शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते होऊनि उठले.. भारतभूमीललाट
आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रकाची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट
दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतीचे तेज मिसळुनी… झाले आज विराट
पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करू विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट
– वसंत बापट
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF