ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला (Swami Charitra Saramrut Adhyay 1) हा online वाचायला मिळेल.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला Swami Charitra Saramrut Adhyay 1
। श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥
श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥
जयजय श्री जगरक्षका ।
जयजयाजी भक्तपालका ।
जयजय कलिमलनाशका ।
अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥
जयजय क्षीरसागर विलासा ।
मायाचक्रचालका अविनाशा ।
शेषशयना अनंतवेषा ।
अनामातीता अनंता ॥२॥
जयजयाजी गरुडवाहना ।
जयजयाजी कमललोचना ।
जयजयाची पतितपावना ।
रमारमणा विश्वेशा ॥३॥
मेघवर्ण आकार शांत ।
मस्तकी किरीट विराजित ।
तोच स्वयंभू आदित्य ।
तेज वर्णिले न जाय ॥४॥
विशाळ भाळ आकर्ण नयन ।
सरळ नासिका सुहास्य वदन ।
दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान ।
शुभ्रवर्ण विराजती ॥५॥
रत्नमाला हृदयावरी ।
जे कोटी सूर्यांचे ते हरी ।
हेममय भूषणे साजिरी ।
कौस्तुभमणि विशेष ॥६॥
वत्सलांच्छनाचे भूषण ।
चेति प्रेमळ भक्तिची खूण ।
उदरी त्रिवळी शोभायमान ।
त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥
नाभिकमल सुंदर अति ।
जेथे विधात्याची उत्पत्ती ।
की चराचरा जन्मदाती ।
मूळ चननी तेचि पै ॥८॥
जानूपर्यंत कर शोभति ।
मनगटी कंकणे विराजती ।
करकमलांची आकृति ।
रक्तपंकजासमान ॥९॥
भक्ता द्यावया अभय वर ।
सिद्ध सर्वदा सव्य कर ।
गदा पद्म शंख चक्र ।
चार हस्ती आयुधे ॥१०॥
कांसे कसिला पीतांबर ।
विद्युल्लतेसम तेज अपार ।
कर्दळीस्तंभापरी सुंदर ।
उभय जंघा दिसताती ॥११॥
जेथे भक्तजन सुखावती ।
ज्याच्या दर्शने पतीत तरती ।
ज्याते अहोरात्र ध्याती ।
नारदादि ऋषिवर्य ॥१२॥
ज्याते कमला करे चुरीत ।
संध्यारागा समान रक्त ।
तळवे योग्य चिन्हे मंडित ।
वर्णित वेद शीणले ॥१३॥
चौदा विद्या चौसष्ट कला ।
ज्याते वर्णित थकल्या सकळा ।
ऐशा त्या परम मंगला ।
अल्पमती केवि वर्णू ॥१४॥
नारदादि मुनीश्वर ।
व्यास वाल्मिकादि कविवर ।
लिहू न शकले महिमांवर ।
तेथे पामर मी काय ॥१५॥
जो सकळ विश्वाचा जनिता ।
समुद्रकन्या ज्याची कांता ।
जो सर्व कारण कर्ता ।
ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥
त्या महाविष्णूचा अवतार ।
गजवदन शिवकुमार ।
एकदंत फरशधर ।
अगम्य लीला जयांची ॥१७॥
जो सकळ विद्यांचा सागर ।
चौसष्ट कलांचे माहेर ।
रिद्धि सिद्धीचा दातार ।
भक्त पालक दयाळू ॥१८॥
मंगल कार्या करिता स्मरण ।
विघ्नें जाती निरसोन ।
भजका होई दिव्य ज्ञान ।
वेदांतसार कळे पां ॥१९॥
सकल कार्यारंभी जाणा ।
करिती ज्याच्या नामस्मरण ।
ज्याच्या वरप्रसादे नाना ।
ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥
तया मंगलासी साष्टांग नमन ।
करूनी मागे वरदान ।
स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ।
निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥
जिचा वरप्रसाद मिळता ।
मूढ पंडित होती तत्त्वता ।
सकळ काव्यार्थ येत हाता ।
ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥
मूढमती ती अज्ञान ।
काव्यादिकांचे नसे ज्ञान ।
माते तू प्रसन्न होवोन ।
ग्रंथरचना करवावी ॥२३॥
जो अज्ञानतिमिरनाशक ।
