देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli
‘देवाजीनें करुणा केली,
भातें पिकुनी पिवळी झालीं’
देवाजीनें करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली
जणुं पायानें चित्त्याच्या अन
रस्ता झाडी झाडूवाली
घराघरांतिल चूल पेटली;
चहा उकळुनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडे,
भातहि शिजुनी होईल पिवळा
देवाजीनें करुणा केली:
रोजचीच पण ‘बस’ हि आली
जणुं पायानें हरिणीच्या अन
शिरस्तांतलीं कामें झाली
घरी परततां, भाजीवाली
समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांचीं कडू दोडकीं
जरी पिकूनी झालीं पिवळी
उजाडतां जें उजाड झालें,
झोपीं गेलें, मावळतां तें:
करील जर का करुणा देव
बिचकुनि होतिल हिरवीं भातें !
– बा. सी. मर्ढेकर
ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर यांची लोकप्रिय कविता देवाजीनें करुणा केली. (Devajine Karuna Keli Marathi Kavita)
या संकेतस्थळावरील चालीसा/आरती/स्तोत्र/कविता केवळ भक्ती लक्षात घेऊन दिलेले आहेत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारे त्यावर कोणताही हक्क सांगत नाही. त्याचे खरे हक्क मूळ लेखक/कवीकडेच राहतील.
Simlar Posts |
---|
पिंपात मेले ओल्या उंदीर – Pimpat Mele Olya Undir |
पितात सारे गोड हिवाळा – Pitat Sare God Hivala Marathi Kavita |