Menu Close

पितात सारे गोड हिवाळा – Pitat Sare God Hivala Marathi Kavita

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळित येई
माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनि दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी
कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारिस हिरवी झाडे
काळा वायू हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी
सागर-पक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्‍या नि काळ्या
मिरवित रंगा अन्‌ नारिंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी
साखरझोपेमधी फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल
गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध
ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल
जिवंततेचे अर्ध्य भास्करा

थांब! जरासा वेळ तोवरी
अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल
उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर


ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर यांची लोकप्रिय कविता पितात सारे गोड हिवाळा.


या संकेतस्थळावरील चालीसा/आरती/स्तोत्र/कविता केवळ भक्ती लक्षात घेऊन दिलेले आहेत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारे त्यावर कोणताही हक्क सांगत नाही. त्याचे खरे हक्क मूळ लेखक/कवीकडेच राहतील.


Simlar Posts
पिंपात मेले ओल्या उंदीर
देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli Marathi Kavita