Menu Close

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा Swami Charitra Saramrut Adhyay 16

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा (Swami Charitra Saramrut Adhyay 16) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.

Swami Charitra Saramrut Adhyay 16

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा Swami Charitra Saramrut Adhyay 16

। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥

जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥

प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नोकरीने ॥३॥

कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥

ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गांवी तयांचे । माता-बंधू राहती ॥५॥

मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥

एके समया पंडितांनी । स्वामीकिर्ती ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥

जरी आठ दिवसांत । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरीत । अक्कलकोटी येईन ॥८॥

यासी सात दिवस झाले । काही अनुभवा न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥

हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करीता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥

त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥

हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपासी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥

तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥

तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवरी ॥१४॥

उभयतांसी ते मानले । तत्काळ तयापरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥

अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥

पंडिते ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥

अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥

नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकुनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥

ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥

तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहूनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥

गजानन हरीभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥

पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाहती । न लवती तयांची ॥२३॥

तेव्हा समर्थ तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणि मंत्र दिधले ॥२४॥

पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥

मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥

गुरुर्ब्रह्माः गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥

ऐसा मंत्र हरीभाऊते दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची ॥२७॥

दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयाच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥

आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व-देव-नमस्कारं केशवं प्रति गच्छति ॥२॥

संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥

इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥

तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥

ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥

स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरीभाऊंचे स्वामीचरणा दृढ जडले ॥३२॥

काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहून जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥

आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥

व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥

असो पुढे त्रिवर्गांनी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥

भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥

चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्रींचरणी अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥

त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥

हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥

तो समर्थे त्यांप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥

म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥

मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥

आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥

धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥

जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणूमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥

आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥

सद़्गुरुने मस्की हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥

सद़्गुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरीत झाली चित्ता । षड्विकार निमाले ॥४९॥

बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीसव निश्चिती । ढोंघ माजविती बहुत ॥५०॥

तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥

तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥

तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥

असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनि ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥

हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥

म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे बरवा विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥

आजवर अब्रुने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥

हासतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥

अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी दुःखडोही का पडता ॥५९॥

संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥

आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची किर्ती मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥

तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥

माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥

तुम्ही म्हणाल मजसवे । तुहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥

तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥

आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥

कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥

विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥

ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥

परी तारेच्या चित्तात । षडरिपू होते जागत । संसाराचे मिथ्यत्व । तियेलागी कळेना ॥७०॥

आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥

त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणूमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥

षड्विकार त्यागोनी । रमला जो स्वामींचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥

स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥

आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥

कामाठीपुऱ्यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥

धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्यांते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥

पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सद़्गुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥

इति श्री स्वामी चरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥७९॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा


Similar Post
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Swami Charitra Saramrut Index
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा Swami Charitra Saramrut Adhyay 15
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरावा Swami Charitra Saramrut Adhyay 17