श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा (Swami Charitra Saramrut Adhyay 2) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा Swami Charitra Saramrut Adhyay 2
। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥
कामना धरोनी जे भजती ।
होय त्यांची मनोरथपूर्ति ।
तैसेचि निष्काम भक्ताप्रती ।
कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥
नृसिंहसरस्वती प्रगट झाले ।
अगणित पापी तारिले ।
कर्दळीवनी गुप्त जहाले ।
गुरुचरित्री ती कथा ॥२॥
पुढे लोकोद्धाराकारणे ।
भाग पडले प्रगट होणे ।
धुंडिली बहुत पट्टणे ।
तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥
स्वामींची जन्मपत्रिका ।
एका भक्ते केली देखा ।
परी तिजविषयी शंका ।
मनामाजी येतसे ॥४॥
गुरुराज गुप्त झाले ।
स्वामीरूपे प्रगटले ।
त्यांचे शकप्रमाण न मिळे ।
म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥
ते केवळ अनादिसिद्ध ।
खुंटला तेथे पत्रिकावाद ।
लोकोद्धारासाठी प्रसिद्ध ।
मानवरूपे जाहले ॥६॥
अक्कलकोटा-माझारी ।
राचप्पा मोदी याचे घरी ।
बैसली समर्थांची स्वारी ।
भक्तमंडळी वेष्टित ॥७॥
साहेब कोणी कलकत्त्याचा ।
हेतू धरोनी दर्शनाचा ।
पातला त्याच दिवशी साचा ।
आदर तयाचा केला की ॥८॥
त्याजसवे एक पारसी ।
आला होता दर्शनासी ।
ते येण्यापूर्वी मंडळीसी ।
महाराजांनी सुचविले ॥९॥
तीन खुर्च्या आणोनी बाहेरी ।
मांडा म्हणती एके हारी ।
दोघांसी बैसवोनी दोहोवरी ।
तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥
पाहोनी समर्थांचे तेज ।
उभयतांसी वाटले चोज ।
साहेबाने प्रश्न केला सहज ।
आपण आला कोठूनी ॥११॥
स्वामींनी हास्यमुख करोनी ।
उत्तर दिले तयालागोनी ।
आम्ही कर्दळीवनांतुनी ।
प्रथमारंभी निघालो ॥१२॥
मग पाहिले कलकत्ता शहर ।
दुसरी नगरे देखिली अपूर्व ।
बंगालदेश समग्र ।
आम्ही असे पाहिला ॥१३॥
घेतले कालीचे दर्शन ।
पाहिले गंगातटाक पावन ।
नाना तीर्थे हिंडोन ।
हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥
पुढे पाहिले केदारेश्वर ।
हिंडलो तीर्थे समग्र ।
ऐसी हजारो हजार ।
नगरे आम्ही देखिली ॥१५॥
मग तेथुनी सहज गती ।
पातलो गोदातटाकाप्रती ।
जियेची महाप्रख्याती ।
पुराणांतरी वर्णिली ॥१६॥
केले गोदावरीचे स्नान ।
स्थळे पाहिली परम पावन ।
काही दिवस फिरोन ।
हैदराबादेसी पातलो ॥१७॥
येउनिया मंगळवेढ्यास ।
बहुत दिवस केला वास ।
मग येउनिया पंढरपुरास ।
स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥
तदनंतर बेगमपूर ।
पाहिले आम्ही सुंदर ।
रमले आमुचे अंतर ।
काही दिवस राहिलो ॥१९॥
तेथोनि स्वेच्छेने केवळ ।
मग पाहिले मोहोळ ।
देश हिंडोनी सकळ ।
सोलापुरी पातलो ॥२०॥
तेथे आम्ही काही महिने ।
वास केला स्वेच्छेने ।
अक्कलकोटा-प्रती येणे ।
तेथोनिया जाहले ॥२१॥
तैपासूनि या नगरात ।
आनंदे आहो नांदत ।
ऐसे आमुचे सकल वृत्त ।
गेले उठोनी उभयता ॥२२॥
ऐकोनिया ऐशी वाणी ।
उभयता संतोषले मनी ।
मग स्वामी आज्ञा घेवोनी ।
गेले उठोनी उभयता ॥२३॥
द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती ।
राहिले स्वामीराज यती ।
परी त्या स्थळी प्रख्याती ।
विशेष त्यांची न जाहली ॥२४॥
सदा वास अरण्यात ।
बहुधा न येती गावात ।
जरी आलिया क्वचित ।
गलिच्छ जागी बैसती ॥२५॥
कोणी काही आमोनि देती ।
तेचि महाराज भक्षिती ।
क्षणैक राहूनि मागुती ।
अरण्यात जाती उठोनी ॥२६॥
वेडा बुवा तयांप्रती ।
गावातील लोक म्हणती ।
कोणीही अज्ञाने नेणती ।
परब्रह्मरुप हे ॥२७॥
त्या समयी नामे दिगंबर ।
वृत्तीने केवळ जे शंकर ।
तेव्हा तयांचा अवतार ।
सोलापुरी जाहला ॥२८॥
ते जाणोनी अंतरखूण ।
स्वामींसी मानिती ईश्वरासमान ।
परी दुसरे अज्ञ जन ।
वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥
दर्शना येता दिगंबर ।
लीलाविग्रही यतिवर्य ।
कंबरेवरी ठेवूनी कर ।
दर्शन देती तयासी ॥३०॥
अमृतासमान पुढे कथा ।
ऐकता पावन श्रोता वक्ता ।
स्वामी समर्थ वदविता ।
ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥
अहो हे स्वामी चरित्र ।
भरला असे क्षिरसागर ।
मुक्त करोनी श्रवणद्वार ।
प्राशन करा श्रोते हो ॥३२॥
तुम्हा नसावा येथे वीट ।
सर्वदा सेवावे आकंठ ।
भवभयाचे अरिष्ट ।
तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत ।
नाना प्राकृत कथा संमत ।
आनंदे भक्त परिसोत ।
द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