अविद्याकाननच्छेदक ।
जो सद़्बुद्धीचा प्रकाशक ।
विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥
ज्याचिया कृपेकरोन ।
सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान ।
तेणेच जगी मानवपण ।
येतसे की निश्चये ॥२५॥
तेवी असता मातापितर ।
तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य ।
चरणी त्यांचिया नमस्कार ।
वारंवार साष्टांग ॥२६॥
मी मतिमंद अज्ञ बाळ ।
घेतली असे थोर आळ ।
ती पुरविणार दयाळ ।
सद़्गुरुराज आपणची ॥२७॥
नवमास उदरी पाळिले ।
प्रसववेदनांते सोशिले ।
कौतुके करूनी वाढविले ।
रक्षियेले आजवरी ॥२८॥
जननीजनका समान ।
अन्य दैवत आहे कोण ।
वारंवार साष्टांग नमन ।
चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥
ब्रम्हा विष्णू महेश्वर ।
तिन्ही देवांचा अवतार ।
लीलाविग्रही अत्रिकुमार ।
दत्तात्रेय नमियेला ॥३०॥
तीन मुखे सहा हात ।
गळा पुष्पमाळा शोभत ।
कर्णी कुंडले तेज अमित ।
विद्युल्लतेसमान ॥३१॥
कामधेनू असोनि जवळी ।
हाती धरिली असे झोळी ।
जो पहाता एका स्थळी ।
कोणासही दिसेना ॥३२॥
चार वेद होउनी श्वान ।
वसती समीप रात्रंदिन ।
ज्याचे त्रिभुवनी गमन ।
मनोवेगे जात जो ॥३३॥
त्या परब्रम्हासी नमन ।
करोनि मागे वरदान ।
स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ।
होवो कृपेने आपुल्या ॥३४॥
वाढला कलीचा प्रताप ।
करू लागले लोक पाप ।
पावली भूमि संताप ।
धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥
पहा कैसे दैव विचित्र ।
आर्यावर्ती आर्यपुत्र ।
वैभवहीन झाले अपार ।
दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥
शिथिल झाली धर्मबंधने ।
नास्तिक न मानिती वेदवचने ।
दिवसेंदिवस होमहवने ।
कमी होऊ लागली ॥३७॥
सुटला धर्माचा राजाश्रय ।
अधर्मप्रवर्तका नाही भय ।
उत्तरोत्तर नास्तिकमय ।
भरतखंड जाहले ॥३८॥
नाना विद्या कला ।
अस्तालागी गेल्या सकला ।
ऐहिक भोगेच्छा बळावल्या ।
तेणे सुटला परमार्थ ॥३९॥
धर्मसंस्थापनाकारणे ।
युगायुगी अवतार घेणे ।
नानाविध वेष नटणे ।
जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥
लोक बहु भ्रष्ट झाले ।
स्वधर्माते विसरले ।
नास्तिकमतवादी मातले ।
आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥
मग घेतसे अवतार ।
प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार ।
अक्कलकोटी साचार ।
प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥
कोठे आणि कोणत्या काळी ।
कोण्या जातीत कोणत्या कुळी ।
कोण वर्णाश्रम धर्म मुळी ।
कोणासही कळेना ॥४३॥
ते स्वामी नामे महासिद्ध ।
अक्कलकोटी झाले प्रसिद्ध ।
चमत्कार दाविले नानाविध ।
भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥
त्यांसी साष्टांग नमोनी ।
करी प्रार्थना कर जोडोनी ।
आपुला विख्यात महिमा जनी ।
गावयाचे योजिले ॥४५॥
तुमचे चरित्र महासागर ।
पावेन कैसा पैलतीर ।
परि आत्मसार्थक करावया साचार ।
मीन तेथे जाहलो ॥४६॥
किंवा अफाट गगनासमान ।
अगाध आपुले महिमान ।
अल्पमती मी अज्ञान ।
आक्रमण केवी करू ॥४७॥
पिपीलिक म्हणे गिरीसी ।
उचलून घालीन काखेसी ।
किंवा खद्योत सूर्यासी ।
लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥
तैसी असे माझी आळ ।
बाळ जाणूनी लडिवाळ ।
पुरविता तु दयाळ ।
