी तुम्ही म्हणा । आता ध्यान सांगेन ॥४५॥
कृशमध्य निर्धारी । स्थूल ग्रीवा कपाल जरी । कांचनवर्ण मनोहरी । नेत्र असती पिंगट ॥४६॥
शरीर ताम्र आदित्यवर्ण । पाच अरत्नी दीर्घ जाण । यजुर्वेदा ऐसे ध्यान । वैशंपायना निर्धारी ॥४७॥
ऐशिया यजुर्वेदासी । असती भेद शायसी । म्हणे व्यास शिष्यासी । सांगेन एकाचिपरी ॥४८॥
प्रथम चरका आहूरका । तिसरा नामकठा ऐका । प्राच्यकठा चतुर्थिका । कपिलकठा पाचवी पै ॥४९॥
सहावी असे अरायणीया । सातवी खुणी वार्तातवीया । श्वेत म्हणिजे जाण आठवीया । श्वेततर नवमी ॥५०॥
मैत्रायणी असे नाम । शाखा असे हो दशम । तिसी भेद उत्तम । असती सात परियेसा ॥५१॥
मानवा दुंदुभा दोनी । तिसरा ऐकेया म्हणोनि । वाराहा नाम चतुर्थपणी । भेद असे परियेसा ॥५२॥
हरिद्रवेया जाण पाचवा । श्याम म्हणिजे सहावा । सातवा श्यामायणीया जाणावा । दशम शाखा परियेसा ॥५३॥
वाजसनेया शाखेसी । भेद असती अष्टादशी । नामे सांगेन परियेसी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥५४॥
वाजसनेया नाम एका । द्वितीया जाबला निका । बहुधेया नामे तृतीयका । चतुर्थ कण्व परियेसा ॥५५॥
माध्यंदिना पाचवेसी । शापिया नाम षष्ठेसी । स्थापायनी सप्तमेसी । कापाला अष्टम विख्यात ॥५६॥
पौड्रवत्सा विख्यात । आवटिका नावे उन्नत । परमावटिका परम ख्यात । एकादश भेद जाणा ॥५७॥
पाराशर्या द्वादशी । वैद्येया नामे त्रयोदशी । चतुर्दश भेद पुससी । वैनेया म्हणती तयाते ॥५८॥
औंधेया नामे विशेषी । जाण शाखा पंचदशी । गालवा म्हणिजे षोडशी । बैजवा नाम सप्तदशी ॥५९॥
कात्यायनी विशेषी । जाण शाखा अष्टादशी । वाजसनीय शाखेसी । भेद असती अष्टादश ॥६०॥
तैत्तिरीय शाखा भेद दोनी । व्यास सांगे विस्तारोनि । औख्या काण्डिकेया म्हणोनि । यासी भेद पाच असती ॥६१॥
आपस्तंबी असे थोर । शाखा असे मनोहर । यज्ञादि कर्मे आचार । विज्ञान असे तयात ॥६२॥
दुसरा जाण बौधायनी । सत्याषाढी अघनाशिनी । हिरण्यकेशी म्हणोनि । चौथा भेद परियेसा ॥६३॥
औंधेयी म्हणोनि नाव । भेद असे पाचवा । अनुक्रमे पढावा । म्हणे व्यास शिष्यासी ॥६४॥
षडंगे असती विशेषे । नामे तयांची सांगेन ऐके । शिक्षा व्याकरण कल्पे । निरुक्त छंद ज्योतिष ॥६५॥
याते उपांगे असती माणिक । आणि त्यांची नामे तू ऐक । प्रतिपद अनुपद देख । छंद तिसरा परियेसा ॥६६॥
भाषाधर्म पंचम । मीमांसा न्याय सप्तम । कर्मसंहिता अष्टम । उपांगे ही जाणावी ॥६७॥
परिशिष्टे अष्टाविंश । असती ऐका विशेष । विस्तार करुनी परियेस । व्यास सांगे शिष्यासी ॥६८॥
पूर्वी होत्या वेदराशी । शिकता अशक्य मानवांसी । म्हणोनि लोकोपकारासी । ऐसा केला विस्तार ॥६९॥
शाखाभेदी येणेपरी । विस्तार केला प्रकारी । जितके मति उच्चारी । तितुके शिको म्हणोनि ॥७०॥
येणेपरी विस्तारी । सांगे व्यास परिकरी । वैशंपायन अवधारी । विनवीतसे त्याजवळी ॥७१॥
यजुर्वेद विस्तारेसी । निरोपिला आम्हांसी । शाखाभेद क्रमेसी । वेगळाले करोनि ॥७२॥
संदेह होतो आम्हासी । मूळ शाखा कोण कैसी । विस्तारोनि प्रीतीसी । निरोपावे स्वामिया ॥७३॥
व्यास म्हणे शिष्यासी । बरवे पुसिले आम्हांसी । या यजुर्वेदासी । मूळ तुम्हां सांगेन ॥७४॥
मंत्र ब्राह्मण संहिता । मिळोनि पढता मिश्रिता । तोचि मूळ प्रख्याता । यजुर्वेद जाणिजे ॥७५॥
आणिक असे एक खूण । संहिता मिळोनि ब्राह्मण । तोचि यजुर्वेद मूळ जाण । वरकड शाखा पल्लव ॥७६॥
यज्ञादि कर्मक्रियेसी । हे मूळ गा परियेसी । अभ्यास करी गा निश्चयेसी । म्हणे व्यास शिष्याते ॥७७॥
ऐकोनिया व्यासवचन । वैशंपायन म्हणे कर जोडून । यजुर्वेदमूळ विस्तारोन । निरोपावे स्वामिया ॥७८॥
व्यास म्हणे शिष्यासी । सांगेन ऐक विस्तारेसी । ग्रंथत्रय असती ज्यासी । अभ्यास करी म्हणतसे ॥७९॥
सप्त अष्टक संहितेसी । एकाएकाचे विस्तारेसी । सांगेन तुज भरवसी । म्हणे व्यास शिष्याते ॥८०॥
प्रथम इषेत्वा प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । आठ अधिक विसांसी । पन्नासा असती ॥८१॥
अपऊर्ध्व प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । चारी अधिक तिसांसी । प्रन्नासा तुम्ही जाणाव्या ॥८२॥
देवस्यत्वा प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । एक अधिक तिसांसी । पन्नासा असती ॥८३॥
आददेनामा प्रश्न चतुर्थ । षट्चत्वारिंशत् अनुवाक विख्यात । पन्नासा जाण तयात । वेदाधिक पन्नास ॥८४॥
देवासुर नामक प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । असती एकावन्न पन्नासी । पंचम प्रश्नांत अवधारा ॥८५॥
’संत्वासिंचा’ इति प्रश्न । द्वादश अनुवाक असती पूर्ण । पन्नासा असती एकावन्न । असती सहावे प्रश्नासी ॥८६॥
पाकयज्ञ नामक प्रश्न । त्रयोदशी अनुवाकी संपन्न । पन्नासा असती एकावन्न । सप्तम प्रश्न विस्तार ॥८७॥
अनुमत्य इति प्रश्नासी । अनुवाक जाणा द्वाविशंती । द्विचत्वारिशत पन्नासा असती । प्रथम अष्टक येणेपरी ॥८८॥
प्रथम अष्टक परियेसी । संख्या सांगेन संहितेसी । अनुवाक असती ख्यातीसी । एकचित्ते परियेसा ॥८९॥
एकशत आणि चत्वारिंशत वरी । अधिक त्यावरी तीन निर्धारी । अनुवाक असती परिकरी । अंतःकरणी धरावे ॥९०॥
पन्नासा असती त्यासी । त्रिशताधिक बेचाळिसी । प्रथम अष्टकी परियेसी । म्हणोनि सांगे व्यासमुनि ॥९१॥
द्वितीय अष्टकाचा विचार । सांगेन तो परिकर । प्रथम प्रश्नाचे नाम थोर । वायव्य असे म्हणावे ॥९२॥
प्रथम प्रश्नांत विशेश । अनुवाक जाण एकादश । पंचषष्टि असती पन्नास । एकचित्ते परियेसा ॥९३॥
पुढे असे द्वितीय प्रश्न । नाम असे प्रजापतिगुहान् । द्वादश अनुवाक असती जाण । एकसप्तति पन्नासा ॥९४॥
आदित्य नामक प्रश्नास । अनुवाक जाणा चतुर्दश । षट् अधिक पंचाशत । पन्नासा तुम्ही पढाव्या ॥९५॥
पुढील प्रश्न देवामनुष्या । अनुवाक जाणा चतुर्दशा । अष्ट अधिक चत्वारिंशा । पन्नासा तुवा जाणिजे ॥९६॥
म्हणता जाय महापाप । प्रश्न असे विश्वरूप । द्वादश अनुवाक स्वरूप । चारी अधिक सप्तति पन्नासा ॥९७॥
समिधा नाम प्रश्नास । निरुते अनुवाक द्वादश । सप्तति पन्नासा असती त्यास । एकचित्ते परियेसा ॥९८॥
