Menu Close

हरिशचंद्र गडाची गळाभेट

Harishchandra Gada Nalichi Wat

सुरुवात – हरिशचंद्र गडाची गळाभेट

हरिशचंद्र गडाची गळाभेट घेण्यास कित्त्येक दिवस आसुसलेले होते सगळे. मित्रांच्या मित्रांपैकी एकजण आधीच जाऊन आलेला होता. त्यात वर्णन पण त्याने असे केलेले की तिथे जावेच असे मनोमन पक्के केलेले. शेवटी Wild Trek Adventures (WTA) च्या सौजन्याने योग जुळून आला.

शनिवार, रविवार असल्याने काही अडचण नव्हती. शनिवारी सगळी खरेदी (ट्रेकिंग शूज, आणि काय काय) घेऊन सगळी मंडळी सज्ज झाली. कुठेच पोरगी पटली नाही म्हणून शेवटी ट्रेक मध्ये नशीब आजमावताय काय?, अशी टिप्पणी टाकणाऱ्या एका दळभद्री मित्राला हाणावे वाटले. पण कशाला म्हणून सोडून आम्ही सगळे ठरल्या वेळेत पिकअप पॉईंट ला जमलो.

खड्ड्यातल्या रस्त्याचा प्रवास आणि रात्रीचा मुक्काम

साधारण २-३ तास गाडीत बसून वैताग आलेला. खड्ड्यात गेलेल्या रस्त्याने कंबर मोडली होती. पण तोंडावर प्रवास सुखकर झाला असा भाव होता सगळ्यांच्या. रात्रीचा मुक्काम तिथल्या गावच्या शाळेत होता. ती शाळा पाहून गावाच्या शाळेची आठवण झालेली.

दुसरे अनोळखी साथीदार योगा मॅट, स्लीपिंग बॅग, ब्रँडेड वस्तू अश्या लवाजम्यासहित आलेले. थोडा वेळ का होईना पण कॉन्व्हेंटच्या पोरांसमोर मराठी शाळेच्या पोरांची तोंडे होतात तशी आमची परिस्थिती झालेली. पण असो, झोपून गेलो, सकाळी ५ ला उठायचे होते ना!

ट्रेक ची सुरुवात

सकाळी साधारण ७ वाजता ट्रेक ला सुरुवात झाली. चहा नाश्ता झालेला होता, ट्रेक मध्ये भूक लागलीच तर तसले बारीक पराठे दिलेले. गरजेच्या ४ गोष्टी आणि ओळख (नावापुरती) करून सगळे चालू लागले. सुरुवातीला वाटले की सगळे सोपे दिसतेय, पण नंतर फाटणार हे मनातल्या मनात घोळवत पुढे चालत राहिलो. काहीजण सेल्फी काढण्यात आणि फोटो काढण्यात पण बराच वेळ घालवू लागले.

दगड दगड, सूर्य दगड, तारे दगड

जिकडे बघावे तिकडे दगड, मोठे दगड, छोटे दगड, मी दगड, तू पण दगड, पुढे बघ नाहीतर लागेल दगड. नुसत्या दगडांची वसाहत सुरु झाली. तुकाराम, श्रीकांत पट्ठे होतेच आपल्या सोबत आणि आपणही नांगी टाकत नाही लवकर. मग काय, चढ दगड, उतर दगड.

पहिला टप्पा

प्रसादने (Team WTA) सांगितल्या प्रमाणे पहिला टप्पा आला. दोरीच्या साहाय्याने निसरड्या दगडावरून चढायचे होते. सरसर माकडा प्रमाणे चढायचा काहीजण प्रयत्न करू लागली, घसरून पडू लागली. मग सगळ्यांना कळले की वाटते तितके हे सोपे नाही. आम्हीपण मस्त मजेत तो टप्पा पार केला. सोबत ब्रम्हानंद सरांचा पोवाडा होताच.

सुटक्या दगडांच्या रांगेत आम्ही आगाऊपणा करून पुढे जाऊन पुन्हा माघारी आलो. नंतर कळले की सुटक्या आणि करप्या दगडांच्या वरून रस्ता आहे. एवढ्या अंतरात आमच्या काही साथीदारांच्या घामाच्या धारा निघालेल्या आणि काहींचा माघारी जायचा पण विचार झालेला. पण माघारी जाण्याची काही सोय नव्हती.

दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्पा पाहून बऱ्याच जणांची फाटलेली, पण आपले सगळे मावळे मनाची तयारी करूनच आलेले. कमरेला एक दोरी बांधून दुसऱ्या दोरीच्या सहाय्याने उभ्या दगडावर चढून वर जायचे होते. बरेच लोक कमरेला दोर बांधून चढून गेले, आमचे साथीदार सगळे खेड्यातले बैल होते, सूरपारंब्या खेळून मुरलेले. सगळे न थांबता, न दोर बांधता चढून गेले. गर्वाने छाती फुलून आली.

