सुरुवात – नवीन दुचाकी आणि लोणावळा
सकाळचे ७ वाजलेले. चहा पिताना वाटले कि आज रविवार आहे, आणि गाडी पण नवीन घेतलीये, जवळपास कुठेतरी फिरून येऊ. पण सगळ्या जवळपास च्या जागा (पुण्याच्या आसपासच्या) फिरून झालेल्या. थोडे लांब जावे म्हटले तर ग्रुप पाहिजे होता. पण अश्या ऑक्टोबर च्या उन्हात इतक्या गडबडीत कोण तयार होईल असे वाटत नव्हते.
आधी कामशेत ठरलेले
डोक्याला शॉट न लावता गुगल मॅप काढला आणि Places near Pune म्हणून search टाकला. क्षणभरात गूगल दादाने भली मोठी (बिनकामाची आणि महागडी) यादी दाखवली. अश्या ठिकाणी एकट्याने जाणे म्हणजे भयानक बोरिंग काम. तरी स्क्रोल करत असताना कुठेतरी कोपऱ्यात Paragliding in कामशेत असे वाचले आणि अंतर किती आहे ते तपासून पाहिले. साधारण निगडी पासून २५-३० किलोमीटर अंतर ते दाखवत होते. मी पण नवखा ड्राइवर असल्याने मलाही जास्त अंतर कापणे जरा अश्यक्य होते.
आपण जाऊन करायचे काम तिथे हा पण प्रश्न होता. कारण Paragliding वैगरे आपल्या खिश्याला परवडेल असे काही नव्हतेच. नुसतं जाऊन पाहून तरी येऊ, हवेत कशी उडतात लोक. म्हणजे डोक्यात हवा गेली की हवेत उडायलाच लागतात लोक (हे १० वी आणि १२ वी च्या पोरांनी टोमणा समजावा). तरी पण चला म्हणून आपल्या मोपेड दुचाकी वर टांग टाकली आणि निघालो कडेकडेने.
प्रवास सुरु झाला, माझ्यासाठी आधी न गेलेल्या ठिकाणी पहिलाच दुचाकींचा हा प्रवास होता. रस्ता चुकायची भीती होतीच. पण गुगल दादा है जिसके पास, उसकी हर बात है खास. जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत गावा पर्यंत येऊन पोचलो. आता प्रश्न की नक्की हे Parachute वाले इथे असतील कुठे. इथे आसपास तर कुठे मोठा डोंगरही दिसत नाही. न राहवून एकाला विचारले, तसे त्याने वाकडे तोंड करत डाव्या हाताला बोट दाखवला. तिथे वळण घेऊन सरळ जा बोलला. धर्मराजाने सहदेवाला सांगावे, आणि सहदेवाने ते काम तात्काळ पार पाडावे या आवेशाने मी त्याला धन्यवाद देत पुढे सरकलो.
तिथे काहीच नाही दिसले
साधारण ५ किलोमीटर गेल्यावर निर्मनुष्य रस्ता पाहून मला चुकचुकल्यागत वाटू लागले. कोणाला विचारावे तर लांब लांब पर्यंत आकाशातल्या घारी शिवाय कोण दिसेना. कुठेतरी लांब DJ चा आवाज घुमत होता. वाटले की अजून थोडे पुढे जाऊ, कदाचित डोंगराच्या पलीकडेच असावे आणि तिथेच DJ वर जवानी थिरकत असावी. पण नशीब कसले. डोंगरावरून पलीकडे गेलो तरी सगळे निर्मनुष्य. माझी नवीन गाडी आणि तो डोंगरावरचा तो घाट सदृश्य रस्ता बांधायला काढलेला. गाडी खराब होते की काय या भीतीने माघारी फिरलो, तो थेट महामार्गाला येऊन थांबलो.
उन्हात घामाने चिंब भिजलेलो, म्हणून आपले energy boost म्हणून चहा घेतला. चला घेताना शेजारीच असलेल्या किलोमीटर च्या फलकावर माझी सहज नजर गेली. लोणावळा – २२ किमी. आधी कधीच लोणावळा न पाहिलेला मी, सुटली हाव, त्यात किलोमीटर पण कमी वाटले. मग काय, स्वारी झेपावली ती सरळ लोणावळ्याकडे.
म्हणून लोणावळ्याला गेलो
लोणावळा बद्दल तसे बरेच ऐकून होतो, पण नेमके तिथे पाहण्यालायक ठिकाणास कसे पोहोचायचे ते माहित नव्हते. लोणावळ्यात पोहोचून मी मित्रांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी मला येड्यात काढले. म्हणले की अरे आता नको जाऊ लोणावळ्याला, तिथे काही पाहण्यालायक नसते या मौसमात. मी बोललो – अरे भावा, मी आता लोणावळ्यात उभा आहे, तू आता सांग, नाहीतर मी शोधतो. एका मित्राकडून कळले की टायगर पॉईंट ला जा, बाकी अध्ये-मध्ये काही मिळणार नाही बघायला.
मनसोक्त फिरलो
आपली ऍक्सेस १२५ घेऊन मी सरळ टायगर पॉईंट चा रस्ता गूगल काकांना विचारात पुढे सरकू लागलो. घाट रस्ता होता आणि मी नवीन चालक असल्याने त्यावर भीती आणि मज्जा दोन्ही अनुभव एकदाच येत होते. आजूबाजूला वातावरण थोडे थंड होते. रस्त्याला झाडी पण तशी बरीच हिरवीगार होती. थांबत थांबत, सेल्फी काढत काढत शेवटी टायगर पॉईंट ला पोचलो. माझ्या सारखे बरेच येडे तिथे आलेले. काही थोडे जास्तच वेडे होते. दारू पिऊन, कड्यावर जाऊन सेल्फी काढत होते. तोल जाऊन खाली पडले की कपाळमोक्षच.
आणि परत आलो
बराच काळ तिथे घालवल्यावर मी चहा आणि कांदा भाजी खाऊन परतीच्या रस्त्याला लागलो. घाट उतरणीला पुन्हा थांबून बरीच फोटोग्राफी केली. उन्हाळ्यासारखे ऊन असूनही लोणावळ्याच्या तो निसर्ग डेरेदार पणे उभा होता. मनाला भावणारा, दगडी मन कोमल करणारा. मनातल्या मनात विचार करू लागलो, की निसर्ग उन्हाळ्यात इतका सुंदर आहे, तर पावसाळ्यात किती मनमोहक असेल.
पावसाळ्यात एकदा तरी इथे यावेच असे मनाशी ठरवून मी परतलो.
Nice dear….keep it up
Nice