Menu Close

गाजलेली उडी – विनायक दामोदर सावरकर – Gajaleli Udi – Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी चालत्या बोटीतून उडी (Gajaleli Udi) मारून इंग्रजांच्या तावडीतून सुटायचा केलेला प्रयन्त या पाठात वर्णिला आहे.


गाजलेली उडी – Gajaleli Udi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्वालामुखी सारखे व्यक्तिमत्त्व लाभले होते. असामान्य कर्तृत्व आणि अजरामर साहसप्रसंग – यांनी या जगप्रसिद्ध भारतीय क्रांतिकारकाचे जीवन समृद्ध झाले होते.

सावरकरांचे जीवन म्हणजे अद्भुत आणि अजरामर साहस प्रसंगांची मालिका. त्यांपैकी सर्वांत रोमहर्षक प्रसंग म्हणजे, मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून त्यांनी भर समुद्रात टाकलेली उडी. त्यांची ही उडी अवघ्या त्रिखंडात गाजली.

१९०९ सालच्या डिसेंबरात, नासिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा, नासिकच्या देशभक्त क्रांतिकारकांनी गोळ्या झाडून वध केला. त्याबद्दल १९१० सालच्या एप्रिल महिन्यात त्यांना फासावरही चढविण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यावेळी इंग्लंडमध्ये असणाऱ्या सावरकरांची आणि त्यांनी स्थापिलेल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिवादी संघटनेची माहिती ब्रिटिश सरकारला कळली.

भारतात आपल्या विरुद्ध क्रांतिकारकांची जी ‘बंडखोरी’ सुरू आहे, त्याचे खरे सूत्रधार सावरकर आहेत, असेही सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे, त्यांना अटक करावयाची आणि त्यांना. भारतात आणावयाचे, असा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला.
त्या निर्णयानुसार, इंग्लंडमध्ये सावरकरांना अटक करण्यात आली; आणि त्यांची रवानगी भारतात करण्यात आली.
१ जुलै १९१० या दिवशी सावरकरांना लंडनवरून भारतात घेऊन येणाऱ्या ‘मोरियां’ नावाच्या आगबोटीचा जलप्रवास सुरू
झाला.

नेहमीचा मार्ग न स्वीकारता, सावधगिरी म्हणून, ही बोट त्यावेळी बिस्केच्या उपसागराच्या मार्गाने निघाली होती. पण वाटेतच ही बोट बिघडली. त्यामुळे ही बोट मार्सेलिसला नेऊन तेथे आवश्यक त्या दुरुस्तीसाठी थांबवणे क्रमप्राप्त ठरले.

दि. ७ जुलै १९१० रोजी या आगबोटीने मार्सेलिस बंदरांत नांगर टाकला.

सावरकरांवर या प्रवासात देखरेख करण्यासाठी स्कॉटलंड यार्डचा पोलिस निरीक्षक ई. जॉन पार्कर आणि मुंबई पोलिसांचा उपअधीक्षक पॉवर यांच्या बरोबरच इतर दहा पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती.

ज्या बंदरावर ही बिघडलेली बोट थांबली होती, ते मार्सेलिस बंदर फ्रान्सच्या किनाऱ्यालगत होते. अर्थात ते बंदर फ्रान्सच्या ताब्यातच होते. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार लटकत असतानाही सावरकर प्रसन्न चित्ताने हा प्रवास करीत होते, पण त्याचवेळी या आगबोटींतून कसे निसटून जाता येईल, याचाही ते सारखा विचार करीत होतेच.

बोट फ्रान्सच्या किनाऱ्यावर थांबली असल्याचे कळताच, आपला हा विचार अंमलात आणायला हरकत नाही, असे त्यांनी ठरविले.
सकाळची वेळ होती. त्यांच्या देखरेखीची मुख्य जबाबदारी ज्याच्यावर होती, तो स्कॉटलंड यार्डचा पोलिस निरीक्षक पार्कर त्यावेळी अर्धवट झोपेत होता, “मला शौचकूपात जावयाचे आहे”, असे सावरकरांनी त्याला सांगताच त्याने आपली जबाबदारी. मदतीसाठी असलेल्या इतर पोलिसांवर सोपविली.

सावरकर शौचकूपात गेले; आणि त्यांनी आतून दार बंद केले. त्यांच्यावर पहारा करणारे सिद्दिकी आणि सिंग असे दोन पोलिस त्यावेळी दाराबाहेर उभे होते. संडासात नजर ठेवता यावी म्हणून, संडासाच्या दाराला मुद्दाम काच लावून घेण्याची दक्षता पोलिसांनी घेतली होती.

पण सावरकर त्या त्यांच्या दक्षतेलाही पुरून उरणारे होते ! संडासात जाताना सावरकरांनी आपल्या अंगावरचा ‘नाईट गाऊन’ मुद्दामच काढला नव्हता.