दुसऱ्या टप्प्या नंतर मात्र सगळ्यांची चाल मंदावली. सुटक्या दगडांची तर रांगच होती. परिस्थिती अशी होती की एक जरी घसरला तरी त्याच्या मागचे कमीत कमी १० जण ८०० फूट खोल दरीत पडणार होती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही.

तिसरा टप्पा आणि टॅंगो

तिसऱ्या टप्प्या वर हनुमानाची ताकद असलेला टॅंगो उर्फ रवींद्र खोबरे सगळ्यांना वर ओढत होता. तिथे कंबरेला दोर बांधण्या शिवाय गत्यंतर नव्हते. एव्हाना सगळे बरेच दमलेले होते. पण ४० लोकांना वर ओढणे फक्त टॅंगो लाच जमले. आणि शिवाय शेवट पर्यंत तोच उत्साह.

तिसरा टप्पा चढून गेल्यावर मात्र डोंगराच्या कडेने जायचे होते. दाट धुक्यामुळे आजू बाजूचे सोडा, समोरचे माणूस दिसत नव्हते. आम्ही तर न घाबरता चालून गेलो. पण पुढे गेल्यावर कळले की आपण १००० फूट खोल दरीवरच्या बारक्या रस्त्यावरून चालून आलोत. वीतभर फाटली ते बघून (मोजून नाही पहिली, आपला एक अंदाज, हा हा हा).

पठार, जंगल आणि मग कोकणकडा

वर चढून आलो. पठार पाहिल्यावर जीवात जीव आला. पुढे निवडुंगाचे जंगल असल्यासारखे वाटले, पण माहित नाही त्या कसल्या वनस्पती होत्या. तिथून वर जाऊन आपल्याला बरेच थ्रिल बघायला मिळणार असे वाटले नव्हते. कोकणकडा बद्दल अज्ञान बाकी काय.

Kokan Kada from Nalichi Wat
Kokan Kada from Nalichi Wat

कोकणकडा पहिला, वाफाळत्या चहातून वाफा वर येतात त्या प्रमाणे एकसारखे धुके वर येत होते. उभाच्या उभा डोंगर पाहून घाबरायला झाले. मधेच एखादा वाऱ्याचा झोका सोबत उडवून नेत होता (छे छे, मी आणि कुरकुरे? – काहीच संबंध नाही).

हरिशचंद्र गडाची गळाभेट – गडावरचे मंदिर आणि लेण्या

गडावर २ मंदिरे आहेत. एक मंदिर खड्ड्यात आहे. तिथे महादेवाची मोठीच मोठी पिंड आहे. दगड फोडून ही मंदिरे कशी बनवली असावीत असा आपल्या डोक्यात प्रश्न होताच. ४ खांब पैकी १ खांब पूर्णच तुटलेला होता. तसे गडावर ही मंदिरे आणि सध्या लेण्या सोडल्या तर बघण्यासारखे काही नाही. पण म्हणतात ना मंजिल से रास्ते अच्छे लगे.

गडावरून उतरून जायला दुसरा मार्ग होता. चढून आलो त्या पेक्षा हा बराच सोपा आहे. पण खूपच लांब चाललो असे वाटले. परतीचा प्रवास खरच कंटाळवाणा वाटतो. पण ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळेत पोचायचे होते म्हणून सगळे झपझप चालत होते. आमचे सगळे मित्र विनोदवीर असल्याने रटाळवाना वाटणारा रस्ता पण रसिक होऊन जातो.

अनुभव

आ रा रा रा… खतरनाक.

Harishchandra Gad - Kokan Kada Trail
Harishchandra Gad – Kokan Kada Trail
Similar Post
श्री क्षेत्र घोरवडेश्वर

3 Comments

  1. Tukaram Kalane

    भारीच वर्णन केलस किशोर…

    एक अविस्मरणीय ट्रेक होता हरिश्चंद्रगड… जितकं ऐकलं होत त्यापेक्षा जास्त भावला हरिश्चंद्रगड… या ट्रेकमध्ये सगळ्याच गोष्टी अनुभवायला भेटल्या पहिल्यांदा… सोबत साथीदार (तु, शेरू, हर्ष भाई) पण अव्वल होते शिवाय WTA सोबत हा आपला पहिलाच ट्रेक… आणि म्हणून हा ट्रेक खूप जवळचा वाटतो…

Comments are closed.