ऐसे द्वितीय अष्टकासी । षष्ठ प्रश्न परियेसी । पाच अधिक सप्ततीसी । अनुवाक तुम्ही जाणावे ॥९९॥
पन्नासांची गणना । सांगेन तुज विस्तारोन । तीन शतांवरी अशीति जाण । अष्ट अधिक परियेसा ॥१००॥
तिसरा अष्टक सविस्तर । सांगेन तुम्हा परिकर । वैशंपायन शिष्य थोर । गुरुमुखे ऐकतसे ॥१॥
तिसर्या अष्टकाचा प्रश्न प्रथम । नाम ’प्रजापतिरकाम’ ॥ अनुवाक त्या एकादशोत्तम । द्विचत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥२॥
द्वितीय प्रश्नास असे जाण । नाम ’यो वै पवमान’ । एकादश अनुवाक जाण । षट्चत्वारिशंत् पन्नासा त्यासी ॥३॥
तृतीय प्रश्ना बरवीयासी । नाम असे ’अग्ने तेजस्वी’ । अनुवाकांची एकाद्शी । षट्चत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥४॥
चौथा प्रश्न ’विवाएत’ । एकादश अनुवाक ख्यात । षट्चत्वारिशत पन्नासा त्यांत । एकचित्ते परियेसा ॥५॥
पुढे असे प्रश्न पंचम । म्हणावे नाम पूर्णा प्रथम । अनुवाक अकरा उत्तम । षड्विंशति पन्नासा त्यासी ॥६॥
ऐसे तृतीयाष्टकासी । अनुवाक पंचपंचाशत् त्यासी । द्विशत अधिक सहा त्यासी । पन्नासा असती अवधारा ॥७॥
चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न । नामे असे युंजान । एकादश अनुवाक खूण । षट्चत्वारिंशत पन्नासा ॥८॥
प्रश्नास संज्ञा विष्णोः क्रम ऐसी । एकादश अनुवाक परियेसी । अष्ट अधिक चत्वारिंशतीसी । पन्नासा त्यात विस्तार ॥९॥
तिसरे प्रश्ना उत्तम । जाणा तुम्ही आपांत्वा नाम । त्रयोदश अनुवाक उत्तम । षट्त्रिंशत पन्नासा त्यासी ॥११०॥
चौथा प्रश्न रश्मिरसी । अनुवाक असती द्वादशी । सप्ताधिक त्रिंशत् त्यासी । पन्नासा असती तुम्ही जाणा ॥११॥
नमस्ते रुद्र उत्तम । प्रश्न होय जाण पंचम । एकादश अनुवाक जाण । सप्ताधिक वीस पन्नासा ॥१२॥
’अश्मन्नूर्ज’ प्रश्नास । नव अनुवाक परियेस । षट्चत्वारिंशत पन्नासा त्यास । एकचित्ते परियेसा ॥१३॥
प्रश्न ’अग्नाविष्णू’सी । अनुवाकांची जाण पंचदशी । एक न्यून चाळिसांसी । पन्नासा त्यासी विस्तारे ॥१४॥
ऐसे चतुर्थ अष्टकासी । सप्त प्रश्न परियेसी । अनुवाक असती ब्यायशी । द्विशतांवर एक उण्या अशीति पन्नासा ॥१५॥
पंचमाष्टका प्रथम प्रश्न । नामे ’सावित्राणि’ जाण । पन्नासा षष्टि एका ऊण । एकादश अनुवाक ख्याति ॥१६॥
विष्णुमुखा प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी । चतुषष्टि पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती द्विजाते ॥१७॥
तिसरा प्रश्न उत्सन्नयज्ञ । अनुवाक द्वादश धरा खूण । पन्नासांसी द्वय न्यून । पन्नासा असती परियेसी ॥१८॥
चौथा प्रश्न देवासुरा । अनुवाक असती त्यासी बारा । षष्टीत दोन उण्या करा । पन्नासा असती परियेसा ॥१९॥
यदेके नामे प्रश्न । चतुर्विशति अनुवाक खूण । दोन अधिक षष्टि जाण । पन्नासा असती परियेसा ॥१२०॥
हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न । त्रयोविंशति अनुवाक जाण । षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२१॥
यो वा आ यथा नामे प्रश्न । षड्विंशति अनुवाक जाण । षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२२॥
पंचमाष्टक संहितेसी । सप्त प्रश्न परियेसी । अनुवाक एकशत त्यासी । वीस अधिक विस्तारे ॥२३॥
त्रीणि अधिक चतुःशत । पन्नासा असती जाणा विख्यात । मन करूनि सावचित्त । ऐका म्हणे तये वेळी ॥२४॥
षष्ठाष्टक संहितेसी । प्रथम प्रश्न परियेसी । प्राचीनवंश नाम त्यासी । एकादश अनुवाक जाणा ॥२५॥
अधिक सहा सप्ततीसी । पन्नासा त्यासी परियेसी । विस्तार करूनि शिष्यासी । सांगतसे व्यासदेव ॥२६॥
’यदुभौ’ नाम प्रश्नासी । अनुवाक जाणा एकादशी । एक उणा षष्ठीसी । पन्नासा असती परियेसी ॥२७॥
तिसरा प्रश्न चात्वाल । एकादशी अनुवाकी माळ । पन्नासा षष्ठीवरी द्वय स्थूळ । तिसरा प्रश्न परियेसी ॥२८॥
चवथा प्रश्न यज्ञेन । एकादश अनुवाक जाण । पन्नासा एक अधिक पंचाशत पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥२९॥
’इंद्रोवृत्र’ नाम प्रश्न । एकादश अनुवाक जाण । द्विचत्वारिंशत् पन्नासा खूण । पंचम प्रश्नी परियेसा ॥१३०॥
’सुवर्गाय’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । त्रीणि अधिक चत्वारिंशती । पन्नासा असती परियेसा ॥३१॥
सहावे अष्टकी परिपूर्ण । त्यासी सहा अधिक असती पूर्ण । षष्टि अनुवाक असती जाण । त्रयस्त्रिंशदधिकत्रिशत पन्नासा ॥३२॥
सप्तमाष्टकाचा प्रश्न । नामे असे प्रजनन । अनुवाक वीस असती खूण । द्विपंचाशत पन्नासा त्यास ॥३३॥
साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न । विंशती अनुवाक जाण । पन्नास पन्नासा परिपूर्ण । एकचित्ते परियेसा ॥३४॥
’प्रजवं वा’ नाम प्रश्नासी । अनुवाक वीस परियेसी । द्विचत्वारिंशत् पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥३५॥
’बृहस्पती’ नामक प्रश्न । द्वाविंशति अनुवाक जाण । त्रीण्यधिक पन्नासा खूण । पन्नासा असती अवधारा ॥३६॥
प्रश्न असे पाचवा जाण । ’गावो’ वा नामे उत्तम । पंचविंशति अनुवाक पूर्ण । चतुःपंचाशत् पन्नासा त्यासी ॥३७॥
सप्तमाष्टक संहितेसी । अनुवाक असती परियेसी । एकशत सप्त त्यासी । अनुवाक असती विस्तार ॥३८॥
द्विशतावरी अधिकेसी । एकावन्न असती पन्नासी । सप्तमाष्टक असे सुरसी । एकचित्ते परियेसी ॥३९॥
अष्टमाष्टक संहितेसी । षट् शताधिक अष्टचत्वारिंशतीसी । मुख्य प्रश्न चत्वारिंशत् भरवसी । अनुवाक असती विस्तारे ॥१४०॥
द्विउणे शतद्वय सहस्त्र दोनी । पन्नासा तू जाण मनी । पठण करा म्हणोनी । व्यास सांगे शिष्यासी ॥४१॥
तीन अष्टक ब्राह्मणांत । असती जे जाण विख्यात । सांगेन ऐक एकचित्त । म्हणे व्यास शिष्यासी ॥४२॥
प्रथमाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी । नामे त्याची ऐका ऐशी । एकचित्ते परियेसा ॥४३॥
प्रथम प्रश्न संधत्त । नाम असे विख्यात । अनुवाक दहा विस्तृत । अशीति दशक मनोहर ॥४४॥
उद्धन्य नाम दुसरा प्रश्न । सहा अनुवाक दशक पन्नास जाण । वाजपेय अनुसंधान । देवासुरा प्रश्न तिसरा ॥४५॥
त्यासी दशक अनुवाक जाण । पंच अधिक षष्टि दशक जाण । चौथा उभय नाम प्रश्न । दश अनुवाक मनोहर ॥४६॥
सवत्सरगणित सहा अधिका । त्यासी जाणा तुम्ही दशका । पाचवा नामे अग्नेकृत्तिका । प्रश्न असे अवधारा ॥४७॥
त्यासी अनुवाक द्वादश । सांगेन ऐका दशक । दोन अधिक षष्टि विशेष । एकचित्ते परियेसा ॥४८॥
सहावा प्रश्न अनुमत्य । अनुवाक दहा प्रख्यात । पाच अधिक सप्ततिक । दशक त्यासी अवधारा ॥४९॥
सप्तम प्रश्ना धरी खूण । नाम त्या एकद्वाब्राह्मण । दश अनुवाक आहेत जाण । चतुःषष्टि दशक त्यासी ॥१५०॥
आठवा वरुणस्य नाम प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण । सप्त अधिक तीस खूण । दशक त्यासी मनोहर ॥५१॥
प्रथम अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी । अष्टसंप्तति अनुवाक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥५२॥
एक उणे पाचशत । दशक आहेत विख्यात । वैशंपायन ऐकत । गुरुमुखेकरोनि ॥५३॥
दुसरा अष्टक ब्राह्मणास । प्रथम प्रश्न आंगिरस । अनुवाक जाणा एकादश । साठी दशक मनोहर ॥५४॥
प्रजापतिरकांड । प्रश्न दुसरा हा गोड । एकादश अनुवाक दृढ । त्रिसप्तति दशक त्यासी ॥५५॥
कांड ब्रह्मवादिन । एकादश अनुवाक जाण । दशक आहे तो पन्नास पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥५६॥
’जुष्टो’ नाम प्रश्न ऐक । त्यासी अनुवाक अष्टाद्शक । वैशंपायन शिष्यक । गुरुमुखे ऐकतसे ॥५७॥
प्रश्न ’प्राणो रक्षति’ । अष्ट अनुवाक त्यासी ख्याति । पंच अधिक चत्वारिंशति । दशक तुम्ही ओळखिजे ॥५८॥
’स्वाद्वीत्वा’ नामे षष्ठम । प्रश्न असे उत्तम । अनुवाक असती वीस खूण । षट् अधिक अशीति दशक त्यासी ॥५९॥
सप्तम प्रश्न त्रिवृत्तास । अनुवाक असती अष्टादश । सहा अधिक षष्ठीस । दशक त्यासी मनोहर ॥१६०॥
अष्टम प्रश्न ’पीवोअन्न’ । अनुवाक असती नऊ जाणा । अशीतीसि एक उणा । दशक त्यासी मनोहर ॥६१॥
द्वितीय अष्टक ब्राह्मणासी । आठ प्रश्न परियेसी । वेद उणे शतक त्यासी । अनुवाक असती मनोहर ॥६२॥
चार शतां उपरी । तीन उणे सप्तति निर्धारी । दशक आहेती विस्तारी । एकचित्ते परियेसा ॥६३॥
तृतीयाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न असती द्वादशी । नामे त्यांची परियेसी । एकचित्ते अवधारा ॥६४॥
प्रथम प्रश्न विख्यातु । नाम ’अग्निर्नः पातु’ । सहा अनुवाक विख्यातु । एक अधिक षष्ठी दशक ॥६५॥
’तृतीयस्य’ द्वितीय प्रश्न । अनुवाक असती दहा जाण । पंचाशीतिक दशक खूण । एकचित्ते परियेसा ॥६६॥
तिसरा प्रश्न प्रत्युष्ट । अनुवाक असती एकादश । एका उणे ऐशी दशक । एकचित्ते अवधारा ॥६७॥
चौथा प्रश्न ’ब्राह्मणेसि’ । अनुवाक एका परियेसी । एका उणे विसांसी । दशक त्यांसी मनोहर ॥६८॥
पंचम प्रश्न नाम सत्य । चतुर्दश अनुवाक विख्यात । एक उणे तीस दशक । एकचित्ते परियेसा ॥६९॥
सहावा प्रश्न ’अंजंति’ । पंचदश अनुवाक ख्याति । सात अधिक त्रिंशती । दशक त्यासी जाणावे ॥१७०॥
अच्छिद्रसर्वान्वा नाम प्रश्न । चतुर्दश अनुवाक जाण । तीस अधिक शत खूण । दशक त्यासी मनोहर ॥७१॥
