Menu Close

गुरूचरित्र अध्याय पंचविसावा – Gurucharitra Adhyay 25 in Marathi

Gurucharitra Adhyay in Marathi

गुरूचरित्र अध्याय पंचविसाव्यात (Gurucharitra Adhyay 25 in Marathi) आपण पाहतो की गुरूंच्या कृपेने आजारी व्यक्तीला सर्व रोगांपासून मुक्ती कशी मिळते. तो माणूस खूप आजारी होता आणि त्याला त्याच्या आजाराबद्दल खूप वाईट वाटले. एके दिवशी, तो माणूस गुरूंना भेटला आणि त्यांची मदत मागितली. गुरूंनी त्या माणसाला सांगितले की तो त्याला सर्व रोगांपासून मुक्त करेल. गुरूंनी त्या माणसाला त्याच्या चरणी शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्या व्यक्तीने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आणि गुरूंचे आशीर्वाद घेतले. गुरूंच्या कृपेने त्या व्यक्तीचे सर्व आजार बरे होऊन तो निरोगी झाला.

गुरूचरित्र अध्याय पंचविसावा – Gurucharitra Adhyay 25

श्रीगणेशाय नमः ।

जय जयाजी सिद्धमुनी । तूचि गुरुशिरोमणी । साक्षी येतसे अंतःकरणी । बोलिला माते परमार्थ ॥१॥

ऐसा कृपाळु परमेश्वर । आपण झाला अवतार । येरा दिसतसे नर । तेचि अज्ञानी प्रत्यक्ष ॥२॥

तया त्रिविक्रमभारतीसी । दाविले रूप प्रत्यक्षेसी । पुढे कथा वर्तली कैसी । निरोपावी दातारा ॥३॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । सांगता न सरे बहु काळा । साधारण मी सांगतसे ॥४॥

समस्त लीला सांगता । विस्तार होईल बहु कथा । या कारणे क्वचिता । निरोपीतसे बाळका ॥५॥

पुढे अपूर्व वर्तले एक । ऐक शिष्या नामधारक । विदुरा नामे नगर एक । होता राजा यवन तेथे ॥६॥

महाक्रूर ब्रह्मद्वेषी । सदा करी जीवहिंसी । चर्चा करवी ब्राह्मणांसी । वेद म्हणवी आपणापुढे ॥७॥

विप्रासी म्हणे यवन । जे का असती विद्वज्जन । आपुल्या सभेत येऊन । वेद सर्व म्हणावे ॥८॥

त्याते द्रव्य देईन बहुत । सर्वामध्ये मान्यवंत । जो का सांगेल वेदार्थ । विशेष त्याची पूजा करू ॥९॥

ऐसे ऐकूनि ज्ञानी जन । नेणो म्हणती वेद आपण । जे का असती मतिहीन । कांक्षा करिती द्रव्याची ॥१०॥

जावोनिया म्लेच्छापुढे । वेदशास्त्र वाचिती गाढे । म्लेच्छ मनी असे कुडे । ऐके अर्थ यज्ञकांडाचा ॥११॥

म्हणे विप्र यज्ञ करिती । पशुहत्या करणे रीती । आम्हा म्लेच्छाते निंदिती । पशु वधिती म्हणोनिया ॥१२॥

येणेपरी ब्राह्मणासी । निंदा करी बहुवसी । योग्यता पाहून द्विजवरांशी । अपार द्रव्य देतसे ॥१३॥

येणेपरी तो यवन । देतो द्रव्य म्हणोन । ऐकते झाले सकळ जन । देशोदेशी विप्रवर्ग ॥१४॥

वेदशास्त्री निपुण । द्रव्यावरी ठेवुनी मन । भेटीसी जाती ब्राह्मण । वेद म्हणती यवनापुढे ॥१५॥

ऐसे मंदमति विप्र । त्यांची जोडी यमपुर । मदोन्मत्त दुराचार । तेच इष्ट कलीचे ॥१६॥

येणेपरी वर्तमानी । वर्तत असता एके दिनी । मंदभाग्य विप्र दोनी । येवोनि भेटले राया ॥१७॥

वेदशास्त्र अभिज्ञाती । तीन वेद जाणो म्हणती । तया यवनापुढे किर्ति । आपली आपण सांगती ॥१८॥

विप्र म्हणती रायासी । कोणी नाही आम्हासरसी । वाद करावया वेदांसी । नसती चारी राष्ट्रांत ॥१९॥

असती जरी तुझ्या नगरी । त्वरित येथे पाचारी । आम्हासवे वेद चारी । चर्चा करावी द्विजांनी ॥२०॥

विप्रवचन ऐकोनि । राजा पडला अभिमानी । आपुल्या नगरचे विप्र आणोनि । समस्ताते पुसे तो ॥२१॥

राजा म्हणे समस्तांसी । चर्चा करावी तुम्ही यांसी । जे जिंकिती तर्केसी । त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे ॥२२॥

ऐकोनिया ज्ञानी जन । म्हणती म्लेच्छालागून । आम्हा योग्यता नाही जाण । या ब्राह्मणांते केवी जिंकू ॥२३॥

