Menu Close

गुरूचरित्र अध्याय बाविसावा – Gurucharitra Adhyay 22 in Marathi

Gurucharitra Adhyay in Marathi

गुरूचरित्र बाविसावा अध्यायात (Gurucharitra Adhyay 22 in Marathi) आपण पाहतो की एका गरीब शेतकऱ्याच्या गुरूच्या दर्शनाने त्याच्या सर्व इच्छा कशा पूर्ण होतात. शेतकरी खूप गरीब होता आणि त्याच्याकडे काहीच नव्हते. आपल्या गरिबीमुळे तो खूप दुःखी होता. एके दिवशी शेतकऱ्याने गुरूंना भेटून मदत मागितली. गुरुने शेतकऱ्याला सांगितले की तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. गुरूंनी शेतकऱ्याला त्याच्या चरणी शरणागती पत्करून त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आणि गुरूंचे आशीर्वाद घेतले. गुरूंच्या कृपेने शेतकऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. तो एक श्रीमंत शेतकरी बनला आणि त्याने आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधांचा उपभोग घेतला.

गुरूचरित्र अध्याय बाविसावा – Gurucharitra Adhyay 22

श्रीगणेशाय नम: ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । कर जोडोनिया जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥

जय जयाजी योगीश्वरा । शिष्यजनमनोहरा । तूचि तारक भवसागरा । अज्ञानतिमिराज्योती तू ॥२॥

तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आता । परमार्थवासना तत्त्वतां । झाली तुझे प्रसादे ॥३॥

दाखविली गुरूची सोय । तेणे सकळ ज्ञान होय । तूचि तारक योगिराय । परमपुरुषा सिद्धमुनी ॥४॥

गुरुचरित्रकामधेनु । सांगितले मज विस्तारोनि । अद्यापि न धाय माझे मनु । आणिक आवडी होतसे ॥५॥

मागे तुम्ही निरोपिले । श्रीगुरु गाणगापुरी आले । पुढे कैसे वर्तले । विस्तारावे दातारा ॥६॥

ऐकोनि शिष्याचे वचन । सांगे सिद्ध संतोषोन । म्हणे शिष्या तू सगुण । गुरुकृपेच बाळक ॥७॥

धन्य धन्य तुझे जीवन । धन्य धन्य तुझे मन । होसी तूचि पूज्यमान । या समस्त लोकांत ॥८॥

तुवा प्रश्न केलासी । संतोष माझ्या मानसी । उल्हास होतो सांगावयासी । गुरुचरित्रकामधेनु ॥९॥

पुढे वाढला अनंत महिमा । सांगतां असे अनुपमा । श्रीगुरु आले गाणगाभुवनी । राहिले संगमी गुप्तरूपे ॥१०॥

भीमा उत्तरवाहिनीसी । अमरजासंगमविशेषी । अश्वत्थ नारायण परियेसी । महावरद स्थान असे ॥११॥

अमरजा नदी थोर । संगम झाला भीमातीर । प्रयागासमान असे क्षेत्र । अष्टतीर्थे असती तेतेह ॥१२॥

तया तीर्थांचे महिमान । अपार असे आख्यान । पुढे तुज विस्तारोन । सांगेन ऐक शिष्योत्तमा ॥१३॥

तया स्थानी श्रीगुरुमूर्ति । होती गौप्य अतिप्रीती । तीर्थमहिमा करणे ख्याति । भक्तजनतारणार्थ ॥१४॥

समस्त तीर्थे श्रीगुरुचरणी । ऐसे बोलती वेदपुराणी । त्यासी कायसे तीर्थ गहनी । प्रकाश करी क्षेत्रांसी ॥१५॥

भक्तजनतारणार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ । गौप्य होती कलियुगात । प्रकट केली गुरुनाथे ॥१६॥

तेथील महिमा अनुक्रमेसी । सांगो पुढे विस्तारेसी । प्रकट झाले श्रीगुरू कैसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१७॥

