गुरुचरित्राच्या बाराव्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 12 in Marathi) गुरूंच्या कृपेने सर्व इच्छा कशा पूर्ण होतात हे स्पष्ट केले आहे.
ब्राह्मण अत्यंत गरीब होता आणि त्याला त्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण करणे कठीण होते. एके दिवशी ब्राह्मण गुरूंना भेटले आणि त्यांची मदत मागितली. गुरूंनी ब्राह्मणाला सांगितले की तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. गुरूंनी ब्राह्मणाला त्याच्या चरणी शरण जाऊन त्याची कृपा मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. ब्राह्मणाने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आणि गुरूंचे आशीर्वाद घेतले. गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आणि तो सुखी जीवन जगू लागला.
गुरूचरित्र अध्याय बारावा – Gurucharitra Adhyay 12
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥
श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥
टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥
देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥
जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥
अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥
अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य । जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥
जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । बावीस सहस्त्र गांव पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥८॥
पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं । स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥ Guru Charitra Adhyay 12
तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥
याचि कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं । मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥११॥
पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें । तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥
एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥
जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्य न परते ॥१४॥
अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन । पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥
जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥
पुत्र दारा धन गोधन । आयुष्य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥
जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥ Guru Charitra Adhyay 12
याकारणें तारुण्यपणीं । करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥
जो यमाचा असेल इष्ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्प असे मोगरी । सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥ Guru Charitra Adhyay 12
ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां । विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥
ऐकोनि पुत्राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥२४॥
तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी । विश्वास नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥
जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥
माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि । प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्चय अवधारीं ॥२७॥
पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी । सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥२८॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू बोलती हांसोन । आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥
तुतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि । मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥३०॥
संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीं । वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥
ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं । वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥
नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती । बाळ पहा हो वर्षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥
विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी । तीनी वेद पढती । षट्शास्त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥
येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं । माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥
नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी । निधान लाधे एखाद्यासी । काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥
तंव नवमास जाहली अंतर्वत्नी । माता झाली प्रसूती । पुत्र झाले युग्म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥३७॥
पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार । आशीर्वचन असे गुरू । असत्य केवीं होईल ॥३८॥
याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वज्जनें । जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥
ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक । खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥
जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना । दोघे पुत्रनिधाना । पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥
आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक । असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥
आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें । संतोषरुपी तुम्हीं व्हावें । म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥
संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्य आम्ही बोलावया ॥४४॥
न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा । मायामोहें वेष्टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥४५॥
मायाप्रपंचें वेष्टोनि । तुतें जरी सुत म्हणोनि । एके समयीं निष्ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥४६॥
सहभोजन-शयनासनीं । तुतें गांजों भुकेजोनि । कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करीं गा देवराया ॥४७॥
तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी । प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥४८॥
आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती । जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥
सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा । पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥५०॥
आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारीं । तुझें दर्शन नोहे तरी । केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥
ऐकोनि मातापितयांचें वचन । बोलती श्रीगुरू आपण । जे जे समयीं तुमचें मन । स्मरण करील आम्हांसी ॥५२॥
स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळीं । न करावी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ॥५३॥
आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी । दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं । सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥
जन्मांतरीं परमेश्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं । याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥
इह सौख्य होय ऐक । देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥
तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार । वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥५७॥
पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥
निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥
म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी । होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥
एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥६१॥
कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥६२॥
एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ । अनुमान नव्हे हा निश्चळ । वेद केवीं म्हणतसे ॥६३॥
सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा । मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥
ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्टांगीं नमन । नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥६५॥
नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक । पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥६६॥
निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥६७॥
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । आमुचें पुण्य होतें थोरू । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥
तू तारक विश्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं । पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥
ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्वास केला अतिप्रीतीं । पुनर्दर्शन हो निश्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥
ऐसें तयां संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं । परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥
वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥
अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचराचरीं । विश्वेश्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥
राहूनियां तया स्थानीं । अनुष्ठिती गुरुशिरोमणी । विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥
येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । अष्टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥७७॥
तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत । संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥७८॥
तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरीं । करिताति ; तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥
म्हणती पहा हो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी; कैसें वैराग्य याचे उदरीं । निर्लिप्त असे परियेसा ॥८०॥
शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं । स्नान करितो त्रिकाळेसीं । मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥
ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती । वृध्द होता एक यति । ‘कृष्णसरस्वती’ नामें ॥८२॥
तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि । सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥८३॥
म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी । अवतारपुरुष अतितापसी । विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥
वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी । प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥
वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी । विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥८६॥
याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी । संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥
लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ । याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥८८॥
याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं । आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥८९॥
म्हणोनि आले तया जवळीं । विनविताति मुनी सकळी । ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥
लोकानुग्रहाकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥
या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन । स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥
श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम् । देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत् ॥९३॥
टीका ॥ यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण । पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥
करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त । संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥९५॥
पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं । श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥
तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास । कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥
आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥९८॥
ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रय घेती । वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥
ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥१००॥
म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू । त्यातें झाला आणिक गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥१॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी । पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्ठ केवीं गुरु ॥२॥
आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी । अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥३॥
याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥४॥
शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी । वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥५॥
समस्त यतीश्वरांहून । तयासि दिधला बहुमान । कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥६॥
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं । त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥७॥
ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता । मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥८॥
आदिपीठ ‘शंकर’ गुरु । तदनंतर ‘विष्णु’ गुरु । त्यानंतर ‘चतुर्वक्त्र’ गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥९॥
तदनंतर ‘वसिष्ठ’ गुरु । तेथोनि ‘शक्ति’, ‘पराशरु’ । त्याचा शिष्य ‘व्यास’ थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥
तयापासूनि ‘शुक’ गुरु जाण । ‘गौडपादाचार्य’ सगुण । आचार्य ‘गोविंद’ तयाहून । पुढें आचार्य तो ‘शंकर’ जाहला ॥११॥
तदनंतर ‘विश्वरुपाचार्य’ । पुढें ‘ज्ञानबोधीगिरिय’ । त्याचा शिष्य ‘सिंहगिरिय’ । ‘ईश्वरतीर्थ’ पुढें झाले ॥१२॥
तदनंतर ‘नृसिंहतीर्थ’ । पुढें शिष्य ‘विद्यातीर्थ’ । ‘शिवतीर्थ’, ‘भारतीतीर्थ’ । गुरुसंतति अवधारीं ॥१३॥
मग तयापासोनि । ‘विद्यारण्य’ श्रीपादमुनि । ‘विद्यातीर्थ’ म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥१४॥
त्याचा शिष्य ‘मळियानंद’ । ‘देवतीर्थसरस्वती’ वृंद । तेथोनि ‘सरस्वतीयादवेंद्र’ । गुरुपीठ येणेंपरी ॥१५॥
यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि ‘कृष्णसरस्वती’ विशेष । बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥१६॥
येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥१७॥ Guru Charitra Adhyay 12
समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥१८॥
ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥१९॥
मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥
सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥२१॥
समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥२२॥
सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥२३॥
समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥२४॥
गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥२५॥
तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु । ‘माधव’ नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥२६॥
ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥२७॥
नाम ‘माधवसरस्वती’ । तया शिष्यातें ठेविती । तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥२८॥
सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥२९॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
श्रीगुरुदेव दत्त ॥
ओंवीसंख्या ॥१३०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय बारावा
Similar Post |
---|
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Gurucharitra Index |
गुरूचरित्र अध्याय अकरावा – Gurucharitra Adhyay 11 in Marathi |
गुरूचरित्र अध्याय तेरावा – Gurucharitra Adhyay 13 in Marathi |