आम्हामध्ये हेचि श्रेष्ठ । विप्र दोघे महासुभट । याते करोनि प्रगट । मान द्यावा महाराज ॥२४॥

ऐसे म्हणती द्विज समस्त । ऐकोनि राजा मान देत । वस्त्रे भूषणे देई विचित्र । गजावरी आरूढविले ॥२५॥

आरूढवोनि हस्तीवरी । मिरवा म्हणे आपुल्या नगरी । नाही विप्र यांचे सरी । हेचि राजे विप्रांचे ॥२६॥

आपण राजा यवनांसी । हे दुजे राजे द्विजांसी । ऐसे भूसुर तामसी । म्लेच्छापुढे वेद म्हणती ॥२७॥

महातामसी ते ब्राह्मण । द्विजांते करूनिया दूषण । राजे म्हणविती आपण । तया यवनराज्यांत ॥२८॥

ऐसे असता वर्तमानी । विप्र मदांधे व्यापूनि । राजापुढे जावोनि । विनविताती परियेसा ॥२९॥

विप्र म्हणती रायासी । आम्हा योग्यता बहुवसी । न मिळे एखादा वादासी । वृथा झाले शिकोनिया ॥३०॥

आमुचे मनी बहु आर्ता । करणे वाद वेदशास्त्री । निरोप देई जाऊ आता । विचारू तुझ्या राष्ट्रात ॥३१॥

जरी मिळेल एखादा नरू । तयासवे चर्चा करू । न मिळे तैसा द्विजवरू । जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे ॥३२॥

राजा म्हणे तयासी । जावे राष्ट्री त्वरितेसी । पराभवावे ब्राह्मणासी । म्हणोनि निरोप देता झाला ॥३३॥

यवनाचे आज्ञेसी । निघाले द्विजवर तामसी । पर्यटन करिता राज्यासी । गावोगावी विचारिती ॥३४॥

गावोगावी हिंडती । जयपत्रे लिहून घेती । ऐसी कवणा असे शक्ति । तयासन्मुख उभे रहावे ॥३५॥

समस्त नगरे हिंडत । पुढे गेले दक्षिणपंथ । भीमातीरी असे विख्यात । कुमसी ग्राम उत्तम ॥३६॥

तेथे होता महामुनि । त्रिविक्रमभारती म्हणुनी । त्यासी येती वेद तिन्ही । अनेकशास्त्री अभिज्ञ तो ॥३७॥

महामुनि कीर्तिमंत । म्हणोनि सांगती जन समस्त । ऐकती द्विज मदोन्मत्त । गेले तया मुनीपासी ॥३८॥

जावोनि म्हणती तयासी । त्रिवेदी ऐसे म्हणविसी । चर्चा करावी आम्हंसी । अथवा द्यावे हारिपत्र ॥३९॥

विप्रवचन ऐकोनि । म्हणतसे त्रिविक्रममुनि । आम्ही नेणो वेद तिन्ही । अथवा न ये वेद एक ॥४०॥

जरी जाणो वेदशास्त्र । तरी का होतो अरण्यपात्र । वंदन करिते राजे सर्वत्र । तुम्हांसारखे भोग करितो ॥४१॥

नेणो म्हणोनि अरण्यवासी । वेष घेतला मी संन्यासी । आम्ही भिक्षुक तापसी । तुम्हांसमान नव्हे जाणा ॥४२॥

हारी अथवा जिंकून । नाही तयाचा अभिमान । तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन । आम्हासवे काय वाद ॥४३॥

ऐकोनि मुनींचे वचन । तवका अले ते ब्राह्मण । आम्हासवे वाद कवण । घाली ऐसा त्रिभुवनी ॥४४॥

हिंडत आलो अवघे राष्ट्र । आम्हासमान नाही नर । म्हणोनि दाखविती जयपत्र । असंख्यात परियेसा ॥४५॥

येणेपरी आपणासी । जयपत्र द्यावे विशेषी । अभिमान असल्या मानसी । करी वाद म्हणताती ॥४६॥

अनेकपरी ब्राह्मणांसी । सांगे मुनि विनयेसी । ऐकती ना द्विज महाद्वेषी । मागती जयपत्र आपुले ॥४७॥

त्रिविक्रम महामुनि । आपुले विचार अंतःकरणी । याते न्यावे गाणगाभुवनी । शिक्षा करणे द्विजाते ॥४८॥

विप्र मदांधे व्यापिले । अनेक ब्राह्मण धिक्कारिले । त्याते करणे उपाय भले । म्हणोनि योजिले मनात ॥४९॥

त्रिविक्रम म्हणे विप्रासी । चला गाणगाभुवनासी तेथे देईन तुम्हांसी । जयपत्र विस्तारे ॥५०॥

तेथे असती आपुले गुरु । तयापुढे पत्र देईन निर्धारू । अथवा तुमच्या मनींचा भारू । शमन करू म्हणे देखा ॥५१॥

ऐशी निगुती करूनि । निघाला त्रिविक्रम महामुनि । सवे येती विप्र दोनी । आंद्लिके बैसोनिया ॥५२॥

मूढ ब्राह्मण अज्ञानी । यतीश्वरा चालवोनि । आपण बैसले सुखासनी । म्हणोनि अल्पायुषी झाले ॥५३॥

पावले तया गाणगापुरा । जे का स्थान गुरुवरा । रम्य स्थान भीमातीरा । वास नरसिंहसरस्वती ॥५४॥

नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी मुनि भक्तीसी । कृपामूर्ति व्योमकेशी । भक्तवत्सला परमपुरुषा ॥५५॥

जय जयाजी जगद्गुरु । निर्गुण तूचि निर्विकारु । त्रयमूर्तीचा अवतारु । अनाथांचा रक्षक ॥५६॥

दर्शन होता तुझे चरण । उद्धरे संसारा भवार्ण । नेणती मूढ अज्ञानजन । अधोगतीचे ते इष्ट ॥५७॥

सद‌गदित कंठ झाला । रोमांच अंगी उठला । नेत्री बाष्प आनंद झाला । माथा ठेवी चरणावरी ॥५८॥

नमन करितांचि मनीश्वराते । उठविले श्रीगुरुनाथे । आलिंगोनि करुणावक्त्रे । पुसताती वृत्तान्त ॥५९॥

श्रीगुरु पुसती त्रिविक्रमासी । आलेत कवणे कार्यासी । विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे मुनिवरा ॥६०॥

श्रीगुरुचे वचन ऐकोनि । सांगतसे त्रिविक्रममुनि । मदोन्मत्त विप्र दोनी । आले असती चर्चेसी ॥६१॥

वेदशास्त्रादि मीमांसे । म्हणती चर्चा करू हर्षे । वेद चारी जिव्हाग्री वसे । म्हणती मूढ विप्र दोनी ॥६२॥

जरी न करा चर्चेसी । पत्र मागती हारीसी । अनेकापरी तयांसी । सांगता न ऐकती उन्मत्त ॥६३॥

म्हणोनि आलो तुम्हांजवळी । तुम्ही श्रीगुरु चंद्रमौळी । तुमचे वाक्य असे बळी । तेणेपरी निरोपावे ॥६४॥

मुनिवचन ऐकोनि । श्रीगुरु म्हणती हास्यवदनी । आले होते विप्र दोनी । त्याते पुसती वृत्तान्त ॥६५॥

श्रीगुरु म्हणती विप्रांसी । कवण आलेती कार्यासी । वाद कायसा आम्हांसी । लाभ काय वादे तुम्हा ॥६६॥

आम्ही तापसी संन्यासी । आम्हा हारी कायसी । काय थोरी तुम्हांसी । जय होता यतीसवे ॥६७॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । बोलताती विप्र दोनी । आलो पृथ्वी हिंडोनि । समस्त विप्र जिंकीत ॥६८॥

नव्हे कोणी सन्मुख । वेदचर्चापराङ्‍मुख । म्हणोनि पत्रे अनेक । काढोनिया दाखविली ॥६९॥

येणेपरी आम्हांसी । पत्र देता का सायासी । कोप आला त्रिविक्रमासी । घेवोनि आला तुम्हांजवळी ॥७०॥

जरी असाल साभिमान । तुम्हांसहित दोघेजण । वेदशास्त्रादि व्याकरण । चर्चा करू म्हणती विप्र ॥७१॥

आम्ही जाणो वेद चारी । न होती कोणी आम्हांसरी । तुम्ही दोघे यतीश्वरी । काय जाणाल वेदान्त ॥७२॥

श्रीगुरु म्हणती विप्रांसी । गर्वे नाश समस्तांसी । देवदानवादिकांसी । गर्वे मृत्यु लाधला जाणा ॥७३॥

गर्वे बळीसी काय झाले । बाणासुरासी फळ आले । लंकानाथ कौरव गेले । वैवस्वतक्षेत्रासी ॥७४॥

कवण जाणे वेदान्त । ब्रह्मादिका न कळे अंत । वेद असती अनंत । गर्व वृथा तुम्ही करिता ॥७५॥

विचाराल आपुले हित । तरी सांडा सर्व भ्रांत । काय जाणता वेदान्त । चतुर्वेदी म्हणविता ॥७६॥

श्रीगुरूचे वचन ऐकोनि । गर्वे दाटले बहु मनी । जाणो आम्ही वेद तीन्ही । सांग संहिता परियेसा ॥७७॥

येणेपरी श्रीगुरूसी । बोलती ब्राह्मण परियेसी । सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व पुढे वर्तले ॥७८॥

वेद चारी आदि अंती । श्रीगुरु ब्राह्मणां निरोपिती । सांगेन ऐका एकचित्ती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥७९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । त्रिविक्रममुनि विख्यात । विप्र जयपत्र मागत । ते चरित्र वर्णिले ॥८०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने

सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसा नाम पंचविशोऽध्यायः ॥२५॥

ओवीसंख्या ॥८०॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय पंचविसावा


Similar Post
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Gurucharitra Index
गुरूचरित्र अध्याय चोविसावा – Gurucharitra Adhyay 24 in Marathi
गुरूचरित्र अध्याय सव्विसावा – Gurucharitra Adhyay 26 in Marathi