ऐसा संगम मनोहर । तेथे वसती श्रीगुरुवर । त्रिमूर्तींचा अवतार । गौप्य होय कवणेपरी ॥१८॥

सहस्त्र किरणे सूर्यासी । केवी राहवेल गौप्येसी । आपोआप प्रकाशी । होय सहज गुण तयाचे ॥१९॥

वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी । तया गाणगापुरासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥२०॥

तया ग्रामी द्विजवर । असती एकशत घर । होते पूर्वी अग्रहार । वेदपाठक ब्राह्मण असती ॥२१॥

तया स्थानी विप्र एक । राहत असे सुक्षीण देख । भार्या त्याची पतिसेवक । पतिव्रताशिरोमणी ॥२२॥

वर्तत असता दरिद्रदोषी । असे एक वांझ महिषी । वेसण घातली तियेसी । दंतहीन अतिवृद्ध ॥२३॥

नदीतीरी मळियासी । क्षारमृत्तिका वहावयासी । नित्य द्रव्य देती त्यासी । मृत्तिका क्षार वहावया ॥२४॥

तेणे द्रव्ये वरो घेती । येणे रीती काळ क्रमिती । श्रीगुरुनाथ अतिप्रीती । येती भिक्षेसी त्याचे घरा ॥२५॥

विप्र लोक निंदा करिती । कैचा आला यति म्हणती । आम्ही ब्राह्मण असो श्रोती । न ये भिक्षा आमुचे घरी ॥२६॥

नित्य आमुचे घरी देखा । विशेष अन्न अनेक शाका । असे त्यजुनी यति ऐका । जातो दरिद्रियाचे घरी ॥२७॥

ऐसे बोलती विप्र समस्त । भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । प्रपंचरहित परमार्थ । करणे असे आपुल्या मनी ॥२८॥

पाहे पा विदुराच्या घरा । प्रीती कैसी शार्ङगधरा । दुर्योधनराजद्वारा । कधी न वचे परियेसा ॥२९॥

सात्त्विकबुद्धी जे वर्तती । श्रीगुरूची त्यांसी अतिप्रीति । इह सौख्य अपरा गति । देतो आपल्या भक्तांसी ॥३०॥

ऐसा कृपाळू परम पुरुष । भक्तावरी प्रेम हर्ष । त्यासी दुर्बळ काय दोष । रंका राज्य देउ शके ॥३१॥

जरी कोपे एखाद्यासी । भस्म करील परियेसी । वर देता दरिद्रियासी । राज्य होय क्षितीचे ॥३२॥

ब्रह्मदेवे आपुल्या करे । लिहिली असती दुष्ट अक्षरे । श्रीगुरुचरणसंपर्के । दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥३३॥

ऐसे ब्रीद श्रीगुरुचे । वर्णू न शके माझे वाचे । थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे । श्रीगुरु जाती तया घरा ॥३४॥

वर्तत असता एके दिवसी । न मिळे वरू त्या ब्राह्मणासी । घरी असे वांझ महिषी । नेली नाही मृत्तिकेसी ॥३५॥

तया विप्रमंदिरासी । श्रीगुरु आले भिक्षेसी । महा उष्ण वैशाखमासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥३६॥

ऐसे श्रीगुरुकृपामूर्ति । गेले द्विजगृहाप्रती । विप्र गेला याचकवृत्ती । वनिता त्याची घरी असे ॥३७॥

भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ । पतिव्रता आली धावत । साष्टांगी दंडवत । करिती झाली तये वेळी ॥३८॥

नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे भक्तीसी । आपला पती याचकवृत्तीसी । गेला असे अवधारा ॥३९॥

उत्कृष्ट धान्य घरी बहुत । घेवोनि येतिल पती त्वरित । तववरी स्वामी बैसा म्हणत । पिढे घातले बैसावया ॥४०॥

श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बैसते झाले शुभासन । तिये विप्रस्त्रियेसी वचन । बोलती क्षीर का वो न घालिसी ॥४१॥

तुझे द्वारी असता महिषी । क्षीर काहो न घालिसी भिक्षेसी । आम्हाते तू का चाळविसी । नाही वरू म्हणोनिया ॥४२॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता करी नमन । वांझ महिषी दंतहीन । वृद्धत्व झाले तियेसी ॥४३॥

उपजतांची आमुचे घरी । वांझ झाली दगडापरी । गाभा न वाचे कवणेपरी । रेडा म्हणोनि पोशितो ॥४४॥

याचि कारणे तियेसी । वेसण घातली परियेसी । वाहताती मृत्तिकेसी । तेणे आमुचा योगक्षेम ॥४५॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । मिथ्या बोलसी आम्हांसी । त्वरित जावोनिया महिषीसी । दुहूनि आणी क्षीर आम्हा ॥४६॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी । काष्ठपात्र घेवोनि । गेली ऐका दोहावया ॥४७॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता जाता क्षण । दुभली क्षीर संतोषोन । भरणे दोन तये वेळी ॥४८॥

विस्मय करी विप्रवनिता । म्हणे ईश्वर हा तत्त्वता । याचे वाक्य परिसता । काय नवल म्हणतसे ॥४९॥

क्षीर घेवोनि घरात । आली पतिव्रता त्वरित । तापविती झाली अग्नीत । सवेचि विनवी परियेसा ॥५०॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । घाली हो क्षीर भिक्षेसी । जाणे आम्हा स्वस्थानासी । म्हणोनि निरोपिती तये वेळी ॥५१॥

परिसोनि स्वामीचे वचन । घेवोनि आली क्षीरभरण । केले गुरुनाथे प्राशन । अतिसंतोषे करूनिया ॥५२॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीती । तुझे घरी अखंडिती । लक्ष्मी राहे निरंतर ॥५३॥

पुत्रपौत्री श्रियायुक्त । तुम्ही नांदाल निश्चित । म्हणोनि निघाले त्वरित । संगमस्थानासी आपुल्या ॥५४॥

श्रीगुरु गेले संगमासी । आला विप्र घरासी । ऐकता झाला विस्तारेसी । महिमा श्रीगुरुमूर्तीचा ॥५५॥

म्हणे अभिनव झाले थोर । होईल ईश्वरी अवतार । आमुच्या दृष्टी दिसे नर । परमपुरुष तोचि सत्य ॥५६॥

विप्र म्हणे स्त्रियेस । आमुचे गेले दरिद्रदोष । भेट जाहली श्रीगुरुविशेष । सकळाभीष्टे साधली ॥५७॥

म्हणोनि मनी निर्धार करिती । भेटी जाऊ कैचा यति । हाती घेवोनि आरती । गेले दंपती संगमासी ॥५८॥

भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । गंधाक्षताधूपदीपेसी । नैवेद्यतांबूलप्रदक्षिणेसी । पूजा करिती सद्भावे ॥५९॥

येणेपरी द्विजवर । लाधता जाहला जैसा वर । कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर । पूर्ण आयुष्य झाले जाण ॥६०॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैसे त्या नरासी । अष्टैश्वर्यै भोगीतसे ॥६१॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता होय मनोहर । दैन्यावेगळा होय त्वरित ॥६२॥

इतिश्रीगुरुचरित्रामृत । वंध्या महिषी दुग्ध देत । निश्चयाचे बळे सत्य । भाग्य आले विप्रासी ॥६३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने

सिद्धनामधारकसंवादे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥

ओवीसंख्या ॥६३॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय बाविसावा


Similar Post
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Gurucharitra Index
गुरूचरित्र अध्याय एकविसावा – Gurucharitra Adhyay 21 in Marathi
गुरूचरित्र अध्याय तेविसावा – Gurucharitra Adhyay 23 in Marathi