टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा!
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा!
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा!
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा!
– शांता शेळके
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF