Menu Close

लेझिम चाले जोरात – Lezim Chale Jorat

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले…, छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात!

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासिन त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले…, टपढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!

दिवटी फुरफुर कर लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणिझन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात!

भरभर डफ तो बोले घुमुनी, लेझिम चाले मंडल धरुनी,
बाजुस-मागे, पुढे वाकुनी…, झणछीन खळखळ, झिनखळ, झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले…, छनझनु खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात!

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले…, छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात!

दिनभर शेती शमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले…, छनखळ झुणिझन, रात्र सपंली नादात्
लेझिम चाले जोरात!

पहाट झाली – तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळा.., छनखळ झुणिझन, लेझिम खाली…
चला जाऊया शेतात ! चला जाऊया शेतात !!

श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF