Menu Close

गणपत वाणी – बा. सी. मर्ढेकर – Ganpat Vani – Ba Si Mardhekar

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिऱ्हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळीत,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकायचा.

गोणपाटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहीत होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमिनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावूनि चावूनि फेकुन दिधल्या,
दुकानातल्या जमिनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितापितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला

बा. सी. मर्ढेकर

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF