Menu Close

प्रेमाचा गुलकंद – प्र के अत्रे – Premacha Gulkand

कवी प्र. के. अत्रे यांनी प्रेमाचा गुलकंद (Premacha Gulkand) या कवितेत एका प्रियकराचे वर्णन केले आहे, जो एका मुलीच्या प्रेमात एकतर्फी बुडालेला असतो. आणि दिलेल्या गुलाबाच्या फुलांचा कसा गुलकंद होऊन त्याच्या कडे येतो, ते यात वर्णन केले आहे.

प्रेमाचा गुलकंद – Premacha Gulkand

बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या

प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे

कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या
रंग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी

“बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?”

तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ वृथा हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी”

हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी

म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद

का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ”

क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला

“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकंद तरी कशास हा दवडा?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला!

तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे..

– प्र के अत्रे

Watch it on YouTube: प्रेमाचा गुलकंद – प्र के अत्रे


Similar Post
प्रेम कर भिल्लासारखं – Prem Kar Bhillasarkh