Menu Close

हा हिंददेश माझा – आनंद कृष्णाजी टेकाडे – Ha Hind Desh Maza

आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ॥

सत्यास ठाव देई, वृत्तीस ठेवि न्यायी
सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ॥

जगदीश जन्म घेई, पदवीस थोर नेई
चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ॥

जनकादि राजयोगी, शुक वामदेव त्यागी
घुमवीति कीर्तीवाजा । हा हिंददेश माझा ॥

गंगा हिमाचलाची, वसती जिथें सदाची
होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ॥

पृथुराज सिंह शिवजी, स्वातंत्र्यवीर गाजी
करिती रणांत मौजा । हा हिंददेश माझा ॥

तिलकादि जीव देहीं, प्रसवूनि धन्य होई
मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ॥

जगिं त्याविना कुणीही, स्मरणीय अन्य नाहीं
थोरांत थोर समजा । हा हिंददेश माझा ॥

पूजोनि त्यास जीवें, वंदोनि प्रेमभावें
जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ॥

–  आनंद कृष्णाजी टेकाडे

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF