चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान
निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान
मुठ न सोडू जरि तुटला कर; गाऊ, फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही, झाले जरि शिरकाण
साहू शस्त्रास्त्रांचा पाउस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण
विराटशक्ती आम्ही मानव, वाण आमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरीट उद्धट ठेवुनी पादत्राण
हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण
– बा. भ. बोरकर
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF