Menu Close

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा – Shri Shivlilamrut Adhyay 11 in Marathi

‘शिवलीलामृत’ (Shivlilamrut) हे शिवलीलामृत किंवा शिवलीलामृत म्हणूनही ओळखले जाते हे ‘श्रीधर स्वामी’ यांनी लिहिलेल्या मराठीतील महान महाकाव्यांपैकी एक आहे. शिवलीलामृत हे ‘ब्रम्हा-उत्तर’ किंवा ‘स्कंद पुराण’च्या ब्रम्होत्तर खंडाचे भाषांतर आहे. शिवलीलामृत चा सगळ्यात जास्त वाचला जाणारा अध्याय अकरावा (Shivlilamrut Adhyay 11) आम्ही इथे देत आहोत.

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा – Shri Shivlilamrut Adhyay 11

श्रीगणेशाय नमः ॥

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥

सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती । त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥

जोसहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण । तो शंकरचि त्याचें दर्शन । घेतां तरती जीव बहु ॥ ३ ॥

अथवा षोडश षोडश दंडी जाण । बांधावे रुद्राक्ष सुलक्षण । शिखेमाजी एक बांधावा पूर्ण । शिवस्वरुप म्हणवुनी ॥ ४ ॥

त्यावरोनि करितां स्नान । तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान । असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण । रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥ ५ ॥

कंठी बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस । सहा सहा कर्णीं पुण्य विशेष । बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥

अष्टोत्तरशत माळ । सर्वदा असावी गळां । एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजितां भाग्य विशेष ॥ ७ ॥

पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक । सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करितां ॥ ८ ॥

नित्य रुद्राक्षपूजन । तरी केलें जाणिजे शिवार्चन । रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयीं ॥ ९ ॥

काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥ १० ॥
Shivlilamrut Adhyay 11
प्रजा दायाद भूसुर । धन्य म्हणती तोचि राजेश्र्वर । लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पैं ॥ ११ ॥

सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाघिजे कामिनी । सुत सभाग्य विद्वान गुणी । विशेष सुकृतें पाविजे ॥ १२ ॥

गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर । शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार । वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार । विशेष सुकृतें लाहिजे ॥ १३॥

श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण । काय आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ १४ ॥

असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करितां अनुष्ठान । दोघांसी झाले नंदन । शिव भक्त उपजतांचि ॥ १५ ॥

राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम । दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ॥ १६ ॥

बाळें होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ । लौकिकसंगे ध्रुव अमंगळ । त्यांची संगती नावडे त्यां ॥ १७ ॥

पंचवर्षी दोघे कुमर । लेवविती वस्त्रें अलंकार । गजमुक्तमाळा मनोहर । नाना प्रकारें लेवविती ॥ १८ ॥

तंव ते बाळ दोघेजण । सर्वालंकार उपाधी टाकून । करिती रुद्राक्ष धारण ।भस्म चर्चिती सर्वांगीं ॥ १९ ॥

आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत । बोलती शिवनामावळी सत्य । पाहाणें शिवपूजा सर्वदा ॥ २० ॥
Shivlilamrut Adhyay 11
आश्र्चर्य करिती राव प्रधान । यांसी कां नावडे वस्त्रभूषण । करिती रुद्राक्षभस्म धारण । सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥

विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रें भूषणें लेवविती । ते सवेंचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥

शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुलें व्रत । राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावें काय आतां ॥ २३ ॥

तों उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर । सवें वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥ २४ ॥

जो कृष्णद्वैपायनाचा जनिता । त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता । जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां । राक्षससत्र जेणें केलें ॥ २५ ॥

जेवीं मनुष्यें वागती अपार । तैसेचि पूर्वीं होते रजनीचर । ते पितृकैवारें समग्र । जाळिले सत्र करुनियां ॥ २६ ॥

जनमेजयें सर्पसत्र केलें । तें आस्तिकें मध्येंचि राहविलें । पराशरासी पुलस्तीनें प्रार्थिलें । मग वांचले रावणादिक ॥ २७ ॥

विरंचीस दटावूनि क्षणमात्रें । प्रतिसृष्टि केली विश्र्वामित्रें । तेवीं पितृकैवारें पराशरें । वादी जर्जर पैं केले ॥ २८ ॥

ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा । यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळलें पाहिजे निर्धारें ॥ २९ ॥

ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुक योगींद्र । तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार । घरा आला जाणोनी ॥ ३० ॥
Shivlilamrut Adhyay 11
राव प्रधान सामोरे धांवती । साष्टांग नमूनि घरासी आणिती । षोडशोपचारीं पूजिती । भाव चित्तीं विशेष ॥ ३१ ॥

समस्तां वस्त्रें भूषणें देऊन । राव विनवी कर जोडून । म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥

नाचडती वस्त्रें अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर । वैराग्याशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासीं ॥ ३३ ॥

इंद्रियभोगावरी नाहीं भर । नावडे राजविलास अणुमात्र । गजवाजियानीं समग्र । आरुढावें आवडेना ॥ ३४ ॥

पुढें हे कैसें राज्य करिती । हें आम्हांसी गूढ पडलें चित्तीं । मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती । दाखविले भद्रसेनें ॥ ३५ ॥

गुरुनें पाहिलें दृष्टीसीं । जैसे मित्र आणि शशी । तैसे तेजस्वी उपमा तयांसी । नाहीं कोठें शोदहितां ॥ ३६ ॥

यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे कां झाले शिवभक्त । यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥ ३७ ॥

पूर्वी काश्मीर देशांत उत्तम । महापट्टण नंदिग्राम । तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥

त्या ग्रामींचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरुप । ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥

जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसें तिजवरी विराजे छत्र । रत्नखचित यानें अपार । भाग्या पार नाहीं तिच्या ॥ ४० ॥

रत्नमय दंडयुक्त । चामरें जीवरी सदा ढळत । मणिमय पादुका रत्नखचित । चरणीं जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥

विचित्र वसनें दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंतक राजस । चंद्ररश्मिसम प्रकाश । शय्या जिची अभिनव ॥ ४२ ॥

दिव्याभरणीं संयुक्त । अंगीं सुगंध विराजित । गोमहिषीखिल्लारें बहुत । वाजी गज घरीं बहुवस ॥ ४३ ॥

दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर । जिचें गायन ऐकतां किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥ ४४ ॥

जिच्या नृत्याचें कौशल्य देखोन । सकळ नृप डोलविती मान । तिचा भोगकाम इच्छून । भूप सभाग्य येती घरा ॥ ४५ ॥

वेश्या असोनि पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां । त्याचा दिवस न सरतां । इंद्रासही वश्य नव्हे ॥ ४६ ॥

परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत । सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेंसीं ॥ ४७ ॥

अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळें शिव पूजित । ब्राह्मणहस्तें अद्भत । अभिषेक करवी शिवासी ॥ ४८ ॥

याचक मनीं जें जें इच्छीत । तें तें महानंदा पुरवीत । कोटि लिंगें करवीत । श्रावणमासीं अत्यादरें ॥ ४९ ॥

ऐकभद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरुन । त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन । नाचूं शिकविलें कौतुकें ॥ ५० ॥
Shivlilamrut Adhyay 11
आपुलें जें कां नृत्यागार । तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर । कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥

करी शिवलीलामृतपुराणश्रवण । तेंही ऐकती दोघेजण । सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढें ॥ ५२ ॥

महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेंकरुन । त्यांच्या गळां कपाळीं जाण । विभूति चर्ची स्वहस्तें ॥ ५३ ॥

एवं तिच्या संगतीवरुन । त्यांसही घडतसे शिवभजन । असो तिचें सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥ ५४ ॥

सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला । त्याचें स्वरुप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवां ॥ ५५ ॥

पूजा करोनि स्वहस्तकीं । त्यासी बैसविलें रत्नमंचकीं । तों पृथ्वीमोलाचें हस्तकीं । कंकण त्याच्या देखिलें ॥ ५६ ॥

देखतां गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गींची वस्तु वाटे पूर्ण । विश्र्वकर्म्यानें निर्मिली जाण । मानंवी कर्तृत्व हें नव्हे॥ ५७ ॥

सौदागरें तें काढून । तिच्या हस्तकीं घातलें कंकण । येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥ ५८ ॥

पृथ्वीचें मोल हें कंकण । मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण । तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झालें मी ॥ ५९ ॥

तयासी तें मानलें । सवेंचि त्यानें दिव्यलिंग काढलें । सूर्यप्रभेहूनि आगळें । तेज वर्णिलें नवजाय ॥ ६० ॥

लिंग देखोनि ते वेळीं । महानंदा तन्मय झाली । म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनि वंदी लिंगातें ॥ ६१ ॥

म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी । कोटी कंकणें टाकावी ओवाळूनी । सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हें ॥ ६२ ॥

म्हणे या लिंगापाशीं माझा प्राण । भंगलें कीं गेलें दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझें ॥ ६३ ॥

येरीनें अवश्य म्हणोन । ठेविलें नृत्यगारीं नेऊन । मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥

तिचें कैसें आहे सत्त्त्व । धैर्य पाहे सदाशिव । भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥ ६५ ॥

त्याच्या आज्ञेंकरुन । नृत्यशाळेसी लागला अग्न । जन धांवों लागले चहूंकडोन । एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥

तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी । येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ॥ ६७ ॥

तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून । कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥ ६८ ॥

नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर । यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवां ॥ ६९ ॥

माझें दिव्यलिंग आहे कीं जतन । महानंदा घाबरी ऐकोन । वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झालें ॥ ७० ॥
Shivlilamrut Adhyay 11
सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन । मी आपुला देतों प्राण । लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥

मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथें जाती ज्वाळा । सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥

अतिलाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग । उडी घातली सुवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥

ऐसें देखतां महानंदा । बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा । लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥ ७४ ॥

अश्र्वशाळा गजशाळा संपूर्ण । सर्व संपत्तिसहित करी गृहदान । महानंदेनें स्नान करुन । भस्म अंगीं चर्चिलें ॥ ७५ ॥

रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । हृदयीं चिंतिलें शिवध्यान । हर हर शिव म्हणवुन । उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥

सूर्यबिंब निघे उदयाचळीं । तैसा प्रगटला कपाळमौळी । दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटीं पाळी भक्तांतें ॥ ७७ ॥

माथां जटांचा भार । तृतीयनेत्रीं वैश्र्वानर । शिरी झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥ ७८ ॥

चंद्रकळा तयाचे शिरीं । नीळकंठ खट्वांगधारी । भस्म चर्चिलें शरीरीं । जगचर्म पांघुरला ॥ ७९ ॥

नेसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यमुंडांचें हार । सर्वांग वेष्टित फणिवर । दशभुजा मिरवती ॥ ८० ॥

वरचेवरी कंदुक झेलीत । तेवीं दहाभुजा पसरोनी अकस्मात । महानंदेसी झेलूनि धरीत । हृदयकमळीं परमात्मा ॥ ८१ ॥

म्हणें जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान । ती म्हणे हे नगर उद्धरुन । विमानीं बैसवीं दयाळा ॥ ८२॥

माताबंधूंसमवेत । महानंदा विमानीं बैसत । दिव्यरुप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥

पावलीं सकळ शिवपदीं । जेथें नाहीं आधिव्याधी । क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैंची तेथें ॥ ८४ ॥

नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख । मद मत्सर नाहीं निःशंक । जेथींचें गोड उदक । अमृताहूनि कोटिगुणें ॥ ८५ ॥

जेथें सुरतरुंचीं वनें अपारें । सुरभींचीं बहुत खिल्लारें । चिंतामणींचीं धवलागारें । भक्तांकारणें निर्मिलीं ॥ ८६ ॥

जेथें वोसणतां बोलती शिवदास । तें तें मास होय तयांस । शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथें पावली ॥ ८७ ॥

हे कथापरम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास । म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥ ८८ ॥

कंठीं रुद्राक्षधारण । भाळीं विभूति चर्चून । त्याचि पूर्वपुण्येंकरुन । सुधर्म तारक उपजले ॥ ८९ ॥

हे पुढें राज्य करतील निर्दोष । बत्तीसलक्षणीं डोळस । शिवभजनीं लाविती बहुतांस । उद्धरितील तुम्हांतें ॥ ९० ॥
Shivlilamrut Adhyay 11
अमात्यसहित भद्रसेन । गुरुसी घाली लोटांगण । म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरीं जन्मले ॥ ९१ ॥

भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षें करिती । आयुष्याप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥

बहुत करितां नवस । एवढाचि पुत्र आम्हांस । परम प्रियकर राजस । प्राणांहूनि आवडे बहु ॥ ९३ ॥

तुमच्या आगमनेंकरुन । स्वामी मज समाधान । तरी या पुत्रांचें आयुष्यप्रमाण । सांगा स्वामी मज तत्त्वतां ॥ ९४ ॥

ऋषि मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख । हे सभा सकळीक । दुःखार्णवीं पडेल पैं ॥ ९५ ॥

प्रत्ययसदृश बोलावें वचन । ना तरी आंगास येतें मूर्खपण । तुम्हां वाटेल विषाहून । विशेष ऐसी ते गोष्टी ॥ ९६ ॥

भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान । तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झालीं असतां जाणपां ॥ ९७ ॥

आजपासोनि सातवे दिवशीं । मृत्यु पावेल या समयासी । राव ऐकतां धरणीसी । मूर्छा येऊनि पडियेला ॥ ९८ ॥

अमात्यासहित त्या स्थानीं । दुःखाग्नींत गेले आहाळोनी । अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ॥ ९९ ॥

करुनियां हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर । मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥ १०० ॥

नृपश्रेष्ठा न सोडीं धीर । ऐक एक सांगतों विचार । जें पंचभूतें नव्हतीं समग्र । शशिमित्र नव्हते तैं ॥ १०१ ॥

नव्हता मायामय विकाार । केवळ ब्रह्ममय साचार । तेथें झालें स्फुरणजागर । अहं ब्रह्म म्हणोनियां ॥ १०२ ॥

तें ध्वनि माया सत्य । तेथोनि जाहलें महत्तत्त्व । मगत्रिविध अहंकार होत । शिवइच्छेंकरुनियां ॥ १०३ ॥

सत्त्वांशें निर्मिला पीतवसन । रजांशें सृष्टिकर्ता द्रुहिण । तमांशें रुद्र परिपूर्ण । सर्गस्थित्यंत करविता ॥ १०४ ॥

विधीसी म्हणे सृष्टि रचीं पूर्ण । येरु म्हणे मज नाहीं ज्ञान । मग शिवें तयालागून । चारी वेद उपदेशिले ॥ १०५ ॥

चहूं वेदांचें सार पूर्ण । तो हा रुद्राध्याय परम पावन । त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान । भुवनत्रयीं असेना ॥ १०६ ॥

बहुत करीं हा जतन । त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन । हा रुद्राध्याय शिवरुप म्हणून । श्रीशंकर स्वयें बोले ॥ १०७ ॥

जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती । मग कमलोद्भव एकांतीं । सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥ १०८ ॥

मग सांप्रदायें ऋषीपासोन । भूतलीं आला अध्याय जाण । थोर जप तप ज्ञान । त्याहूनि अन्य नसेचि ॥ १०९ ॥

जो हा अध्याय जपे संपूर्ण । त्याचेनि दर्शनें तीर्थें पावन । स्वर्गींचे देव दर्शन । त्याचे घेऊं इच्छिती ॥ ११० ॥
Shivlilamrut Adhyay 11
जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण । रुद्रमहिमा अगाध पूर्ण । किती म्हणोनि वर्णावा ॥ १११ ॥

रुद्रमहिमा वाढला फार । ओस पडिलें भानुपुत्रनगर । पाश सोडोनि यमकिंकर । रिते हिंडो लागले ॥ ११२ ॥

मग यमें विधिलागी पुसोन । अभक्तिकृत्या निर्मिली दारुण । तिणें कुतर्कवादी भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ॥ ११३ ॥

त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष । तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकीं पडलें सदा ॥ ११४ ॥

यम सांगे दूतांप्रती । शिवद्वेषी जेपापमती । ते अल्पायुषी होती । नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥

शिव थोत विष्णु लहान । हरि विशेष हर गौण । ऐसें म्हणतीजे त्यालागून । आणोनि नरकीं घालावे ॥ ११६ ॥

रुद्राध्याय नावडे ज्यांसी । कुंभीपाकीं घालावें त्यांसी । रुद्रानुष्ठानें आयुष्यासी । वृद्धि होय निर्धारें ॥ ११७ ॥

याकरितां भद्रसेना अवधारीं । अयुत रुद्रावर्तनें करीं । शिवावरी अभिषेकधार धरीं । मृत्यु दूरी होय साच ॥ ११८ ॥

अथवा शतघट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून । रुद्रें उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करीं ॥ ११९ ॥

नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण । क्षोणीपाळा करीं सप्तदिन । रायें धरिलें दृढ चरण । सद्गद होवोनि बोलत ॥ १२० ॥

सकळऋषिरत्नमंडितपदक । स्वामी तूं त्यांत मुख्य नायक । काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनि ॥ १२१ ॥

तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण । तुजसवें जे आहेत ब्राह्मण । आणीक सांगती ते बोलावून । आतांचि आणितों आरंभी ॥ १२२ ॥

मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रु्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण । न्यासध्यानयुक्त पढून । गुरुपासून जे आले ॥ १२३ ॥

परदारा आणि परधन । ज्यांसी वमनाहूनि नीच पूर्ण । विरक्त सुशील गेलिया प्राण । दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥ १२४ ॥

जे शापानुग्रहसमर्थ । सामर्थ्यें चालों न देती मित्ररथ । किंवा साक्षात उमानाथ । पुढें आणोनि उभा करिती ॥ १२५ ॥

ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन । सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥ १२६ ॥

स्वर्धुनीचें सलिल भरलें पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून । रुद्रघोषें गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ॥ १२७ ॥

शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं मध्यान्हीं आला चंडांश । मृत्युसमय येतां धरणीस । बाळ मूर्छित पडियेला ॥ १२८ ॥

एक मूहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिलें समस्त । परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥ १२९ ॥

रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन । त्यासी पुसती वर्तमान । वर्तलें तेंचि सांगत ॥ १३० ॥
Shivlilamrut Adhyay 11
एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळीं शेंदूर । विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारखें ॥ १३१ ॥

तो मज घेऊनि जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां । पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळ भवांडीं दुजी नसे ॥ १३२ ॥

ते तेजें जैसे गभस्ती । दिगंततम संहारिती । भस्म अंगीं व्याघ्रांबर दिसती । दश हस्तीं आयुधें ॥ १३३ ॥

ते महाराज येऊन । मज सोडविलें तोडोनि बंधन । त्या काळपुरुषासी धरुन । करीत ताडन गेले ते ॥ १३४ ॥

ऐसें पुत्रमुखींचें ऐकतां उत्तर । भद्रसेन करी जयजयकार । ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रु नेत्रीं आले ॥ १३५ ॥

अंगीं रोमांच दाटले । मग विप्र चरणीं गडबडां लोळे । शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमनें वर्षती ॥ १३६ ॥

अनेक वाद्यांचे गजर । डंका गर्जे अवघ्यांत थोर । मुखद्वयांची महासुस्वर । मृदंगवाद्यें गर्जती ॥ १३७ ॥

अनेक वाद्यांचे गजर । शिवलीला गाती अपार । श्रृंगेंभृंगे काहाळ थोर । सनया अपार वाजती ॥ १३८ ॥

चंद्रानना धडकत भेरी । नाद न माये नभोदरीं । असो भद्सेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥ १३९ ॥

षड्रस अन्नें शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रें देत । अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पीं ब्राह्मणांसी ॥ १४० ॥

दक्षिणेलागी भांडारें । मुक्त केली राजेंद्रें । म्हणे आवडे तितुके भरा एकसरें । मागें पुढें पाहूं नका ॥ १४१ ॥

सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात । धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ॥ १४२ ॥

ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता । ऐसा अति आनंद होत असतां । तों अद्भुत वर्तलें ॥ १४३ ॥

वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी । कीं श्र्वेतोत्पलें मृडानी । रमण लिंग अर्चिलें ॥ १४४ ॥

कीं निर्दैवासी सांपडे चिंतामणी । कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि ये धांवूनी । तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं । नारदमुनी पातला ॥ १४५ ॥

वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तान पादीकयाधुहृददयरत्न । हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण । वंद्य जे कां सर्वांतें ॥ १४६ ॥

जो चतुःष्ठिकळाप्रवीण निर्मळ । चतुर्दशविद्या करतळामळ । ज्याचें स्वरुप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ॥ १४७ ॥

हें कमळभवांड मोडोनी । पुनः सृष्टि करणार मागुतेनी । अन्याय विलोकितां नगनीं । दंडें ताडील शक्रादिकां ॥ १४८ ॥

तों नारद देखोनि तेचि क्षणीं । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी । दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखतां ॥ १४९ ॥

पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन । धांवोनि धरिती चरण । ब्रह्मानंदें उचंबळले ॥ १५० ॥
Shivlilamrut Adhyay 11
दिव्य गंध दिव्य सुमनीं । षोडशोपचारें पूजिला नारदमुनी । राव उभा ठाकें कर जोडोनी । म्हणे स्वामी अंर्तीदिव्यद्रष्टा तूं ॥ १५१ ॥

त्रिभुवनीं गमन तुझें सर्व । कांहीं देखिलें सां अपूर्व । नारद म्हणे मार्गीं येतां शिव- । दूत चौघे देखिले ॥ १५२ ॥

दशभुज पंचवदन । तिहीं मृत्यु नेला बांधोन । तुझ्या पुत्राचें चुकविलें मरण । रुद्रानुष्ठानें धन्य केलें ॥ १५३ ॥

तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला । मज देखतां मृत्युसी पुसूं लागला । शिवसुत ऐका तें ॥ १५४ ॥

तूं कोणाच्या आज्ञेवरुन । आणीत होतासी भद्रसेननंदन । त्यासी दहा सहस्र वर्षें पूर्ण । आयुष्य असे निश्र्चयें ॥ १५५ ॥

तो सार्वभौम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां । शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां । कैसा आणीत होतासी ॥ १५६ ॥

मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून । तव द्वादशवर्षीं मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होतें ॥ १५७ ॥

तें महत्पुण्यें निरसूनि सहज । दहा सहस्र वर्षें करावें राज्य । मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधें कष्टीं बहू ॥ १५८ ॥

मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत । हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळतां घडला हा ॥ १५९ ॥

ऐसें नारदें सांगतां ते क्षणीं । रायें पायांवरी घातली लोळणी । आणीक सहस्र रुद्र करुनी । महोत्साह करीतसे ॥ १६० ॥
Shivlilamrut Adhyay 11
शतरुद्र करितां निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । हा अध्याय पढतां निर्दोष । तो शिवरुप याचि देहीं ॥ १६१ ॥

तो येथेंचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थें तरती बहुत । असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥ १६२ ॥

आनंदमय शक्तिनंदन । रायें शतपद्म धन देऊन । तोषविला गुरु संपूर्ण । ऋषिंसहित जाता झाला ॥ १६३ ॥

हें भद्रसेन आख्यान जें पढती । त्यांसी होय आयुष्य संतती । त्यांसी काळ न बाधे अंतीं । वंदोनि नेती शिवपदा ॥ १६४ ॥

दशशत कपिलादन । ऐकतां पडतां घडे पुण्य । केलें असेल अभक्ष्यभक्षण । सुरापान ब्रह्महत्या ॥ १६५ ॥

एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां । हा अध्याय त्रिकाळ वाचितां । गंडांतरें दूर होती ॥ १६६ ॥

यावरी कलियुगीं निःशेष । शिवकीर्तनाचा महिमा विशेष । आयुष्यहीन लोकांस । अनुष्ठान हेंचि निर्धारें ॥ १६७ ॥

मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन । युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळीं ॥ १६८ ॥

मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना । शिवअनुष्ठान रुद्राध्याना । करितां महारुद्र तोषला ॥ १६९ ॥

विमानीं बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेलें मिरवित । विधिलोकीं वैकुंठीं वास बहुत । स्वेच्छेंकरुनि राहिले ॥ १७० ॥

शेवटीं शिवपदासी पावून । राहिले शिवरुप होऊन । हा अकरावा अध्यय जाण । स्वरुप एकादश रुद्रांचें ॥ १७१ ॥

हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रां समाधान । कीं हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिलें फळ देणार ॥ १७२ ॥

मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न । पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥ १७३॥

येथें जो मानील अविश्र्वास । तो होईल अल्पायुषी तामस । हें निंदी तो चांडाळ निःशेष । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १७४ ॥

त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता । त्याची संगती न धरावी तत्त्वतां । त्यासी संभाषण करितां । महापातक जाणिजे ॥ १७५ ॥

ते आपुल्या गृहासी न आणावे । आपण त्यांच्या सदनासी न जावें । ते त्यजावे जीवेंभावें । जेवीं सुशील हिंसकगृह ॥ १७६ ॥

जो प्रत्यक्ष भक्षितो विष । जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस । त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस । संदेह कांहीं असेना ॥ १७७ ॥

असों सर्वभावें निश्र्चित । अखंड पहावें शिवलीलामृत । हें न तरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥ १७८ ॥

या अध्यायाचें करितां अनुष्ठान । तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य । त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ॥ १७९ ॥

अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद । जो जगदानंदमूळकंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८० ॥
Shivlilamrut Adhyay 11
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ॥ १८१ ॥

॥ इति एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

-श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा

Watch it on YouTube: श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा


इस वेबसाइट पर चालीसा/आरती/स्तोत्र सिर्फ भक्ति को ध्यान में रखते हुए दिया गया है. इसके द्वारा हम किसी भी तरह से इस पर हक्क नहीं जता रहे. इसका असली हक इसके असली लेखक/कवी का ही रहेगा.


Related Post
श्री शंकराची आरती – Shri Shankarachi Aarti
शिव चालीसा- Shiv Chalisa Lyrics in Hindi