संडासात गेल्यावर, दाराला त्यांनी कडी लावली आणि अंगावरचा तो गाऊन त्यांनी अगदी सहज आविर्भावात त्या काचेवर टांगला.
इतकी सारी तयारी केल्यावर सावरकरांनी वेळ दवडला नाही. त्यांनी उंच उडी मारली. संडासाच्या वरच्या बाजूस असलेली वाटोळी खिडकी पकडली आणि कसरतीच्या कौशल्याने, आपली आधीच कृश असलेली देहयष्टी खिडकीच्या वर्तुळातून घुसवून बाहेर काढली. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ असे स्वतःशीच उद्गारून भर समुद्रात धाडसी उडी घेतली. सार्वभौम फ्रान्सच्या भूमीवर जाण्यासाठी ते बंदराच्या दिशेने झपाझप पोहत जाऊ लागले.

तोच त्यांचे हे पलायन पहाऱ्यावरील पोलिसांच्या ध्यानात ‘आले. “पळाला! पळाला!” असा ते ओरडा करू लागले. त्यांनी मग झपाझप पोहत जाणाऱ्या सावरकरांवर पिस्तुलाच्या गोळ्या झाडण्यास सुरवात केली. पण अधून-मधून पाण्याखाली बुडी मारून, ती प्रत्येक गोळी यशस्वीपणे चुकवीत ते पोहत होते. अखेर ते किनाऱ्यावर पोचले आणि धूम पळत सुटले.

तोपर्यंत जहाजावरील अधिकारीही पाठलाग करीत किनाऱ्यावर पोचले होतेच. तेही सावरकरांचा पाठलाग करू लागले. “चोर चोर पकड़ा त्याला!” असा ओरडा या पोलिसांनी चालविला होता.

वाटेत भेटलेल्या फ्रेंच पोलिसाला सावरकर म्हणाले, “मला जवळच्या पोलिस स्टेशनवर घेऊन चला.” पण तो पोलिस त्यांच्या सांगण्याकडे लक्ष देईना.

सावरकरांना पकडायला आलेल्या ब्रिटिश पोलिसांनी त्या पोलिसाची मूठ दाबताच तो निघून गेला व अशा रीतीने सावरकरांना पुन्हा अटक करण्यात आली.

बोटीच्या खिडकीतून बाहेर पडताना, सावरकरांच्या छातीच्या दोन्ही बाजूंची कातडी सोलून निघाली होती. अटक करण्यात आल्यावर, धक्के देत ओढीत – ओढीतच त्यांना पुन्हा मोरिया बोटीवर परत आणण्यात आले.

ब्रिटिश पोलिसांनी सार्वभौम फ्रान्सच्या परकीय भूमीवर सावरकरांना अटक करून, आंतरराष्ट्रीय निर्बंधाचा अशा रीतीने स्पष्टपणे भंग केला होता.

दुसऱ्याच दिवशी मोरिया बोटीने आपला भारताकडचा प्रवास सुरू केला.

सावरकरांवर देखरेख करणारे पोलिस अधिकारी, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावरकरांवर आता भलतेच संतापले होते. ते त्यांना शिव्या देऊ लागले. त्यावेळी सावरकर त्यांना म्हणाले, “हे बघा, तुम्ही मला फाशीच्या खांबाकडे घेऊन चालला आहात. अशा स्थितीत मी संधी मिळाल्यास पळून जाण्याचा कसोशीचा प्रयत्न करणारच! मी माझ्या घरादाराला आग लावून मोकळा झालो आहे. पण तुम्हाला बायका-पोरांसह जगायची इच्छा असली, तर समजून चला माझा प्राण गेला, तरी चिंता नाही, पण तुमच्या पैकी एकाचा तरी मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.’

पुढे सावरकरांना त्रास झाला नाही; पण त्यांच्यावर जबर देखरेख ठेवण्यात आली; आणि एडनला आल्यावर, साष्टी बोटीने पुढचा प्रवास करताना, त्यांना एका लहानशा अंधाऱ्या खोलीत कोंबण्यात आले. त्यांच्या हातांना बेड्या होत्याच.

तोवर त्यांच्या उडीची आणि यशस्वी पलायनाची सत्यकथा भारतीयांच्या कानावर पोचलीच होती.

लहान मोठ्या सर्वच वृत्तपत्रांनी सावरकरांच्या त्या धाडसी पलायनाची बातमी, त्यांच्या जीवन चरित्रासह, विस्ताराने प्रसिद्ध केली होती; आणि मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्याशी त्यांची तुलना करून, ‘महान् देशभक्त’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.


Similar Post
सागरा प्राण तळमळला – Sagara Pran Talmalala
पाखऱ्या मराठी धडा – Pakharya Marathi Lesson
दमडी – Damadi – (बालभारती इ.६.वी)
स्मशानातील सोनं – Smashanatil Son – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे

Watch it on YouTube: सावरकरांची ऐतिहासिक उडी | Historical jump of Veer Savarkar | Veer Savarkar jump