श्री क्षेत्र घोरवडेश्वर
पुण्यापासून २० किलोमीटर वर श्री क्षेत्र घोरवडेश्वर हे एक निसर्गरम्य डोंगरावर वसलेले शिव-शंकरांचे मंदिर आहे. मंदिर नव्हे तर इथे पांडवांनी लेणी कोरल्याची कथा लोक सांगतात. उभ्या दगडात कोरलेल्या ह्या लेण्या म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा वारसा आहे. साधारण नऊ खोल्या कोरलेल्या आढळतात. ध्यानस्थ बसण्यासाठी या खोल्यांचा वापर होत असे. संत तुकाराम इथे ध्यानस्थ बसायचे अश्या कथा लोक सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
उजाड डोंगर
साधारण २ किलोमीटर च्या व्यासात घोरवडेश्वर डोंगर वसलेला आहे. पूर्वी हे ठिकाण खूप निसर्गरम्य होते आणि हा डोंगर पूर्णता झाडांनी झाकोळलेला होता. पण कालानुरूप मनुष्याने हा डोंगर वृक्षतोड करून उजाड केला. आजही काही फुकांडे आणि उनाड लोक येऊन इथे वनवा पेटवायचा प्रयत्न करतात. फिरायला येणाऱ्या लोकांसोबत काही दळभद्री लोक दारूच्या बाटल्या पण घेऊन येतात.
उजाड डोंगर आणि वृक्षारोपण
काही वैचारिक लोकांना वाटू लागले की आपण जर निसर्ग जपला नाही, तर निसर्ग आपल्याला जपणार नाही. म्हणून काही लोकांनी कंबर कसली आणि निघाले या उजाड डोंगराला हिरवागार करायला. वन विभाग आणि काही मूठभर निसर्ग सेवकांच्या भरवश्यावर त्यांनी वृक्षारोपणाचे काम सुरु केले. आज या डोंगरावर ३ हजारावर झाडे लावण्यात आलेली आहेत. नुसती झाडेच लावली नाहीत तर त्यांची निगाही राखली जात आहे.
वृक्षारोपण आणि संगोपन
झाडे लावणे हे खरे आव्हान नव्हते. झाडांना जगवणे खरे तर मोठे आव्हान होते. कारण इथून तिथून संपूर्ण डोंगर उजाड झालेला होता. पावसात तर छोटी झाडे जगतील पण उन्हाळ्यात काय? एवढ्या कडक उन्हाळ्यात ती झुडुपे जळून जात. म्हणून निसर्गसेवानकांनी ठरवले की दरवर्षी उन्हाळ्यात झुडुपांना चुहापानी द्यायचे. डोंगरावर पांडव-कालीन नैसर्गिक पाण्याच्या टाक्या आहेत. ज्यात पाण्याचा साठा कायम असतो. त्यात दगडातून पाणी झिरपून कायम पाणी असते. त्याच पाण्याचा उपयोग निसर्गसेवकांनी झुडुपांसाठी करायला सुरुवात केली.
पाणीसाठा
जशी जशी झुडुपांची संख्या वाढली तसा नैसर्गिक पाणीसाठा अपूर्ण पडू लागला. शिवाय पाणी घालतांना खूप जास्त अंतर चालत जावे लागू लागले. हे श्रम वाचवण्यासाठी निसर्गसेवकांनी वन विभागाची मदत घेऊन डोंगराच्या विविध भागात पाण्याचे नळ फिरवले. आज डोंगरावर ठराविक अंतरावर पाण्याच्या टाक्या आहेत. काही टाक्या १००० तर काही ३००० लिटर च्या आहेत. मोठ्या नळ्या स्वखर्चाने विकत घेऊन पाणी दूरवर न्यायचे प्रयत्न चालू आहेत.
कसे देतात पाणी?
पाण्याचा साठा लक्षात घेता डोंगराची काही भागात विभागणी केली गेली. साधारण १० ते १५ निसर्गसेवक मिळून पाण्याच्या टाकीच्या आसपास च्या विभागातल्या सगळया झुडुपांना पाणी घालतात. आठवड्यातून ३ दिवस पाणी घालायचे काम चालते. आठवड्यातून दर गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी सकाळी ६ पासून झाडांना पाणी घालायचे काम चालते. प्रत्येक झाडास आठवड्यातून २ वेळा पाणी दिले गेले पाहिजे याची काळजी घेतली जाते. झाडामागे ५ लिटर पाणी दिले गेले पाहिजे याचीही काळजी घेतली जाते.
डोंगरावरील पठार आणि तलाव
डोंगरावर छोटेसे पठार आहे. शनिवार आणि रविवारी इथे पुण्यातले बरेच रहिवासी सकाळी फिरायला येतात. काही कुटुंबे पर्यटन म्हणून, फोटोग्राफी म्हणून पण इथे येतात. हा एक छोटासा पिकनिक स्पॉट पण म्हटला जाऊ शकतो. पठारावर एक छोटासा तलाव आहे. जो दरवर्षी पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरतो. तलावातले पाणी काही काळाने आटते. दरवर्षी पावसाचे पुरेसे पाणी तलावात साठवावे म्हणून त्यातील माती काढून तलाव खोल करण्यात येतो. बरेच निसर्गसेवक या कामासाठी हातभार लावतात. यावर्षीही हा तलाव खोल करण्यात आला आहे.
निसर्गसेवक कोण असतात?
डोंगरावर येऊन झाडांची काळजी घेणारा प्रत्येक माणूस निसर्गसेवक आहे. जे निसर्गाची सेवा करू इच्छितात त्यांनी गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी सकाळी ६ वाजता डोंगरावर हजर व्हावे आणि पाण्याचे डबे घेऊन झाडांना पाणी घालायला सुरुवात करावी. पाण्याचे डबे आणि नळ्या निसर्गसेवकाकडून पुरवल्या जातात. स्वतः निसर्गसेवकही आपल्यासोबत काम करतात.
आपल्यालाही जर वाटत असेल की हा निसर्ग वाढत जावा, तर आपण आपल्या जवळच्या डोंगरावर झाडांची काळजी घेऊन मदत करू शकता. आपण आहेत त्या गावी, आहेत त्या ठिकाणी, जिथे झाडे दिसतील, तिथे त्यांना जगवायचा प्रयत्न करा. झाडे नसतील तर लावा आणि जगवा.
Lovely post