प्रश्न अश्वमेधासी । सांग्रहण्य ख्यातीसी । अनुवाक असती त्रयोदशी । एक्याण्णव दशक ॥७२॥
प्रजापतिरकाम । अश्वमेध असे उत्तम । त्रयोविंशति अनुवाक नेम । चारी अधिक अशीति दशक त्यासी ॥७३॥
संज्ञान म्हणती काठक । अनुवाक दहांशी एक अधिक । एका उणे पन्नास दशक । एकचित्ते परियेसा ॥७४॥
दुसरा ’लोकोसि’ काठक । दश अनुवाक असती ऐक । तयांमध्ये दोनी अधिक षष्ठी दशक । व्यास म्हणे शिष्यासी ॥७५॥
द्वादश प्रश्न तुभ्यासी । अनुवाक नव परियेसी । सहा अधिक पन्नासासी । दशक त्यासी मनोहर ॥७६॥
तिसरे अष्टक ब्राह्मणासी । सप्त चत्वारिंशत एक शत अनुवाकासी । सात शत द्व्यशीति दशकासी । विस्तार असे परियेसा ॥७७॥
तिनी अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न सांगेन परियेसी । अष्ट अधिक विसांसी । एकचित्ते अवधारा ॥७८॥
त्रीणि शत विसांसी । एक अधिक परियेसी । अनुवाक आहेती विस्तारेसी । परत ब्राह्मणासी परियेसा ॥७९॥
दशक संख्या विस्तार । सप्तशत अधिक सहस्त्र । अष्टचत्वारिंशति उत्तर । अधिक असती परियेसा ॥१८०॥
आता सांगेन अरण । त्यासी असती दहा प्रश्न । विस्तारोनिया सांगेन । एकचिते अवधारा ॥८१॥
अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न । द्वात्रिशत् अनुवाक असे खूण । एक शतक तीस जाण । दशक त्यासी मनोहर ॥८२॥
स्वाधाय ब्राह्मणासी । अनुवाक वीस परियेसी । चतुर्विंशति दशक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥८३॥
चित्ती म्हणिजे प्रश्नासी । अनुवाक जाण एकविंशतीसी । दोन अधिक पन्नासासी । दशक त्यासी विस्तार ॥८४॥
ऐसा थोर चवथा प्रश्न । नाम तया मंत्रब्राह्मण । द्विचत्वारिम्शत अनुवाक जाण । द्विषष्ठी दशक त्यासी ॥८५॥
श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी । अनुवाक जाण द्वादशी । आठ अधिक शतासी । दशक तुम्ही जाणावे ॥८६॥
पितृभेद असे प्रश्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण । सप्तविंशती दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥८७॥
’शिक्षा’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी । तीन अधिक विसांसी । दशक त्यासी मनोहर ॥८८॥
ब्रह्मविदा असे प्रश्न । अनुवाक त्यासी नऊ जाण । दशक चतुर्दश असे खूण । व्यास म्हणे शिष्यांसी ॥८९॥
भुगुर्वै असे प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण । पंचदश दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥१९०॥
दशम प्रश्न नारायण । अनुवाक तीस असती खूण । एकशत वेद जाण । दशक त्यासी परियेसा ॥९१॥
दहा प्रश्न अरणासी । अनुवाक जाण परियेसी । दोनी पूर्ण द्विशतासी । संख्या असे परियेसा ॥९२॥
पंचशता उपरी । नवपंचाशत विस्तारी । दशक जाणा मनोहरी । म्हणे व्यास शिष्याते ॥९३॥
ऐसे ग्रंथ तयांसी । प्रश्न असती ब्यायशी । नव षष्ठी अधिक एकशत सहस्त्रासी । अनुवाक जाण मनोहर ॥९४॥
पन्नासी दशक विस्तार । सांगेन तुम्हा प्रकार । द्वयशत दोनो सहस्त्र । द्वय उणे पन्नास जाण ॥९५॥
द्वयसहस्त्र त्रय शत । सप्त अधिक उन्नत । दशकी जाण विख्यात । ग्रंथत्रय परिपूर्ण ॥९६॥
ऐशीया यजुर्वेदासी । भेद असती शायशी । त्यात एक भेदासी । एवढा असे विस्तार ॥९७॥
येणेपरी व्यासमुनि । वैशंपायना विस्तारोनि । सांगता झाला म्हणोनि । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥९८॥
तिसरा शिष्य जैमिनी । त्यास सांगे व्यासमुनि । सामवेद विस्तारोनि । निरोपित अवधारा ॥९९॥
उपवेद गांधर्व अत्र । काश्यपाचे असे गोत्र । रुद्र देवता परम पवित्र । जगती छंद म्हणावा ॥२००॥
नित्यस्त्रग्वी असे जाणा । शुचि वस्त्र प्रावरणा । मन शांत इंद्रियदमना । शमीदण्ड धरिला असे ॥१॥
कांचननयन श्वेतवर्ण । सूर्यासारखे किरण । षड्रत्नी दीर्घ जाण । सामवेद रूप असे ॥२॥
याच्या भेदा नाही मिती । अखिल सहस्त्र बोलती । ऐसी कोणा असे शक्ति । सकळासी शिकू म्हणावया ॥३॥
एका नारायणावांचोनि । समस्त भेद नेणे कोणी । ऐक शिष्या जैमिनी । सांगे तुज किंचित ॥४॥
प्रथम आसुरायणीया । दुसरे वासुरायणीय़ा । वातान्तरेया म्हणोनिया । तिसरा भेद परियेसा ॥५॥
प्रांजली असे भेद एक । ऋज्ञग्वैनविधा एक । आणि प्राचीन योग्यशाखा । असे सहावा परियेसा ॥६॥
ज्ञानयोग सप्तम । राणायणीया असे ज्या नाम । यासी भेद दश जाण । आहेत ऐका एकचित्ते ॥७॥
राणायणीया सांख्यायनी । तिसरा शाठ्या म्हणोन । मुग्दल नाम जाणोनि । चौथा भेद परियेसा ॥८॥
खल्वला महाखल्वला । सप्तम नामे लाङ्गला । अष्ट भेद कैथुमा । गौतमा म्हणे परियेसा ॥९॥
दशम शाखा जैमिनी । ऐसे भेद विस्तारोनि । सांगितले व्यासमुनी । श्रीगुरु म्हणति द्विजांसी ॥२१०॥
पूर्ण सामवेदासी । कोण जाणे क्षितीसी । तीनवेदी म्हणविसी । मदोन्मत्त होवोनिया ॥११॥
सूत म्हणे शिष्यांसी । सांगे व्यास अतिहर्षी । अथर्वण वेदांसी । निरोपिले परियेसा ॥१२॥
अथर्वण वेदासी । उपवेद असे परियेसी । मंत्रशास्त्र निश्चयेसी । वैतान असे गोत्र ॥१३॥
आधिदैवत इंद त्यासी । अनुष्टुप् छंदेसी । तीक्ष्ण चंड क्रूरेसी । कृष्ण वर्ण असे जाण ॥१४॥
कामरूपी क्षुद्र कर्म । स्वदार असे त्यासी नाम । विश्वसृजक साध्यकर्म । जलमूर्ध्नीगालव ॥१५॥
ऐसे रूप तयासी । भेद नव परियेसी । सुमंतु नाम शिष्यासी । सांगतसे श्रीव्यास ॥१६॥
पैप्पला भेद प्रथम । दुसरा भेद दान्ता नाम । प्रदांत भेद सूक्ष्म । चौथा भेद स्तोता जाण ॥१७॥
औता नाम असे ऐका । ब्रह्मदा यशदा शाखा । सातवा भेद शाखा ऐका । शौनकी म्हणती ॥१८॥
अष्टम वेददर्शा भेदासी । चरणविद्या नवमेसी । पाच कल्प परियेसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१९॥
ऐसे चौघा शिष्यास । सांगत असे वेदव्यास । प्रकाश केला क्षितीस । भरतखंडी परियेसा ॥२२०॥
या भरतखंडत । पूर्वी होते पुण्य बहुत । वर्णाश्रमधर्म आचर । होते लोक परियेसा ॥२१॥
या कलियुगाभीतरी । कर्म सांडिले द्विजवरी । लोपले वेद निर्धारी । गुप्त जाहले क्षितीसी ॥२२॥
कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेच्छा सांगती वेदबीज । सत्त्व गेले सहज । मंदमती झाले जाण ॥२३॥
पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणासी देवत्व । वेदबळे नित्यत्व । भूसुर म्हणती त्या काजा ॥२४॥
पूर्वी राजे याच कारणी । पूजा करती विप्रचरणी । सर्व देता दक्षिणादानी । ते अंगिकार न करिती ॥२५॥
वेदबळे विप्रांसी । त्रिमूर्ति वश होते त्यांसी । इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥२६॥
कामधेनु कल्पतरू । विप्रवाक्ये होत थोरू । पर्वत करिती तृणाकारू । तृणा पर्वत परत्वे ॥२७॥
विष्णु आपण परियेसी । पूजा करी विप्रांसी । आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्त्वे करोनिया ॥२८॥
श्लोक ॥ देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं । ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम् ॥२९॥
ऐसे महत्त्व द्विजांसी । पूर्वी होते परियेसी । वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अज्ञानमार्गे रहाटती ॥२३०॥
हीन यातीपुढे ऐका । वेद म्हणती मूर्ख देखा । त्यांच्या पाहू नये मुखा । ब्रह्मराक्षस होताती ॥३१॥
तेणे सत्त्व भंगले । हीन यातीते सेविले । अद्यापि क्रय करिती मोले । वेद भ्रष्ट करिताती ॥३२॥
ऐशा चारी वेदांसी । शाखा असती परियेसी । कोणे जाणावे क्षितीसी । सकळ गौप्य होऊनि गेले ॥३३॥
चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी । काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेत जाण ॥३३४॥
ऐशामध्ये काय लाभ । घेऊ नये द्विजक्षोभ । कोणी केला तूते बोध । जाई म्हणती येथून ॥३५॥
आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रे दाखविसी । त्रिविक्रम यतीपासी । पत्र मागसी लिहुनी ॥३६॥
आमुचे बोल ऐकोनि । जावे तुम्ही परतोनि । वाया गर्वे भ्रमोनि । प्राण आपुला देऊ नका ॥३७॥
ऐसे श्रीगुरु विप्रांसी । सांगती बुद्धि हितासी । न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करू ॥३८॥
चर्चा जरी न करू येथे । हारी दिसेल आम्हांते । सांगती लोक राजयाते । महत्त्व आमुचे उरे केवी ॥३९॥
सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोमन्ता । नेणती आपुले हिता । त्यासी मृत्यु जवळी आला ॥२४०॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । वेदविवरण ऐकता साधनु । होय समाधान श्रोते जना ॥४१॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । चारी वेदांचा मथितार्थ । उकलोनि दाविला यथार्थ । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥२४२॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्यायः ॥२६॥
ओवीसंख्या ॥२४२॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय सव्विसावा
Similar Post |
---|
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Gurucharitra Index |
गुरूचरित्र अध्याय पंचविसावा – Gurucharitra Adhyay 25 in Marathi |
गुरूचरित्र अध्याय सत्ताविसावा – Gurucharitra Adhyay 27 in Marathi |