Menu Close

सागरा प्राण तळमळला – Sagara Pran Talmalala

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूतां, मी नित्य पािहला होता;
मज वदलासी अन्य देशि चल जाउं; सृष्टीची विविधता पाहू
तैं जननी हृद विरहशंकितही झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
‘मार्गज्ञ स्वयें मीच पुष्टि वाहीन. त्वरि तया परत आणीन!’
विश्वसलो या तव वचनी, मी, जगदनुभवयोगे बनुनी, मी,
तव अधिक शक्त उद्धरली मी, “येईन त्वरे” कथुनि सोडिलें तिजला,
सागरा प्राण तळमळला! ||१||

शुक पंजरि वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी!
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें!
जरि उद्गारणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबही आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा प्राण तळमळला! ||२||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा-मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथे भव्य; परि मज भारी-आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा-वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा प्राण तळमळला! ||३||

या फेनमिषे हंससि, निर्दया, कैसा, कां वचन भंगिसी ऐसा?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
सन्मातेला अबल म्हणूनि फसवीसी? मज विवासनाते नेसी?
जरि आंग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तीस आतां, रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा प्राण तळमळला! ||४||

स्वा. विनायक दामोदर सावरकर

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF