Menu Close

सर्वात्मका शिवसुंदरा – कुसुमाग्रज – Sarvatmaka Shivsundara

Bruhaspatinath - Lyrics

सर्वात्मका शिवसुंदरा (Sarvatmaka Shivsundara) ही कवी कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता आहे. या कवितेत ते सूर्याची स्तुती करत आहेत, सूर्याची महती सांगत आहेत.

सर्वात्मका शिवसुंदरा – Sarvatmaka Shivsundara

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना ॥

करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥

कुसुमाग्रज

Watch it on YouTube: सर्वात्मका शिवसुंदरा – कुसुमाग्रज

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF



Similar Post
कोलंबसचे गर्वगीत – कुसुमाग्रज