दीनबंधू यतिवर्या ॥४९॥
कर्ता आणि करविता ।
तूचि एक स्वामीनाथा ।
माझिया ठाई वार्ता ।
मीपणाची नसेची ॥५०॥
ऐसी ऐकुनिया स्तुती ।
संतोषली स्वामीराजमूर्ति ।
कविलागी अभय देती ।
वरदहस्ते करोनी ॥५१॥
उणे न पडे ग्रंथांत ।
सफल होतील मनोरथ ।
पाहूनी आर्यजन समस्त ।
संतोषतील निश्चये ॥५२॥
ऐसी ऐकोनि अभयवाणी ।
संतोष झाला माझिया मनी ।
यशस्वी होवोनी लेखणी ।
ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥
आतां नमू साधुवृंद ।
ज्यासी नाही भेदाभेद ।
ते स्वात्मसुखी आनंदमय ।
सदोदित राहती ॥५४॥
मग नमिले कविश्वर ।
जे शब्दसृष्टीचे ईश्वर ।
ज्यांची काव्ये सर्वत्र ।
प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥
व्यास वाल्मिक महाज्ञानी ।
बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी ।
वारंवार तयांच्या चरणी ।
नमन माझे साष्टांग ॥५६॥
कविकुलमुकुटावतंस ।
नमिले कवि कालिदास ।
ज्यांची नाट्यरचना विशेष ।
प्रिय जगी जाहली ॥५७॥
श्रीधर आणि वामन ।
ज्यांची ग्रंथरचना पाहोन ।
ज्ञातेही डोलविती मान ।
तयांचे चरण नमियेले ॥५८॥
ईशचरणी जडले चित्त ।
ऐसे तुकारामादिक भक्त ।
ग्रंथारंभी तया नमित ।
वरप्रसादाकारणे ॥५९॥
अहो तुम्ही संत जनी ।
मज दीनावरी कृपा करोनी ।
आपण हृदयस्थ राहोनी ।
ग्रंथरचना करवावी ॥६०॥
आता करू नमन ।
जे का श्रोते विलक्षण ।
महाज्ञानी आणि विद्वान ।
श्रवणी सादर बैसले ॥६१॥
महापंडित आणि चतुर ।
ऐसा श्रोतृसमाज थोर ।
मतिमंद मी त्यांच्यासमोर ।
आपले कवित्व केवी आणू ॥६२॥
परी थोरांचे लक्षण ।
एक मला ठाउके पूर्ण ।
काही असता सद्गुण ।
आदर करिती तयाचा ॥६३॥
संस्कृताचा नसे गंध ।
मराठीही न ये शुद्ध ।
नाही पढलो शास्त्रछंद ।
कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥
परी हे अमृत जाणोनी ।
आदर धरावा जी श्रवणी ।
असे माझी असंस्कृत वाणी ।
तियेकडे न पहावे ॥६५॥
न पाहता जी अवगुण ।
ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण ।
एवढी विनंती कर जोडोनी ।
चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥
स्वामींच्या लीला बहुत ।
असती प्रसिद्ध लोकांत ।
त्या सर्व वर्णिता ग्रंथ ।
पसरेल समुद्रसा ॥६७॥
त्या महोदधीतुनी पाही ।
अमोल मुक्ताफळे घेतली काही ।
द्यावया मान सूज्ञाही ।
अवमान काही न करावा ॥६८॥
की हे उद्यान विस्तीर्ण ।
तयामाजी प्रवेश करोन ।
सुंदर कुसुमे निवडोन ।
हार त्यांचा गुंफिला ॥६९॥
कवि होवोनिया माळी ।
घाली श्रोत्यांच्या गळी ।
उभा ठाकोनि बद्धांजुळी ।
करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥
अहो या पुष्पांचा सुवास ।
तृप्त करील आपुले मानस ।
हा सुगंध नावडे जयास ।
तेचि पूर्ण अभागी ॥७१॥
आता असोत हे बोल ।
पुढे कथा बहु अमोल ।
वदविता स्वामी दयाळ ।
निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥
वैराग्य प्रत्यक्ष शंकर ।
तेजे कैसा सहस्त्रकर ।
दुष्टां केवळ सूर्यपुत्र ।
भक्तां मातेसमान ॥७३॥
यतिराजपदकल्हार ।
विष्णुकवि होऊनी भ्रमर ।
ज्ञानमधुस्तव साचार ।
रुंची तेथे घालीतसे ॥७४॥
इति श्रीस्वामी चरित्र सारामृत ।
नाना प्राकृत कथा संमत ।
आदरे भक्त परिसोत ।
प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥
श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